অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अटल विश्वकर्मा सन्मान योजना

अटल विश्वकर्मा सन्मान योजना

मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी 28 विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वय वर्षे 18 ते 60 वयोगटातील कामगारांनी मंडळाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. बांधकाम कामगारांच्या नावनोंदणीकरिता मंडळातर्फे दिनांक 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, नांदेड, परभणी, हिंगोली, चंद्रपूर, गोदिंया, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे गेल्यावर्षभरात 90 किंवा त्याहून जास्त दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, छायाचित्रासह ओळखपत्र पुरावा, बँक पासबुकचे सत्यप्रत, पासपोर्ट आकाराची तीन छायाचित्र, नोंदणी फी 25 रुपये, वर्गणी दरमहा रुपये 1 फक्त (रुपये 60 पाच वर्षाकरिता)

इमारत, रस्ते, मार्ग, रेल्वे, ट्रॉमवेज, एअर फील्ड, पाटबंधारे, जलनिस्सारण, बंधारे, नॅव्हिगेशन, पूर, टॉवर, कूलिंग टॉवर इत्यादी, नियंत्रण, धरणे, कालवे, जलाशय व जलप्रवाह, तेल व वायुच्या वाहिन्या, विद्युत वाहिन्या, बोगदे, पूल, सेतू व पाईपलाईन या कामाचे बांधकाम फेरफार, दुरुस्ती, देखभाल, किंवा पाडून टाकणे इत्यादी कामांचा समावेश आहे. याशिवाय खालील 21 कामांचा बांधकामाच्या व्याखेत समावेश करण्यात आलेला आहे. दगड फोडणे, लादी किंवा फरशी काम, रंगकाम व सुतार काम, नाले बांधणी आणि प्लम्बिंग, इलेक्ट्रीशियन इतर आणि विद्युत काम, अग्निशमन यंत्रणेचे काम, वातानुकूलित यंत्रणेचे काम, लिफ्ट आणि स्वयंचलित जिन्याचे काम, सुरक्षा उपकरणांचं काम, धातूच्या फॅब्रिकेशनचे काम, जलसंचयन आणि इतर काम, काचेशी संदर्भात काम, विटाचे आणि कौलांचे काम, सौर ऊर्जेशी निगडीत काम, स्वयंपाक घरातील आधुनिक उपकरणांचे काम, सिमेंट कॉक्रेटशी निगडीत काम, खेळ मैदान आणि जलतरण तलावाचे काम, माहिती फलक, सिंग्नल, बसस्थानके आणि प्रवासी निवासे इत्यादी बांधणे, उद्यानांतील कारंजे आणि इत्यादी बांधणे, सार्वजनिक उद्याने पादचारी पथ इत्यादींचे बांधकाम उपरोक्त सर्व कामांवरील बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करु शकतात.

शैक्षणिक सहाय्य योजना - नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांस पहिली ते सातवीसाठी 74 टक्के हजेरी असल्यास प्रतिवर्षी रुपये 2 हजार 500 व आठवी ते दहावीसाठी प्रतिवर्षी 5 हजार एवढे आर्थिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांस 10 वी ते 12 वी मध्ये 50 टक्के वा अधिक गुण प्राप्त झाल्यास रुपये 10 हजार एवढे प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांस 11 वी व 12 वी च्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी रुपये 10 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांस व पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके इत्यादीसाठी प्रतिवर्षी रुपये 20 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांस अथवा पत्नीस वैद्यकिय शिक्षणासाठी प्रतिवर्षी रुपये 1 लाख व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी रुपये 60 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांस शासनमान्य पदवी शिक्षणासाठी प्रतिवर्षी रुपये 20 हजार व पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रतिवर्षी रुपये 25 हजार एवढे शैक्षणिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांस संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेण्यासाठी प्रतिपूर्ती शुल्क दिले जाईल अथवा उत्तीर्ण असल्यास MS-CIT प्रमाणपत्र सादर करुन शुल्क मिळविता येईल.

आरोग्य योजना - नोंदित बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत विविध प्रकारच्या आजाराच्या उपचारांसाठी वैद्यकिय लाभ. नोंदित बांधकाम कामगराला अथवा त्याच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारासाठी रुपये 1 लाख एवढे वैद्यकिय सहाय्य. नोंदित बांधकाम कामगारास 75 टक्के अपंगत्व किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास रुपये 2 लाख एवढे अर्थसहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराच्या पत्नीस दोन जीवित अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी रुपये 15 हजार व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी रुपये 20 हजार एवढे आर्थिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराने अथवा त्याच्या पत्नीने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे 18 वर्षासाठी रुपये 1 लाख मुदत बंद ठेव. नोंदित बांधकाम कामगारांसाठी व्यवसनमुक्ती केंद्रांतर्गत उपचाराकरिता रुपये 6 हजार एवढे अर्थसहाय्य.

आर्थिक सहाय्य योजना - नोंदित बांधकाम कामगाराचा कामावर असताना अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास रुपये 5 लाख एवढे आर्थिक सहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कुटुंबास रुपये 2 लाख एवढे अर्थसहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराला घरखरेदी वा घरबांधणीसाठी बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रुपये 6 लाख पर्यंत व्याजाची रक्कम अथवा रुपये 2 लाख एवढे अर्थसहाय्य मंडळामार्फत मिळेल. नोंदित बांधकाम कामगाराला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत रुपये 2 लाख एवढे अर्थसहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास नामनिर्देशित वारसदारास अंत्यविधीकरिता रुपये 10 हजार एवढे अर्थसहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस अथवा पतीला सलग पाच वर्षे रुपये 24 हजार एवढे अर्थसहाय्य. नोंदित बांधकाम कामगाराला स्वत: च्या पहिल्या विवाहासाठी रूपये 30 हजार एवढे अर्थसहाय्य. बांधकाम कामागारांसाठी मध्यान्ह भोजन योजना राबविणे.

सामाजिक सुरक्षा व अन्य योजना - नोंदित बांधकाम कामगाराच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संच. नोंदित बांधकाम कामगारांना बांधकामाची उपयुक्त/आवश्यक अवजारे खरेदीसाठी रुपये 5 हजार एवढे अर्थसहाय्य. नोंदित बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना लागू करणे. नोंदित बांधकाम कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे. नोंदित बांधकाम कामगाराला सुरक्षेसाठी 'सुरक्षा संच' पुरविणे. नोंदित बांधकाम कामगाराला 'अत्यावश्यक वस्तू संच' पुरविणे. नोंदित बांधकाम कामगारांना पूर्व शिक्षण ओळख (RPL) प्रशिक्षण योजना लागू करणे. अधिक माहितीसाठी जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा. कोल्हापूर - 0231-2653714

अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत बांधकाम कामगारांची विशेष नोंदणी अभियान दिनांक 4, 5,6 व 7 जुलै 2018 रोजी कोल्हापूर शहर, दिनांक 9 व 10 जुलै 2018 रोजी करवीर, दिनांक 11 जुलै 2018 रोजी पन्हाळा / कोडोली, दिनांक 12 जुलै 2018 रोजी पन्हाळा/ कळे, दिनांक 13 जुलै 2018 रोजी कागल, दिनांक 16 जुलै 2018 रोजी कागल/ मुरगूड, दिनांक 17 व 18 जुलै 2018 रोजी इंचलकरंजी शहर, दिनांक 19 जुलै 2018 रोजी हातकणंगले, दिनांक 20 जुलै 2018 रोजी शिरोळ/ जयसिंगपूर, दिनांक 21 जुलै 2018 रोजी शिरोळ, दिनांक 23 जुलै 2018 रोजी चंदगड/ कोवाड, दिनांक 24 जुलै 2018 रोजी आजरा, दिनांक 25 जुलै 2018 रोजी गडहिंग्लज, दिनांक 26 जुलै 2018 रोजी गगनबावडा, दिनांक 27 जुलै 2018 रोजी शाहूवाडी / मलकापूर, दिनांक 30 जुलै 2018 रोजी गारगोटी, दिनांक 31 जुलै 2018 रोजी राधानगरी, दिनांक 1 ऑगस्ट 2018 रोजी राधानगरी (राशिवडे बुद्रुक), दिनांक 2 ऑगस्ट 2018 रोजी इंचलकरंजी शहर व दिनांक 3 व 4 ऑगस्ट 2018 रोजी कोल्हापूर शहर.

- एस.आर. माने

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate