অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शहरातील हागणदारीमुक्तीसाठी ‘गुड मॉर्निंग पथके’

शहरातील हागणदारीमुक्तीसाठी ‘गुड मॉर्निंग पथके’

उघड्यावर शौचास जाण्याची मानसिकता बदलविण्यावर देण्यात येणार भर.देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरिता या शहरामधील सर्व नागरिकांना शौचालयांची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ संपूर्ण देशामध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान (नागरी)’ च्या धर्तीवर राज्यामध्ये ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)’ ची अंमलबजावणी सुरु आहे. या अभियानांतर्गत शहरे ‘हागणदारी मुक्त’ करणे व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत ‘स्वच्छ’ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. राज्यातील संपूर्ण नागरी भाग 2 ऑक्टोबर 2017 पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्धार आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत शहरांमधील ज्या कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने ती कुटुंबे उघड्यावर शौचास जातात अशा 8.32 लक्ष कुटुंबांना वैयक्तीक घरगुती / सामुदायीक अथवा सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देवून शहरे हागणदारीमुक्त करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यानुसार, दि. 17 मे पर्यंत राज्याच्या नागरी भागात एकूण 3.90 लक्ष वैयक्तीक शौचालयांची बांधकामे पूर्ण झाली असून, सुमारे 1.91 लक्ष वैयक्तीक शौचालयांची बांधकामे सुरु आहेत. तसेच स्थानिक आवश्यकतेनुसार सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात आली असून गरजेप्रमाणे आणखी बांधकामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत राज्यातील सुमारे 200 शहरे राज्यस्तरीय समितीमार्फत तपासणी केल्यानंतर हागणदारीमुक्त घोषित करण्यात आली आहेत.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) चा प्रमुख उद्देश उघड्यावरील शौचविधी बंद करणे हा आहे. त्यानुसार शहरे हागणदारीमुक्त घोषित झाल्यानंतर सदर हागणदारी मुक्तीचा दर्जा संबंधित शहराने आगामी काळात शाश्वतरित्या टिकविणे अभियानाच्या फल निष्पतीसाठी अत्यावश्यक आहे. काही प्रमाणात नागरिकांची उघड्यावर शौचास जाण्याची सवय अजूनही निदर्शनास येत असल्याने त्यांच्या सवयीत, मानसिकतेमध्ये बदल घडविण्यासाठी माहिती, शिक्षण, संवाद व जनजागृती इ. माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‘गुड मॉर्निंग’ पथकांची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या ‘गुड मॉर्निंग’ पथकात स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील बचत गटांचे प्रतिनिधी, हागणदारी मुक्तीबाबत काम केलेल्या / या विषयात आवड असणारे विद्यार्थी, स्थानिक गरजांनुसार विविध समाज घटकांचे / सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.

हे ‘गुड मॉर्निंग’ पथक सकाळी शहरात फिरुन नागरिकांची उघड्यावर शौचास जाण्याची सवय बंद करण्याकरिता त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उघड्यावर शैाचास जाताना आढळणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करुन त्यांच्या वर्तनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत शहरातील नागरिकांची उघड्यावर शौच करण्याची सवय पूर्णत: बंद होत नाही, तोपर्यंत नागरिकांमध्ये जनजागृती करुन त्यांच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहणार आहे. हे ‘गुड मॉर्निंग’ पथक २ ऑक्टोबर २०१७ पर्यंत दररोज सकाळी शहरात फिरुन नागरिकांची उघड्यावर शौचास जाण्याची सवय बंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

‘गुड मॉर्निंग’ पथकास शहरात उघड्यावर शौचास जाणारे लोक आढळल्यास, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेने कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना शौचालय बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तथापि शौचालयाचे बांधकाम करण्यात आलेले नाही, अशा लाभार्थ्यांना शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शौचालयाचे बांधकाम पूर्ण आहे तरीही उघड्यावर शौच विधी करतात अशा व्यक्तींचे प्रबोधन करुन त्यांना उघड्यावर शौचास जाण्यापासून परावृत्त करण्यात येणार आहे. तरीसुद्धा अशा व्यक्ती वारंवार उघड्यावर शौचास जाताना आढळल्यास अशा व्यक्तींवर प्रचलित नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

संकलन - जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 7/27/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate