অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘स्त्री’ प्रेरणा शक्तीचे नवे रुप ‘संत मुक्ताई’

‘स्त्री’ प्रेरणा शक्तीचे नवे रुप ‘संत मुक्ताई’

स्त्री शक्तीच्या जोरावर ज्यांनी तेराव्या शतकातही आपल्या साहित्य कृतीतून परंपरेच्या जोखडातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला. स्त्री जन्म येऊनही उदास होऊ नये असे ती ठामपणे सांगते. इतका आत्मविश्वास तिच्या बोलण्यात दिसतो. त्या म्हणजे संत मुक्ताबाई. त्यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या साहित्य आणि जीवनपटाचा हा सारांशरुपात घेतलेला आढावा.

‘स्त्री जन्मा तुझी कहाणी’ असं म्हणून स्त्रियांच्या वाट्याला आलेले खडतर जीणं त्यांच्या साहित्यकृतीतून उमटत राहते. ज्ञानियाचा राजा म्हणून ज्यांची ख्याती आहे, त्या ज्ञानदेवांची मुक्ताई ही धाकली बहीण. पैठणपासून जवळ असलेल्या आपेगावचे त्र्यंबकपंत कुलकर्णी हे मुक्ताईंचे पणजोबा आणि गोविंदपंत हे आजोबा. ते नाथपंथाचे अनुयायी आणि कृष्णभक्त होते. वडील विठ्ठलपंत, मुक्ताईची आई रुख्मिणी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान असा हा त्यांचा परिवार होता. जेव्हा विठ्ठलपंत संन्यासी जीवन सोडून गृहस्थाश्रमात प्रवेश करतात तेव्हा धर्मांध लोकांच्या छळाला त्यांना सामोरे जावे लागते. आपल्या मुलांना समाजाने स्वीकारावे म्हणून मुक्ताईचे आई वडील देहांत प्रायश्चित घेतात. या प्रसंगानंतर विकल झालेल्या ज्ञानेश्वरांना ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरां’ असं धीराने सांगते. त्या कुटुंबाचा आधारवड होत्या. आपलं बालपण विसरून त्या कुटुंबाची ती आई होते.

आपल्या अभंगातून जगण्याचे बोधामृत त्यांने दिले आहे. आपल्या कर्तव्यापासून ढळणाऱ्या आपल्या दादाला त्याच्या भूमिकेचे स्मरण करून देते. त्यांच्या या प्रेरणेतून विश्वाला ‘ज्ञानेश्वरी’ मिळाली. मुक्ताईचे ताटीचे अभंग आजही काळाशी सुसंगत आहेत. ताटीच्या अभंगातून ती मनाचे दरवाजे उघडून जगाच्या कल्याणासाठी कसं झिजावे याचा नवा मार्ग सांगते. अहंकार विरहीत जगण्याचा मोलाचा संदेश त्यांच्या अभंगातून मिळतो. घातक रुढी परंपरेला ती विरोध करते. ज्ञानावर प्रगाढ विश्वास असणारी ती गुरुकडून ज्ञान मिळवायला हवं असे आवर्जून सांगते. जगाला बंधुत्वाची शिकवण देताना समतेच्या वाटेवर समाजाला नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भक्तीला ज्ञानाची जोड द्यायला हवी पण त्याचा अहंकार मात्र येता कामा नये. आध्यात्मिक प्रगती म्हणजे माणूसपणाच्या वाटेवर चालणे होय. त्यांने मांडलेले अभंग हे धार्मिक, सामाजिक, विकासाचे नवे प्रतिबिंब आहे. स्त्री शक्तींचा सन्मान आणि तिला अधिकारवाणीनं जगण्याचा हक्क आहे हे त्या काळातही ती ठणकावून सांगते.

सामाजिक समतेच्या दृष्टीने विचार करता मुक्ताई आजच्या पिढींची प्रतिनिधी आहे. सामाजिक भेदाभेद असतानाही प्रबोधनाच्या वाटेवर चालणारे विचार मांडणे हा धैर्याचा भाग म्हणावा लागेल. त्यांनी ज्ञान, समता आणि विषमतेवर प्रहार करत एका अथांग तत्वज्ञानाची ओळख जगाला आपल्या अभंगातून करून दिली आहे. अध्यात्म, विज्ञान आणि विवेकानुसार वाटचाल करताना आजच्या घडीला मुक्ताईचे विचार आवश्यक वाटतात. परंपरेचा आणि आपल्या महान संस्कृतीचा आदर करताना मुक्ताईच्या पुण्यतिथीनिमित्त घेतलेला त्यांच्या विचारांचा मागोवा आपल्याला निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

लेखक: सचिन के. पाटील

मोबा. ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 9/4/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate