অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लहू काळे शेतकरी, ग्रामीण जीवनाचे व्‍यंगचित्रकार

लहू काळे शेतकरी, ग्रामीण जीवनाचे व्‍यंगचित्रकार

शेतकरी आणि ग्रामीण जीवन हे मुख्‍य सूत्र डोळ्यासमोर ठेवून लहू काळे सातत्‍याने व्‍यंगचित्र रेखाटत आहेत. या विषयावर त्‍यांनी साडेतीन हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे रेखाटली आहेत. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्राचे आणखी एक वैशिष्‍ट्य म्‍हणजे त्‍यांनी शेतकरी आत्‍महत्‍येवर एकही व्‍यंगचित्र रेखाटलेले नाही. सामाजिक प्रबोधन आणि जागृती या मुख्‍य हेतूनेच त्यांच्‍या व्‍यंगचित्रकलेचा प्रवास चालू आहे.

व्‍यंगचित्रकार आणि सर्वसामान्‍य माणूस यांच्‍यात खरा फरक म्‍हणजे सभोवताली जे काही दिसते ते चित्ररुपाने मार्मिकपणे मांडण्‍याची अनन्‍यसाधारण क्षमता व्‍यंगचित्रकारात असते, जी सर्वसामान्‍य माणसामध्‍ये नसते. हे सांगण्‍याचे कारण म्‍हणजे एखाद्या विषयावर सातत्‍याने व्‍यंगचित्रे रेखाटून एक आगळा-वेगळा विक्रम करणारे व्‍यंगचित्रकार लहू काळे.

लहू भीवराज काळे या कलाकाराचा जन्‍म 29 ऑक्‍टोबर 1970 साली बीड जिल्‍ह्यातील नेकनूर या गावी झाला. प्राथमिक शिक्षण पिंपळनेरला आणि माध्‍यमिक शिक्षण नेकनूरला झाले. त्‍यांचे बालपण थोडे हलाखीत आणि थोडे सुखात गेले. चित्रकलेची उपजत आवड असल्याने पदवीसाठी औरंगाबादला आले. तेथे 1991 मध्‍ये मराठवाडा विद्यापीठातून बीएफए (पेंटींग) पदवी घेतल्‍यानंतर उच्‍च शिक्षणासाठी मुंबईला सर जे.जे. स्‍कूल ऑफ आर्टला प्रवेश घेऊन 1993 ला डीएफएड होऊन बाहेर पडले. याचदरम्‍यान 1992 ला श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार आर.के. लक्ष्‍मण यांचे व्‍यंगचित्रांचे प्रात्‍यक्षिक पाहून त्‍यांच्यातील व्‍यंगचित्रकार जागा झाला. त्‍यानंतर त्‍यांनी एक व्‍यंगचित्र काढून दै. लोकमत टाइम्‍सला पाठवले. ते छापून आल्‍यावर त्‍यांना प्रचंड आनंद झाला. त्‍यानंतर त्यांच्‍या कलेचा सुरु झालेला प्रवास आजही अव्‍याहत चालू आहे. आजवर त्‍यांची 5 हजारांहून अधिक व्‍यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. औरंगाबादेतील ‘मराठवाडा’ या दैनिकांतही ‘बोला दाजीबा’ या शीर्षकाखाली त्यांची व्‍यंगचित्रे प्रचंड गाजली.

ग्रामीण जीवनाची पार्श्‍वभूमी असल्‍याने त्‍यांच्‍या चित्रांमध्‍ये कृषी क्षेत्रातील समस्‍या आणि शहरीकरणामुळे होणारी ससेहोलपट सातत्‍याने दिसते. देशाच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा कणा हा कृषि आहे. अशा परिस्‍थितीत या क्षेत्राला जितके महत्‍त्‍व द्यायला हवे, तितके दिले जात नसल्याची खंत अप्रत्‍यक्षपणे त्यांच्‍या चित्रांतून दिसत असते.

नोकरी सांभाळून सातत्‍याने एका विषयावर व्‍यंगचित्रे रेखाटण्‍याचे त्‍यांचे कसब म्‍हणूनच कौतुकास्‍पद आहे. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांबाबत श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, मंगेश तेंडुलकर, खासदार राजू शेट्टी यांनीही पाठीवर शाबासकीची थाप ठेवली आहे. ‘अखिल भारतीय मराठी व्‍यंगचित्रकारांची संघटना’ अर्थात ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’ च्‍या प्रत्येक संमेलनात त्‍यांनी आवर्जून सहभाग नोंदवला आहे. ऑगस्‍ट 2015 मध्‍ये ‘सलाम कलाम’ आणि महाराष्‍ट्र शासनाच्‍या ‘जलजागृती’ या विषयावरील मार्च 2016 च्‍या व्‍यंगचित्र प्रदर्शनातही ते सहभागी झाले होते. मे 2016 मध्‍ये पुण्‍याच्‍या स्‍व. बाळासाहेब ठाकरे कलादालनात त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांचे प्रदर्शनही भरविण्‍यात आले होते. त्‍यालाही रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

राष्‍ट्रीय पत्रकार दिनानिमित्‍त त्‍यांनी रायगड येथेही व्‍यंगचित्रांचे प्रात्‍यक्षिक दाखविले. व्‍यंगचित्रकार काळे यांना आतापर्यंत विविध मान-सन्‍मान, पुरस्‍कार प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामध्‍ये कलारत्‍न अॅवार्ड, सामाजिक सेवा पुरस्‍कार, ॲक्‍टीव्‍ह टीचर अॅवार्ड यांचा समावेश आहे. कलागुरु हा पुरस्‍कार त्‍यांना सन 2010, सन 2011 आणि 2016 मध्‍ये प्राप्‍त झाला आहे. बेस्‍ट कार्टूनिस्‍ट हा पुरस्‍कार तसेच समाजभूषण पुरस्‍कार सन 2016 मध्‍ये देऊन त्‍यांचा गौरव करण्‍यात आला. त्‍यांच्‍या व्‍यंगचित्रांची दखल विविध वाहिन्‍यांनी घेतलीच.

व्‍यंगचित्रांच्‍या या प्रवासात त्‍यांना कुटुंबाचीही साथ लाभत असल्याचे ते प्रांजळपणे कबूल करतात. समाजात व्‍यंगचित्रांची आवड निर्माण करण्‍याची प्रमुख जबाबदारी व्‍यंगचित्रकार आणि प्रसारमाध्‍यमे यांची असल्‍याचे त्यांचे स्‍पष्‍ट मत आहे. व्‍यंगचित्रकारांनी अधिकाधिक सजग राहून दैनंदिन जीवनातील विसंगती, विनोद यांच्‍या माध्‍यमातून आशयघन व्‍यंगचित्रे निर्माण करावीत आणि प्रसारमाध्‍यमांनी त्‍यांना प्रसिद्धी द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.

लहू काळे, फ्लॅट नंबर 403, वैशाली श्री सिद्धीविनायक संकल्प, वडाचीवाडी रोड, उंड्री, पुणे-60

(ई- मेल labhika333@gmail.com, मोबाईल – 9822916240/8087500764)

लेखक: राजेंद्र सरग

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate