অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

''फिफा''ने उजळणार नवी मुंबईची प्रतिमा

''फिफा''ने उजळणार नवी मुंबईची प्रतिमा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” या कार्यक्रमामध्ये क्रिकेटला  जेवढे महत्व दिले जाते, तेवढे फुटबॉलला दिले जात नाही अशी खंत व्यक्त केली होती. यामध्ये त्यांनी प्रधानमंत्र्यांनी देशात होणाऱ्या फिफा फुटबॉल वर्ल्डकपचे महत्वही सांगितले. 17 वर्षांखाली खेळाडुंसाठी आयोजित फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या होणाऱ्या सामन्यांच्या आयोजनामुळे आता नवचैतन्य निर्माण झाले आहे. राज्यात नवी मुंबईतील नेरुळ येथील डी.वाय.पाटील या स्टेडियममध्ये काही सामने होणार आहेत. यामुळे नवी मुंबईला जागतिक पातळीवर मानाचे स्थान मिळणार आहे.

सर्वाधिक देशात खेळला जाणारा व सर्वात लोकप्रिय, शारिरिकदृष्ट्या उत्तम असणारा फुटबॉल खेळ हा नवी मुंबईत होणार असल्याने क्रिडाप्रेमी युवा वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. यावर्षीचा या स्पर्धा आयोजनाचा मान फिफाने भारताला दिल्याने ही एक अभिमानास्पद बाब आहे.

फिफा विश्वचषक 2017 च्या निमित्ताने नुकताच महाराष्ट्रात मिशन-1 मिलियन या फुटबॉल खेळाचा महोत्सव पार पडला. त्यात मुंबईतील अनेक शाळांचे विद्यार्थी, अंध विद्यार्थी, मुंबईचे डबेवाले, क्रिडा आणि राजकीय पत्रकार यांच्यात सामने झाले. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र फुटबॉलमय झाला आहे आणि अशा फुटबॉलमय वातावरणात ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईतील नेरुळ येथील डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये काही सामने होणार असल्याने त्या अनुषंगाने काम करण्यास नवी मुंबई सज्ज झाली आहे. जिच्या प्रतिक्षेत आपण सर्वजण होतो ती फुटबॉल स्पर्धा काही दिवसावर येऊन ठेपली आहे. यामुळे देशभरातील चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या निमित्ताने देशभरात फुटबॉल पोषक वातावरण निर्माण होत असून हा खेळ देशातील कानाकोपऱ्यामध्ये रुजण्यासाठी निश्चितच जोराने तयारी सुरु आहे.

नेरुळ भागात विविध कामे सुरु झाली आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे, रस्त्यांचे दुभाजक, दुभाजकांमधील हिरवळे, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदी गोष्टींची डागडुजी करणे किंवा नुतनीकरण करण्याच्या कामावर पालिकेमार्फत भर दिला जात आहे. फुटबॉलचे सराव सामने महानगरपालिकेच्या सेक्टर-19 नेरुळ येथील यशवंतराव चव्हाण मैदान आणि वाशी येथील एन.एम.एस.ए. मैदान याठिकाणी होणार असून यशवंतराव चव्हाण मैदानाचे सुशोभिकरण केले जात आहे.

नेरुळमध्ये येणाऱ्या मार्गांची डागडुजी करण्याचे सुरु केले आहे. याचबरोबर पामबीच मार्गावर सर्फेसिंगचे काम सुरु करण्यात आले आहे. तसेच भारती विद्यापीठाच्या आर्ट विभागाचे विद्यार्थी नेरुळ आणि वाशीमधील उड्डाणपूल, शहरातील महत्वाच्या चौकातील भिंतीवर रंगरंगोटी करीत असून फुटबॉल खेळाचे आकर्षक दृश्य काढत आहेत. बंद पथदिवे बदलण्यात येणार असून रस्त्यांवरील दुरवस्था झालेल्या दुभाजकांच्या दुरुस्तीचे काम सुरु केले आहे. उड्डाणपुलावरील दुभाजकांवर शोभेची झाडे असलेल्या आकर्षक कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच नेरुळ, वाशी, डी.वाय.पाटील अशा शहरांतील 10 ठिकाणांहून फुगे सोडण्यात येणार येणार आहेत. त्यादृष्टीने सुशिभिकरण करण्यात येणार आहे.

एखादी प्रतिष्ठेची फिफा फुटबॉल स्पर्धा भारतात होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने यामुळे साहजिकच देशभरात उत्सुकतेचे वातावरण आहे. या स्पर्धेतील सामने गोवा, गुवाहाटी, कोची, कोलकात्ता, नवी मुंबई, दिल्ली येथे होणार आहे. नवी मुंबईत 6, 9 आणि 12 ऑक्टोबर या दिवशी प्रत्येकी दोन सामने, 18 ऑक्टोबर रोजी राऊंड ऑफ सिक्स्टीन मॅच, 25 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. नवी मुंबईत होणारे आठ सामने बघण्यासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून फुटबॉलप्रेमी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे येणारे यजमानाचे स्वागत करण्यास नवी मुंबई सज्ज झाली आहे. या खेळाचे थेट प्रक्षेपण बाहेरील देशामध्ये होणार असल्याने 21 व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून नावाजल्या जाणाऱ्या नवी मुंबईची प्रतिमा संपूर्ण जगभरात उजळून निघणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितले आहे की, फुटबॉल खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष प्रयत्न केले आहेत.

लेखिका: रेश्मा वाघ

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate