অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सह्याद्रीच्या कुशीतील काळेवाडी ठरली संत तुकाराम वनग्राम पुरस्कार विजेती

सह्याद्रीच्या कुशीतील काळेवाडी ठरली संत तुकाराम वनग्राम पुरस्कार विजेती

सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले काळेवाडी हे कर्जत तालुक्यातील एक गाव. नेरळ पासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर. कर्जत हे तालुक्याचे तसेच मुख्य बाजारपेठेचे तर नेरळ छोट्या बाजारहाटीसाठी जवळचे. काळेवाडीचा समावेश पिंपळोली ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये होतो. गावची वस्ती अनुसुचित जमाती (एस.टी) हिंदु ठाकुर या समाजातील लोकांची आहे. या लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून पशुपालन व मोलमजूरी करणे देखील सुरू असते. या गावाने यंदाचा संत तुकाराम वनग्राम हा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावून साऱ्या जिल्ह्याचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

जिल्ह्यातील इतर गावांसाठी मार्गदर्शक असलेल्या काळेवाडीची ही यशकथा..दिनांक 15 मे 2013 रोजी ग्रुप ग्रामपंचायत पिंपळोलीच्या मासिक सभेअंतर्गत काळेवाडी वनसंरक्षण समिती बाबतचा ग्रामपंचायत ठराव क्र.4/1 नुसार काळेवाडी हे गाव संयुक्त वन व्यवस्थापन योजनेखाली घेण्याचे ठरले. तसा समझोता, समय लेखा तयार करण्यात आला आणि तेव्हापासून सदरचे गाव संयुक्त वन व्यवस्थापन योजनेखाली आले.

संयुक्त वन व्यवस्थापन समिती काळेवाडीमध्ये 22 कुटुंब असुन त्यांची सदस्यसंख्या 115. यात 60 पुरूष व 55 महिला सदस्य आहेत. या समितीमधून कार्यकारी समितीची निवड करण्यात आली. त्यानुसार मधुकर भाऊ निरगुडा अध्यक्ष तर इतर 14 कार्यकारी सदस्य झाले. ही जरी कार्यकारणी समिती असली तरी गावच्या सर्वच मंडळींनी गावाच्या विकासासाठी योगदान देण्याचे ठरवले असल्याने सगळेच्या सगळे म्हणजे 115 जण जणू कार्यकारी सदस्यच झाले. गावातील लोकांचा सहभाग आणखी वाढला व कार्यक्रमाला मजबुती मिळाली.

गावालगतचे वनक्षेत्र पूर्वी अवनत आल्याने गावातील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यांना गुरांसाठी चारा, इंधनासाठी सरपण, पिण्याचे पाणी इत्यादी यावर उपाय म्हणून गावातील लोकांनी स्वयंप्रेरणेने जंगलाचे संरक्षण व संवर्धन करण्यास या पूर्वीच सुरूवात केली. सदर समितीचे कार्यक्षेत्रात वनविभागांतर्गत वनक्षेत्रावर सन 2011-12 मधील पावसाळ्यात 22 हेक्टर. क्षेत्रात मिश्र रोपांची लागवड करण्यात आली. सध्याचे वनक्षेत्रपाल आर.बी.घाटगे, वनपाल वाय.एस.महाजन, वनरक्षक एस.एल.मगर यांनी हिरीरीने काम करुन समितीचे कार्यक्रमास मजबुती आणलेली आहे. या वनक्षेत्रात साग, खैर, अैन, आंबा, जांभूळ, बांबू अशा विविध मौल्यवान प्रजातीचे वृक्ष तर करवंद, कुडा, उक्शी, पंगारा, अशी खुरटी झुडपी आहेत. शिवाय बोंडारा गवताच्या प्रजातीही आढळून येतात.

सदर रोपवन कामामुळे स्थानिक आदिवासी बेरोजगारांना काम मिळाले व त्यांचा वनविकास कामात सहभाग वाढल्याने जंगल संरक्षण व संगोपन चांगल्या रितीने झाले. परिणामी रोपवनात केलेली फुटवा विरळणी व लागवड केलेले रोपे उत्तम स्थितीत दिसून येतात व जल व मृद संधारण कामे केल्याने विहिरीतील पाण्याचा जलस्तर वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच राज्यस्तरीय विकास कामांतर्गत (डी.पी.सी) या योजनेत 4x1x1 च्या आकाराचे जलशोषक खंदक खोदल्याने पाणी जमिनीत साठवून राहण्याचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संयुक्त वन व्यवस्थापन समिती काळेवाडी यांची सभा घेऊन सर्व सभासद व स्थानिकांना आपल्या कामाबाबत अवगत करण्यात येते. स्वच्छता अभियान, सर्व शिक्षा अभियान, स्मशान भूमी, चराई बंदी, पाणी पुरवठा, तंटामुक्ती, कुऱ्हाड बंदी, वनमहोत्सव, ग्राम स्वच्छता, विविध विषयांवर जनजागृती आदी उपक्रम गावात राबविले जातात. वरील सर्व उपक्रमांचे गावाकरी योग्य त्या प्रकारे आचरण, करताना दिसुन येतात. या गावाचा भौगोलिक अभ्यास केला असता सदरची वाडी ही अंत्रट तर्फे वरेडी या महसूल गावात समाविष्ट असून अंत्रट तर्फे वरेडी गावाचे एकूण वनाचे क्षेत्र 42 हे. एवढे आहे.

सदरच्या एकूण वनक्षेत्रापैकी 40% हे. क्षेत्र वनाच्छादीत आहे. गावकऱ्यांच्या मेहनतीने व वन कर्मचाऱ्यांच्या नियोजनाने येथे वनाचे संरक्षण व संवर्धन उत्कृष्टरित्या झाल्यामुळे गावातील लोकांना इंधनासाठी सरपण, गुरांना चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन त्यांच्या गरजा भागू लागल्या आहेत. गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या समितीने आपल्या कार्यक्षेत्रात वनविषयाच्या योगदानाबद्दलचे काम उल्लेखनीय व प्रशंसनीय केलेले दिसुन येते व एक आदर्श ग्राम म्हणून लोकांसमोर यावे ही संकल्पना निर्माण झाली आहे.

जिल्हा स्तरीय निवड समितीने या गावातील ग्रामस्थांच्या कार्याची दखल घेतली. त्यांनी केलेल्या कामाची तालुकास्तरावर प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आणि जिल्हास्तरावर तशी शिफारस करण्यात आली. गावातील मंडळींनी ठरविले तर एखादा कायापालट ते करु शकतात. तसेच या काळेवाडी गावचे झाले. संत तुकाराम वनग्राम जिल्हास्तरीय अभियानाने याची दाखल घेतली व या गावास जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार दिला. त्या बद्दल सर्व ग्रामस्थांचे मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन.

 

-डॉ.राजू पाटोदकर जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

माहिती स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate