অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुढीपाडवा !

गुढीपाडवा !

गुढीपाडवा !
मानवी जीवनात सुचिता, पावित्र्य, मांगल्य, प्रेम, दया, क्षमा, सहानुभूती, शांती यांची बीजे पेरली जावीत म्हणून आमच्या पूर्वजांनी सणांची निसर्गाशी उत्कृष्ट सांगड घातली आहे. वास्तविक पंचमहाभूते ही एकमेकांची भक्ष्यं आहेत. परंतु एक निसर्गसत्ता अशी आहे की हा विरोधाभास विसरायला लाऊन सर्वांना गुण्या गोविंदाने एकत्र नांदविते. सर्व जीव जीवाचे भक्ष्य असले तरी या सृष्टीत शत्रुभाव सोडून मैत्रभावाने, प्रेमाने जगले पाहीजे. जगा आणि जगवा यात प्रेम, दया, क्षमा, शांती, समता, बंधुता, सहनशीलता व एकता ही प्रधान मूल्ये आहेत. आपणांस ज्या शक्ती निसर्गाकडून प्राप्त होतात त्यांचा विघातक वापर न करता विधायक उपयोग करणे हा धर्म होय. समाज सुसंस्कारित राहावा म्हणून धर्म. समाजशकट नीट चालावा म्हणून धर्म. व्यक्तीव्यक्तीचे सद्चारित्र्य घडावे म्हणून धर्म. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि सन्यासाश्रमांतील निहित कर्म म्हणजेच धर्म. का कोण जाणे परंतु जास्तीत जास्त सारे माझे, मी मोठा, माझा वर्ण मोठा, माझी जात मोठी असे म्हणून आम्ही नसलेले भेदभाव जन्माला घातले. त्याचा परिणाम म्हणून परकियांनी आमच्यावर प्रदीर्घकाळ राज्य केले. त्यामुळे आम्ही विसरलो राजा हरिश्चंद्राला, विसरलो प्रभू रामचंद्रांना, विसरलो युगंधराला, विसरलो ज्ञानेश्वर माऊलीला आणि त्यांच्या अमृतातेही पैजा जिंकणार्‍या मराठीला. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री बेहोश होऊन नाचणारे आम्ही विसरलो गुढीपाडव्याला. मनातील वाईट विचारांचे, किल्मिषांचे आणि दुर्वासनांचे होलीकोत्सवात दहन करुन पवित्र झालेल्या अंत:करणात मांगल्याची गुढी उभारली की त्याच पवित्र अंत:करणात रामनवमीला प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यानंतर चैत्र पोर्णिमेला त्यांचे शिष्योत्तम हनुमान अवतरतात. चैत्र शुक्लपक्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा हा नववर्षाचा आरंभ दिवस. हा दिवस आध्यात्मिक, धार्मिक, ऐतेहासिक, सामाजिक आणि खगोलीय अशा सर्वच दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा दिवस आहे. शालीवाहन या चारित्र्यसंपन्न राजाने आपल्या राज्यावर आलेले परचक्र परतऊन लावण्यासाठी मातीचे सैन्य तयार केले. त्यांना चेतन करुन युद्ध केले व परचक्रापासून साम्राज्य वाचविले. याचा अर्थ असा की एरवी मुर्दाड भासणार्‍या हाडामांसाच्या सामान्य माणसांत शालीवाहन राजाने राष्ट्रभक्तीचे स्फूलिंग चेतविले. प्रभू श्रीरामचंद्रांसाठी वानरसेना लढली याचाही अर्थ हाच आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्यामुखी वेद वदविले याचा मतितार्थही तोच. राष्ट्रभक्तीने पेटून उठलेली सामान्य जनता काय करु शकते हे शिवरायांच्या आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात दिसून आले आहे. फक्त असे स्फूलिंग चेतविणारा निर्माण व्हावा लागतो. गुढीपाडवा हा सत्ययुगाचा, विक्रम संवत्सराचा आणि शालीवाहन शकाचा आरंभ दिन आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सारे अंतर्मूख होऊ या. घराघरांवर आणि मनामनांत सद्गुणाच्या, सद्विचाराच्या आणि राष्ट्रभक्तीच्या उत्तुंग गुढ्या उभारुन मातृभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न करु या.
सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर,
भ्रमणध्वणी: ९७६३६२१८५६
.......................................................................................

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate