অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाण्याचे संकट...

पाण्याचे संकट...

मुख्यमंत्र्यांनी काल धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी वापरा, असा आदेश देवून भावी संकटाची कल्पनाच करुन दिली आहे. दरवर्षी जून महिन्यात पडणारा मान्सून यावेळेला दिशा भरकटल्यामुळे दुसर्याच दिशेला निघून गेला आहे आणि यामुळे महाराष्ट्र पाण्याविना कोरडा पडेल काय...अशी साधारण भिती फक्त शेतकर्याच्याच नव्हे तर शहरातील राहणाऱ्या नागरिकांच्या मनातही निर्माण झाली आहे. जवळपास सर्वच धरणातील पाणी हे संपण्याच्या अवस्थेत येवून पोहोचले असून याचा परिणाम वाढती महागा‌ई, वीज टंचा‌ईचे संकट आणि पिण्याच्या पाण्याची वानवा असे तिहेरी रुपात समोर उभे ठाकरणार आहे. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ही वेधशाळेने ६ जूलैपासून पुन्हा मान्सून सक्रीय हो‌ईल आणि तो मागील तूट भरुन काढत जवळपास सरासरी गाठेल असा अंदाज व्यक्त करुन त्यातल्या त्यात दिलासा दिला आहे. वेधशाळेचा अंदाज खरा ठरो, अशीच प्रत्येकाची इच्छा आणि प्रार्थना असणार आहे. ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या न्यायाने आम्ही दरवेळी पावसाची प्रतिक्षा करतो. पा‌ऊस वेळेत आला आणि नेहमीप्रमाणे पडला तर पाण्याचेही काही नियोजन करण्याची गरज आहे याचा आम्हाला विसर पडतो आणि आम्ही मुक्तपणे पाण्याचा वापर करत राहतो. आम्हाला पाण्याचे संकट आणि महत्व हे दुष्काळ आल्यावरच कळते आणि त्यातही आमचे राजकीय नेते हे प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्यात चतूर असल्यामुळे ते याही संकटाचा राजकीय फायदा उठविण्याच्या प्रयत्नाला लागतात. या पलिकडे जावून पाणी हा राष्ट्रीय प्रश्न आहे आणि त्याचा पक्ष, पंथ, मतभेद विसरुन विचार केला पाहिजे असे आम्हास का वाटत नाही हा खरा प्रश्न आहे. राज्याराज्यातील पाणी वाटपावरून होणारे भांडणे आणि वाद हे आता आमच्याकडे नित्याचे झाले आहे.

पेयजल, सांडपाणी आणि शेती, उद्योगांना दिल्या जाणार्‍या पाण्याची व्यवस्था किफायतशीर, टिकाऊ व देखभालीस सोपी असली पाहीजे. देशभरातील जलवाहिन्यांमधून, कालव्यांमधून ५० ते ६० टक्के पाण्याची गळतीमधून नासाडी होते. सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर झाला पाहीजे. मोक्षगुंडम विश्वेश्वरया यांनी उर्जेचा कमीत कमी वापर होईल असा गुरुत्वाकर्षणाधारित कल्पक पाणी व्यवस्थापन आराखडा दिला होता. नगरची खापरी नळांद्वारे पाणी पुरवठा करणारी यंत्रणाही अभ्यासण्यासारखी आहे. जयंत वैद्द यांनी सलग समतल चराचा वापर करुन पाणी वळवण्याचा कल्पक प्रस्ताव पाच वर्षांपूर्वीच शासनाला सादर केला आहे. कळसुबाईच्या हरिश्चंद्रगड भागातून एक मीटर रुंद व खोल समतल पातळीवर चर खोदल्यास तेथील पाणी गुरुत्वाकर्षणानं थेट मराठवाड्याच्या तेरणा नदीत सोडता येईल. इच्छाशक्ती पाहीजे.

अटलबिहारी सत्तेत असताना त्यांनी नदीजोड प्रकल्पाची अतिशय उपयुक्त योजना मांडली होती. सुरेश प्रभुंसारख्या अभ्यासू व्यक्तीमत्वाने त्याची सांगोपांग योजनाही तयार केली होती पण तेवढ्यात वाजपेयींचे सरकार सत्ताहिन झाले आणि नंतर आलेल्या सरकारने ती ‘वाजपेयीं’ची योजना आहे या राजकीय द्वेषातून ती योजनाच गुंडाळून ठेवली. आमच्याकडे विद्युत निर्मितीनंतर वाहून जाणारे पाणी चिपळूनमार्गे सरळ समुद्राला जावून मिळते. यावर काही तोडगा काढून हे पाणी युद्धपातळीवर योजना आखत मुंब‌ईपर्यंत नेवून पोहोचविता आले तर या महानगराचा पाण्याचा प्रश्न सुटू शकेल. याचकाळात लातूरच्या एका अभियंत्याने सह्याद्रीच्या घाटावर कोकणच्या दिशेने एक सबंध समतल कालवा खणावा आणि तो बोगद्यावाटे पश्चिम महाराष्ट्रात आणून सोडावा. ते पाणी वेगवेगळ्या धरणांना जोडून हे अतिरिक्त पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भाग आणि मराठवाड्यापर्यंत नेवून पोहोचवावे, अशी अतिशय उपयुक्त योजना सुरेश प्रभुंपुढे मांडली होती. पण आम्हाला पर्जन्याचे महत्वच कळत नसल्याने या सार्‍याच योजना आम्ही बासनात गुंडाळून ठेवल्या. याबरोबरच सिंचन घोटाळ्यासारखे घोटाळे करुन आम्ही पाणी साठवण्याचे आमचे रस्ते बंद करुन टाकले. ऊसासारख्या शेतीवर आम्ही सिंचनाचे ७० टक्के पाणी खर्च करतो. ऊसामुळे एका विविक्षित भागातील शेतकरी हा सधन आणि सुपीक झाला असला तरी जिरायती शेतीचीही काळजी शासनाने घेणे गरजेचे असल्यामुळे भविष्यात तरी योग्य नियोजन आखून ऊसाच्या शेतीला ठिबक सिंचनाची योजना ही अनिवार्य ठरवावी. ही योजना जरी अस्तित्वात आली तरी किमान ५० टक्के पाणी वाचू शकेल. ज्याचा वापर अन्य दुष्काळी भागांना आणि नगरे आणि महानगरांना पिण्यासाठी होवू शकेल. संकट ही संधी मानत त्याचा वापर आम्ही आमच्या विकासासाठी आणि दीर्घकालिन पाणीपुरवठ्याच्या योजना आखण्यासाठी केला तर या संकटातून आम्ही शहापपण शिकलो असे म्हणता ये‌ईल. अन्यथा जुलैमध्ये पा‌ऊस पडेल, धरणात बर्‍यापैकी पाणी साठेल आणि आम्ही पाण्याचे संकट विसरुन जावून पुन्हा जुन्या मार्गानेच वाटचाल करत राहू. यावेळी तरी योग्य तो शहापणा शासनाला सुचेल आणि शासन त्या मार्गावरुन वाटचाल करेल एवढीच अपेक्षा करणे सर्वसामान्यांच्या हाती आहे.

सोमनाथ देविदास देशमाने,
अहमदनगर.
भ्रमणध्वनी: ९७६३६२१८५६

अंतिम सुधारित : 5/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate