অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गडचिरोलीतील गावकऱ्यांचा नक्षल्यांविरूद्ध एल्गार

गडचिरोलीतील गावकऱ्यांचा नक्षल्यांविरूद्ध एल्गार

नक्षल सप्ताहात ग्रामस्थांकडून पुतळे व बॅनर जाळून नक्षलवादाचा निषेध

आपल्या राज्याच्या एका टोकावर असलेल्या, तसेच छत्तीसगढ व तेलंगणा या दोन राज्यांच्या सिमेला लागून असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात 1980 च्या दशकात नक्षलवाद्यांनी प्रवेश केला. आदिवासी बांधवांना तेंदुपत्ता ठेकेदारांकडून मिळत असलेला मजुरीचा अत्यल्प मोबदला व आदिवासींवर होत असलेले अत्याचार हे दोन मुद्दे घेऊन नक्षलवाद्यांनी आदिवासी बांधवांची दिशाभूल करून त्यांना या हिंसक चळवळीत सहभागी करून घेतले. आम्हीच तुमचे तारणहार असल्याच्या नक्षल्यांच्या खोट्या भुलथापांना बळी पडून, बंदुकीच्या भितीमुळे गावकऱ्यांची नक्षल्यांना साथ मिळाली. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षल चळवळ फोफावली. या काळात दिशाभूल झालेल्या अनेक आदिवासी तरूण-तरूणींचा ओढा नक्षलवादाकडे वळू लागला. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नक्षल्यांच्या संख्येत वाढ झाली. याचवेळी शासनाकडून तयार करण्यात येणारे रस्ते व विविध विकास कामांना नक्षल्यांनी सातत्याने विरोध करून हिंसेला सुरूवात केली. परिणामी नक्षल्यांकडून विकास कामांना विरोध होत असल्याने मागील अनेक वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव विकासापासून वंचित राहिले.

आदिवासी बांधवांचे तारणहार असल्याचा कांगावा करणाऱ्या या नक्षलवाद्यांचा खरा चेहरा मागील काही वर्षात जनतेपुढे येऊ लागला आहे. माओवादी दरवर्षी बंद पाळतात, मात्र त्याने काहीच साध्य होत नाही. उलट नागरीकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. नक्षलवादी बंदुकीच्या धाकावर आदिवासी बांधवांना हिंसा करण्यास बाध्य करतात. त्यामुळे अनेक विकास कामाचा खोळंबा होतो. तसेच पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप ठेवून नक्षल्यांकडून गावातील निरपराध सामान्य नागरीकांच्या क्रुर हत्या करणे, ठेकेदारांकडून खंडणी वसुली करणे, लोकांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्यावर अत्याचार करणे, विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, आदिवासी बांधवांना जबरीने नक्षल दलामध्ये भरती करून हिंसा घडवून आणणे इत्यादी कारणांमुळे आदिवासी बांधवांच्या मनात नक्षल्यांविरूद्ध रोष निर्माण होऊ लागला. केवळ जिवे मारण्याच्या भितीपोटीच या भागातील जनता नक्षल्यांना साथ देत होती.

मात्र मागील काही वर्षात पोलीस प्रशासन व शासनाच्या प्रयत्नामुळे गडचिरोली जिल्ह्याचे चित्र बदलू लागले आहे. पोलीस व प्रशासन विविध दुर्गम भागात पोहचून तेथील आदिवासी बांधवांना विश्वासात घेऊन नागरीकांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या गावांना विजेच्या माध्यमातून प्रकाश मिळाला आहे. अनेक दुर्गम भागात रस्ते व पुल बांधकामाला गती देण्यात आली आहे. पोलीस प्रशासन व शासनाकडून जनजागरण मेळावे व ग्राम भेटीच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सातबारा, रेशन कार्ड, वाहन परवाने, रोजगार प्रशिक्षण, शिक्षणासाठी मदत, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरीकांचा पोलीस व शासनावर विश्वास वाढू लागला आहे. त्यामुळे सध्याचे चित्र बदलू लागले आहे. नक्षल्यांनी दिशाभूल करून विकासापासून वंचित ठेवल्याची जाणीव आदिवासी बांधव व नागरीकांमध्ये निर्माण झाल्यामुळे आता नक्षलवादाला मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागल्याचे यंदाच्या नक्षल सप्ताहाच्या निमित्ताने पुढे आले आहे.

त्यातच खोट्या आमिषाला बळी पडून आपले गाव सोडून नक्षल्यांना साथ देणारे तरूण-तरूणी शासनाच्या आत्मसमर्पण योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत 591 भरकटलेल्या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून लोकशाही प्रवाहात प्रवेश केल्यामुळे नक्षल्यांच्या चळवळीला मागील काही वर्षात मोठा हादरा बसला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधव व नागरीक जागृत झाल्यामुळे आपल्या मुलांना इतर शहरांमध्ये शिक्षणासाठी पाठवू लागल्यामुळे, तसेच अनेक मुलांना शासनाद्वारे आश्रमशाळेत शिक्षण मिळत असल्याने नक्षल दलामध्ये काम करण्यासाठी तरूण-तरूणींची भरती करणेही नक्षल्यांना कठीण झाले आहे. नक्षल्यांच्या हिंसक कृत्यामुळे गावाचा विकास होत नसल्यामुळे अनेक गावांनी नक्षल्यांना गावबंदी केली आहे.

नोटाबंदीमुळे नक्षल्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून नवीन आर्थिक रसद मिळविण्याचा नक्षली प्रयत्न करीत आहेत. मे महिन्यात तेंदुपत्ता कंत्राटदाराच्या माध्यमातून नक्षल्यांना आर्थिक रसद पुरविणाऱ्या 5 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून 75 लाख रूपये रोख व इतर मुद्देमाल असा एकूण 81 लाख 13 हजार 700 रूपयांचा मुद्देमाल, तसेच नक्षली विचारांचे छापील पत्रके जप्त करण्यात आली. जुलै महिन्यात बाद झालेल्या चलनी 1 करोड 23 लाख रूपयांच्या चलनी नोटा बॅंकेत भरणा करून नक्षल्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे नक्षल्यांना आर्थिक रसद पोहोचली नाही. तसेच पोलीस नक्षल विरोधी अभियान राबवित असताना जुलै महिन्यात 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

नक्षली हे स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध हिंसक कारवाया करून शहीद सप्ताह साजरा करतात. या काळात नक्षलवाद्यांकडून पोलीस बातमीदार, आत्मसमर्पित नक्षलवादी, सामान्य नागरीक यांच्या हत्या करणे, शासकीय व खाजगी मालमत्तेची जाळपोळ करून नुकसान करणे, अतिमहत्वाचे व्यक्ती, अधिकारी/कर्मचारी, लोकप्रतिनिधी यांचे अपहरण करणे, पोलीस पथकावर हल्ला, भूसुरुंग स्फोट, मुख्य रस्त्यावरील झाडे तोडून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी हिंसक घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करतात.

मागील काही महिन्यातील आक्रमक व यशस्वी पोलीस कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन नक्षलवाद्यांनी आपली रणनिती बदलवून शासनविरोधी कार्य करण्याची योजना आखली होती. नक्षलवाद्यांची आक्रमक योजना पाहता शहीद सप्ताहादरम्यान शासकीय व खाजगी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, तसेच प्राणहानी होऊ नये, याकरीता पोलिसांनी आपली विशेष रणनिती आखली होती. त्यामुळे नक्षलवादी काहीही करू शकले नाहीत.

पोलिसांनी नक्षल सप्ताहाअगोदरच नागरीकांमध्ये जनजागृती केल्याने यंदाच्या 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2017 या कालावधीत राबविलेल्या नक्षल सप्ताहात अतिसंवेदनशील असलेल्या अहेरी, कुरखेडा, भामरागड, एटापल्ली आदी तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांनी नक्षल्यांना तीव्र विरोध केला.

नक्षल सप्ताह सुरू होण्याअगोदर गडचिरोली पोलिसांनी विविध गावांमध्ये जावून नागरीकांमध्ये जनजागृती केल्याने 21 जुलै 2017 रोजी अहेरी तालुक्यातील उपपोलीस स्टेशन दामरंचा हद्दीतील जिमलगट्टा अंतर्गत 13 भरमार बंदुका ग्रामस्थांनी पोलिसांकडे जमा करून नक्षलवादाचा निषेध नोंदविला. त्यामुळे या नक्षल सप्ताहापूर्वीच पहिला हादरा नक्षल्यांना बसला. 25 व 28 जुलै 2017 रोजी धानोरा तालुक्यातील पेंढरी अंतर्गत गोडलवाही पोलीस मदत केंद्र येथे कोदावाही ग्रामस्थांनी 13 भरमार बंदुका जमा करून नक्षल्यांचा निषेध नोंदविला. 27 जुलै 2017 कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्र येथे 3 भरमार व 1 बारा बोर बंदुक ग्रामस्थांनी जमा करून नक्षल शहीद सप्ताहाला विरोध केला. 29 जुलै 2017 रोजी भामरागड तालुक्यातील भामरागड पोलीस स्टेशन अंतर्गत ग्रामस्थांनी 8 भरमार बंदुका जमा करून नक्षल्यांचा निषेध नोंदविला.

मरकेगाव भागातील सावरगाव गॅरापत्ती रोडवर नक्षलवाद्यांकडून बॅनर लावून नक्षल सप्ताह पाळण्याचे नागरीकांना आवाहन करण्यात आले होते. नागरीकांनी नक्षल्यांविरुद्ध एकजुट दाखवून नक्षल्यांनी लावलेले बॅनर स्वतः काढून रस्त्यावर टाकून जाळून नक्षल्यांचा निषेध केला. तसेच नक्षलवाद्यांनी पुकारलेला बंद पाळून आमचा विकास का थांबवायचा असा परखड सवाल करीत गावकऱ्यांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांविरोधात आवाज उठविला. ज्या मरकेगाव भागात 2009 या वर्षी नक्षलवाद्यांनी हिंसा घडवून 15 पोलीस जवानांना मारले त्याच भागात आता सामान्य आदिवासींकडून नक्षलवाद्यांना विरोध करण्यात येत आहे.

पेंढरी भागातील दोरगट्टा-दुर्गापूर रोडवर दोरगट्टा, दुर्गापूर, मासानदी, रूपिनटोला, हटझर, खरगी, संभलपूर, पळसगाव येथील गावकऱ्यांनी नक्षलवाद्यांचा पुतळा व नक्षल समर्थनाचे लावलेले बॅनर जाळून नक्षल सप्ताहाला विरोध दर्शवून निषेध नोंदविला. यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येऊन चातगाव एलओएस कमांडर जोगन्नाचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविला. एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावातील लोकांनी नक्षल्यांना विरोध करून गावाच्या बाहेर उभारण्यात आलेले नक्षल स्मारक तोडले. यावेळी ग्रामस्थांनी नक्षल्यांच्या बंदला कुठलाही प्रतिसाद न देण्याचा तसेच जिल्ह्यातील नक्षलवादाचा समुळ उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नक्षली नेत्यांचा ढोंगीपणा आणि चळवळीचा फोलपणा आदिवासी बांधवांच्या लक्षात आला आहे. शासनाचे सर्वंकष विकासात्मक धोरण आणि पोलिसांची सामाजिक भूमिका यामुळे येत्या काळात नक्षलवादाचा समुळ नायनाट होऊन गडचिरोली जिल्ह्यात लोकशाहीतील विकासाचा प्रवाह येईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

लेखक: शरद शेलार

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate