অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हॅलेंटाईन डे व्यक्त होण्याची पाऊलवाट

व्हॅलेंटाईन डे व्यक्त होण्याची पाऊलवाट

१४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे. आपलं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस! प्रेम आणि शारीर आकर्षण या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत. प्रेमाबरोबरच कामऊर्जेलाही वाट देणं गरजेचं असतं. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फुल देऊन मुलं-मुली सेक्शुअलीदेखील मोकळी होतात हे सांगत अशा व्यक्त होण्याच्या वाटा वाढवायला हव्यात हे मांडणारा हा लेख.

फेब्रुवारी महिना हा युरोपमध्ये तसा रोमान्सचा महिना मानला जातो. विशेषत: ब्रिटन आणि फ्रान्समध्ये तेथील पक्ष्यांचा तो समागमाचा महिना असतो. समागमासाठी आतुरलेले हे पक्षी एकमेकांना कूजन, गायन आणि आपल्या घुमण्याने साद घालीत असतात.

पक्ष्यातील नर-मादींनी फेब्रुवारी महिन्यात आपल्या कामभावनेला मुक्तपणे व्यक्त करणे आणि त्याच रोमान्सच्या महिन्यात १४ तारखेला रोमन सम्राट कॅलेडसच्या हुकुमाविरोधात, धर्मगुरू व्हॅलेंटाइन हा प्रेमिक सैनिकांची लग्ने लावतो, म्हणून त्याचा झालेला शिरच्छेद यामुळे १४ फेब्रु. हा दिवस युरोपातील तरुण युगुलांसाठी अनन्यसाधारण होऊन गेला.

जगभर आपल्याला हीर-रांझा, रोमिओ-ज्युलिएट, लैला-मजनू जोड्या प्रत्येक संस्कृतीत सापडतात. या मानवी भावनेवर कित्येक प्रेमकाव्ये, प्रेमपत्रे, नाटके जगात लिहिली गेली आहेत. हत्या-आत्महत्यासुद्धा झालेल्या आहेत. म्हणजे स्त्री-पुरुष प्रेम किंवा आकर्षण हा कुणा एका संस्कृतीचा मक्ता नाही. याचा अर्थ ही भावना बायालॉजिकल आहे.
‘‘आमची प्रेमभावना (वास्तवात कामभावना) आम्हांला व्यक्त करू द्या’’ अशी आस, विशेषत: तरुण वयात असते, हे धर्मगुरू व्हॅलेंटाइनप्रमाणे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. साधारणपणे १५ ते २५ वर्षे वयोगटात ही आस तीव्र आढळते आणि नंतर ती ओसरत जाते.

खरंच १५ ते २५ वयोगटातील मुला-मुलींनी असं व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे का? याकरिता उत्क्रांती आणि मानववंशशास्त्राच्या पायर्‍या तपासाव्या लागतात.

चार्ल्स डार्विनने ‘नॅचरल सिलेक्शन’चा सिद्धान्त मांडला. त्यातून ‘सेक्सुअल सिलेक्शन’चा मुद्दा पुढे आला. संशोधक ‘सेक्सुअल सिलेक्शन’ या कल्पनेकडे नर-मादीने एकमेकांना लैंगिक संबंधासाठी निवडणे एवढ्या संकुचित अर्थाने पहात नाहीत. सर्वोत्तम पुनरुत्पत्ती साधण्याकरिता नर-मादीमध्ये ‘सेक्शुअल सिलेक्शन’ची घटना निसर्ग घडवून आणताना दिसतो असं संशोधक मानतात. वनस्पतीपासून पशू-पक्षी प्राण्यांपर्यंत आपण पाहिल्यास त्यांना माणसासारखी बुद्धी नसल्यामुळे, दुसर्‍याला आकर्षून घ्यावे, लक्ष वेधून घ्यावं, असं स्वत:ला काही व्यक्त होता येणं शक्य नसतं. म्हणून निसर्ग त्यात भाग घेताना दिसतो. मग कुणाची साद, कुणाचं कूजन वा गायन, कुणाचा रंग, शिंगे, गंध, रुबाब अशी विविध वैशिष्ट्ये प्राण्या-पक्ष्यांना त्यांच्या समागम काळात विशेषत: नराला बहाल करून, नराच्या कामवासनेला एकप्रकारे आऊटलेट देत निसर्ग त्याच्याकडे मादीने आकर्षित व्हावे अशी तजवीज करीत असतो.

उदा. मोराच्या पूर्ण फुलणार्‍या पिसार्‍याचे सौंदर्य समजता येण्याचे जीन्स लांडोरीमध्ये असतात. मग ती आखूड पिसार्‍याच्या मोराची निवड न करता सुंदर व सशक्त पिसारा असणार्‍या मोराला समागमासाठी निवडते. त्यामुळे सुंदर पिसार्‍याचे जीन्स घेऊन नर पिल्ले जन्मतात आणि सर्वोत्तम मोर घडतो. आखूड पिसार्‍याच्या मोरास समागमाची संधी फार कमी मिळाल्यामुळे आपोआपच त्या पिसार्‍याची मोराची पिढी खुंटते. पण त्याकरिता सशक्त मोराला सुंदर पिसार्‍याचे प्रदर्शन करून मादीसमोर व्यक्त व्हावं लागतं तर लांडोर त्याची निवड करून स्वत:ची कामभावना व्यक्त करते.

अशा रीतीने आपण पाहतो की वयात आलेल्यांनी एकमेकांसाठी कामभावना व्यक्त करणं ही एक अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. नव्हे ती तशी सहज नैसर्गिक प्रेरणाच आहे. असं म्हणावं लागतं. आता माणसाकडे बुद्धी आहे आणि त्याचा समागमाचा असा काही ठरलेला सीझन नसतो. शिवाय बुद्धीमुळे स्त्री व पुरुष दोघंही कामभावनेबाबत वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ पाहतात. तरी कामवासना उत्तेजित करणारे टेस्टास्टेरॉन हे हार्मोन वय वर्षे १५ ते ३० मध्ये स्त्री-पुरुषांच्या शरीरात उच्च पातळीत असतं. म्हणून या कालखंडात कोणत्या ना कोणत्या आधाराने तरुण-तरुणींना आपल्या कामवासनेला ‘आऊटलेट’ शोधावासा वाटणे हे स्वाभाविकच म्हणायला पाहिजे.

पण त्याकरिता कामभावना म्हणजे प्रेमभावना नाही, हे तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. कामभावना आणि प्रेमभावना या मेंदूच्या वेगवेगळ्या विभागात प्रोसेस होत असतात, हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. कोणत्याही व्यक्तीचा विशेष परिचय नसताना त्याचे/तिचे आकर्षण वाटणे ही कामवासना असते. ते निव्वळ शरीर-आकर्षण असतं. हे तरुण मंडळींनी समजून घेतलं तर ते अधिक समंजसपणे, प्रगल्भतेनं या शारीरिक प्रकरणास सामोरे जाऊ शकतील. शरीर आकर्षण ओसरल्यानंतरही त्या व्यक्तीबद्दल ओढ वाटणे, आठवण येणे, तिची काळजी वाटणे यामधून प्रेमभावनेचा फाटा फुटत असतो. थोडक्यात, कामवासना जिथे संपते, तेथूनच प्रेमभावना जन्म घेत असते.

असं असलं तरी कामभावना व्यक्त करण्याचे जेवढे म्हणून सभ्य व सुसंस्कृत मार्ग आहेत ते आपण जपले पाहिजेत. कारण कामभावना ही एक स्पष्ट शारीरिक घडामोड आहे. टेस्टास्टेरॉन इस्ट्रोजन, ऑक्सिटोसीन, सेराटोनीन, डोपामीन वगैरे हार्मोन्स तसंच मेंदूचे हायपोथॅलमस, अमिम्डल हे भाग आणि पिच्युटरी ही मास्टरग्लँड हे सर्व मिळून माणसाची कामवासना उत्तेजित करतात आणि शमवतात. अनैच्छिक स्नायूंद्वारे चालणार्‍या या कार्याला माणसाला दीर्घकाळ नियंत्रणात ठेवता येणं अशक्य आहे, हे आपण समजून घ्यायला हवं आहे, तरी कामभावनेवर संयम ठेवावा लागतो आणि तो संयम त्या भावनेला प्राथमिक वाट (आऊटलेट) मिळवून दिल्यास, अधिक सहज शक्य असतो. कामभावना व्यक्त करता येण्यातून भावनेची जणू पहिली वाङ्ग मुक्त होत असते. हे आपले पूर्वज खूप चांगल्या प्रकारे समजू शकत होते.

अतिप्राचीन काळात विवाहप्रथा येण्यापूर्वी स्त्री व पुरुष एकमेकांची लिंगावयवांवरून चेष्टा-मस्करी करीत होते, हे दाखवणारे संस्कृत श्‍लोक यजुर्वेदात अनेक ठिकाणी आहेत, असे इतिहासाचार्य वि.का. राजवाडे आपल्या ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या पुस्तकात नोंदवतात. ते लिहितात, ‘‘रानटी ऋषीपूर्वज यज्ञभूमीवर म्हणजे अग्नी-कुंडाभोवती धगधगीत उबेसाठी जमत. लिंग व योनी यांचे वाचक-शब्द एकमेकांना उद्देशून हरहमेशा बोलत. यज्+न म्हणते ‘ते जमून प्रजोत्पादन करतात’ असा यज्ञ या शब्दाचा मूळ अर्थ रानटी ऋषीपूर्वजांच्या भाषेत होता, असं राजवाडे लिहितात. तसंच गर्भ, योनी, रेत, इंद्रिय, वृष, वृषण, वीर्य ज्यांचा उच्चार आपल्याला अश्‍लील वाटतो, ते सर्व शब्द यजुसंहितेत अग्नीच्या साहाय्याने पदोपदी आढळतात, असंही ते नोंदवतात. ‘‘मधोमध अग्नी पेटता ठेवून त्या भोवती समागम, रतिकर्म खुलेआम करणारे आपले पूर्वज स्त्री-पुरुष हे एकमेकांना लिंगवाचक शब्द उच्चारून कामोत्तेजित करीत होते.’’ असंही प्रस्तुत पुस्तकात नोंदवलेलं आहे.

अन्य भारतीय प्राचीन वाङ्मयातसुद्धा अशा प्रकारे कामभावना व्यक्त करण्याचा मुक्तपणा होता, याची उदाहरणे सापडतात. विवाहप्रथा नसणार्‍या मातृसंस्कृतीतील शूर्पणखा रामाला ‘‘तू मला आवडलास’’ असं मोकळेपणाने सांगून त्याला शरीरसंबंधाविषयी विचारते. चित्रांगदा, उलुपी या राजकन्यांनी अर्जुनास, तर हिडिंबेने भीमास स्वत:ला पुत्रप्राप्ती होईपर्यंत स्वगृही वास्तव्यास राहण्याचा केलेला आग्रह आपल्याला माहीत आहे. विवाश्रऋषी तपसाधना करीत असता, केकसी नामक स्त्रीच्या मनात कामभावना निर्माण झाली आणि ती पूर्ण करण्याची विनंती विवाहश्रला तिने केली, त्या समागमातून रावणाचा जन्म झाला. (संदर्भ- कथा कल्पतरू) अशा प्रकारे पराशर ऋषींबरोबर स्वेच्छेने संबंध करून त्यायोगे व्यासाला जन्म देणारी सत्यवती आपल्याला माहीत आहे, जिचा पुढे शंतनू राजाशी विवाह झाला. सूर्याशी स्वेच्छेने संबंध करून कर्णाला जन्म देणारी कुंती माहीत आहे, जिचा पुढे पंडूशी विवाह झाला. कर्णपर्वामध्ये कर्ण शल्य राजास म्हणतो, ‘‘शल्या तुझ्या मद्र देशातील स्त्रिया पुरुषांशी स्वेच्छेने समागम करतात.’’ मद्र देशाबरोबर कर्ण, प्रस्थल, आरट्ट गांधार, सिंधुसौबीर, कारस्कर, केरल, कलिंग वगैरे भारतातील चौङ्गेर भूभागांची नावे, कर्ण जोडतो. स्त्री-पुरुष प्राचीन काळात अशाप्रकारे जेव्हा स्वेच्छेने विवाहविना समागम करीत होते, तेव्हा आधी त्यांना ती भावना व्यक्त केल्याशिवाय, ते होणं शक्य नव्हतं, हे स्पष्टच आहे.

थोडक्यात, निसर्गात पशू-पक्षी एकमेकांसमोर निसर्गप्रेरणेने कसे व्यक्त होतात हे आपण सुरुवातीला पाहिलं, तोच व्यक्त होण्याचा धागा उत्क्रांतीतून माणसामध्ये पोहोचलेला दिसतो. स्त्री-पुरुषांनी आपापली कामभावना भाषेतून, संवाद-संभाषणातून, चित्रे, शिल्पे, पुढे काव्यलेखन, पत्र लेखन, गाणी, नृत्यापासून ते चित्रपटापर्यंत व्यक्त करण्याची परंपरा तशाच प्रकारची दिसते. बदलत्या काळाप्रमाणे व्यक्त होण्याची माध्यमे माणसासाठी बदलत राहतील. पण त्या माध्यमातून प्रेमभावना व्यक्त करण्याची परंपरा चालूच राहील. आपल्या जैविक जडणघडणीची ती एक अपरिहार्यता आहे. हे सत्य आपल्या पूर्वजांच्या चांगलं लक्षात आलेलं दिसतं. म्हणून अग्नी भोवतालच्या मुक्त समागमाच्या काळातून, विवाहबंधनाच्या कालखंडात पाऊल ठेवताना, आपल्या पूर्वजांनी मधल्या पिढ्यांसाठी जुन्या सवयीचा, परंपरेचा भाग म्हणून, ङ्गाल्गुन पौर्णिमेला अग्नीचा जाळ पेटवून त्या भोवती स्त्री-पुरुषांनी उभं राहून लैंगिक शब्दोच्चारण, अंगविक्षेप करण्याची मुभा ‘होळी’ सणामधून कायम ठेवली होती. ज्याला नंतरच्या काळात अश्‍लील शिव्या म्हणून बंदी आली. विवाह प्रथेच्या आगमनानंतर स्त्रीचा शरीर संबंध पतीशिवाय अन्य कुणाशी होऊ नये, या खबरदारीमधून अशा प्रकारचा कामेच्छेचा व्यक्तपणा हो नेहमीच अश्‍लील आणि अनैतिक ठरविण्यात आला. आणि अजूनही आपण वैवाहिक संबंध तेवढेच ङ्गक्त नैतिक धरून चाललो आहोत.

जैविकदृष्ट्या (बायॉलॉजिकली) नैतिकतेच्या माणसाने बनविलेल्या कृत्रिम कल्पना या आपल्या शरीर-व्यापाराला अडचणीच्या आहेत. कामपूर्ती करणारे महत्त्वाचे हार्मोन टेस्टॉस्टेरॉन हे माणसाला एकूणच जगण्याची ऊर्जा देणारे हार्मोन आहे. हे हार्मोन कणखरता, आत्मविश्‍वास, आक्रमकता, उतावीळता, स्पर्धावृत्ती, सत्ताकांक्षा, महत्त्वाकांक्षा, बेपर्वाई, धाडस आणि साहस वगैरे अनेक प्रकारच्या वर्तन-वृत्तीचे पॅकेज स्त्री-पुरुषांना बहाल करते. त्यांपैकी प्रत्येक वृत्तीच्या ऊर्जेला आपण विविध वर्तनातून वाट-देत असतो. म्हणजे उदा. - प्रावीण्य मिळविण्याच्या धडपडीतून स्पर्धावृत्तीला वाव मिळतो. ध्येय गाठून महत्त्वाकांक्षेची पूर्तता होते, कठीण प्रसंगात कणखर निर्णयाने धाडस वा साहस प्रकट होते. शारीरिक कसरती, कवायती, मैदानी खेळ, कुस्त्या यामधून आक्रमकता बाहेर निघून जाते. पण टेस्टास्टेरॉन ज्या प्रमुख वृत्तीमुळे ओळखलं जातं ती कामवृत्ती मात्र माणूस दडपण्याचा प्रयत्न करतो, हे आश्‍चर्यच आहे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे, टेस्टास्टेरॉन हार्मोनची पातळी स्त्री व पुरुषात कमी-अधिक आहे. पुरुषामध्ये ते हार्मोन बरेच जास्त प्रमाणात असतं आणि त्यात पुरुषावरचे त्याचा अहंकार जोपासणारे संस्कार जितके अतिरेकी, तितका तो कामपूर्तीसाठी कशाही बटबटीत पद्धतीने व्यक्त होऊ पाहतो. म्हणजे भाषेद्वारे उच्चारण करणे, हावभाव करणे, लैंगिक शिव्या देणे, लैंगिक विनोद करणे, मुलींवर लैंगिक कॉमेन्टस् टाकणे, मित्रगटात कामपूर्तीबाबत चर्चा करणे, हस्तमैथून करणे, समलैंगिक संबंध करू पाहणे, पोर्न ङ्गिल्मस् पाहणे वगैरे पद्धतीने मुलगे-पुरुष काम-ऊर्जा बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. तसं म्हटलं तर प्राचीन पुरुषसुद्धा यांपैकी काही मार्ग काळानुसार वापरत होते. पण तेव्हा स्त्रियासुद्धा त्यांना प्रतिसाद देण्यास कशा मुक्त होत्या हे आपण वर पाहिलंच आहे. त्या काळी विवाहप्रथा नसल्यामुळे स्त्री-पुरुष मुक्त संबंधास जसा आक्षेप नव्हतं, तसा कुणी समलैंगिक असण्यावरही नव्हता. पुरुषाला पितृत्व देण्याची कल्पना अज्ञात असल्यामुळे जो-तो आपापल्या इच्छेने शरीरसंबंध करीत असणार हे स्पष्टच आहे. आणि हा तत्कालीन सर्व समाजाचा स्वच्छ, निकोप, उदार लैंगिक दृष्टिकोनाचा परिणाम होता.

मात्र आज या पद्धतीने पुरुषांनी व्यक्त होणे ही निव्वळ पुरुषाच्या गेली अनेक शतके दडपल्या गेलेल्या कामभावनेची प्रतिक्रिया असते. म्हणून ती असभ्य भासते. आज ना त्या मागे पुरुषाची खिलाडू, उदार मानसिकता असते, ना स्त्रीला त्याबाबत पुरुषाला खिलाडूपणे प्रतिसाद देण्याची मुभा असते. उलट स्त्री ने पुरुषांच्या या खाणाखुणांना स्वीकारू नये, प्रतिसाद देऊ नये आणि अंतिमत: विवाहप्रथा टिकावी, म्हणून सरसकटपणे कामभावना व्यक्त करण्याच्या सर्व पद्धतींना अनैतिक ठरविण्याचा प्रयत्न आहे. त्याकरिता पुरुषाने स्त्री प्रती असं व्यक्त होणं हाच गुन्हा ठरवला जातो आणि कडक कायदे वा शिक्षा ठोठावून पुरुष समाजावर जरब बसविण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे जी वास्तविक व्यक्त व्हायला पाहिजे, बाहेर टाकली गेली पाहिजे त्या काम ऊर्जेला अधिकच बंदोबस्ताने आपण सामोरे जातो. म्हणजे आधीची चूक सुधारण्याऐवजी घोडचूक पदरात पाडून घेतो. पण मग हामोर्र्न्स व मेंदूद्वारे उत्पन्न होणारी ही ऊर्जा जाणार तरी कुठे? कौटुंबिक आणि सामाजिक बंदोबस्तातून छुपेपणाने, चोरटेपणाने, मार्ग काढीत, पुढे विनयभंग, स्त्रीचे लैंगिक शोषण, बलात्कार, लहान मुला-मुलींचे योन शोषण अशा विकृतीने ही काम ऊर्जा बाहेर टाकण्यास पुरुष वर्ग प्रवृत्त होतो आणि मग एकच गहजब होतो.

या उलट स्त्रिया-मुलींची स्थिती आहे. त्यांनी आपली कामऊर्जा प्रकट करण्याचे मार्ग पुरुषांइतके स्पष्ट व बेधडक असू शकत नाहीत. याबाबत स्त्रीचे हार्मोन्स आणि त्याचबरोबर तिची सतत अप्रतिष्ठा, अपमान करणारे, तिला मानसिक कमकुवत करणारे तिच्यावरचे संस्कार दोन्ही जबाबदार आहेत. अर्थात स्त्रिया आपली कामऊर्जा आतल्या आत जिरवत जगत असतात. याबाबत एखाद्या अविवाहित तरुणाने अविवाहित तरुणीला संकेत देणे, म्हणजे तो त्या तरुणाचा मोठा गुन्हा आहे, असं कौटुंबिक संस्कारातून वा आजच्या कायद्यातून तिच्यावर बिंबवलेलं असल्याने स्त्रीने त्या तरुणाच्या ऊर्जेला सामोरं जाण्याचं धाडस ही अनैतिकता मानली जाते. यामुळे स्वत:ची कामऊर्जा मारावी लागणार्‍या अनेक स्त्रिया मुली मानसिक संतुलन गमावलेल्या, अस्वस्थ, आपली प्रगती, भविष्यकाळ समजू न शकणार्‍या अशा बधिरावस्थेत किंवा काहीशा चिडखोर किंवा हिस्टेरिक अवस्थेत असतात. त्यांच्या मन:शांतीसाठी मग देवधर्म, उपास-व्रते, पोथीवाचन, असे सल्ले दिले जातात. ज्यामुळे त्यांचे मानस अधिकच अशास्त्रीय बनून त्या प्रभावात त्या बाबा-बापूंच्या नादी लागतात, ज्या ठिकाणी स्त्रीच्या लैंगिक उपासमारीचे गैरङ्गायदा घेणारे चक्र ङ्गिरतच असतं. म्हणजे कामऊर्जेला प्रकट करणं हे अनैतिक ठरविण्याच्या एका अट्टहासी संस्कारामुळे, आपण अनेक अनैतिक कृत्ये पोटाशी धरलेली आहेत.

म्हणूनच ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुद्दा इथे विशेष विचारात घ्यावा लागतो. या दिवशी प्रिय वाटणार्‍या व्यक्तीला ङ्गूल देऊन, ग्रिटींग्ज वा भेटवस्तू देऊन ‘आय लव्ह यू’ म्हणत, मुले-मुली सेक्सुअली खूप मोकळी होतात. मनातील या मुग्ध भावनांना आपल्या आवडत्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचा हा मार्ग निश्‍चितच सभ्य आणि उच्च अभिरुचीदर्शक आहे. अगदी होळीला तरुण-तरुणींना एकमेकांच्या अंगाला रंग ङ्गासण्याच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सन्माननीय आणि सभ्य नाही का? मनातलं एकदाचं सांगून टाकलं ही भावना तरुण वर्गास रिलॅक्स करते. जसं, कामभावना व्यक्त करता न आल्यामुळे ती जास्त उङ्गाळून येते, प्रक्षुब्ध होते, त्याप्रमाणे ‘व्हॅलेंटाइन डे’सारख्या प्रसंगी ती व्यक्त होण्यामुळे मुले-मुली त्या आकर्षणातूनसुद्धा अचानक मुक्त होतात. काहीवेळा ती अंतर्मुख होतात. स्वत:च्या कृतीचं त्यांना हसायला येतं आणि ते आकर्षण नंतर रहातही नाही. कामऊर्जेची वाङ्ग निघून जाते म्हणतात, ती अशीच के.जी पासून एकत्र शिकणार्‍या मुलगे आणि मुलींमध्ये वयात येता येता आणि तो एकत्रपणा निकोपपणे पुढे जपल्यास कामभावनेचा निचरा नित्य होत रहात असतो. त्यातून त्यांची मानसिक वाढ अधिक निकोपपणे होते. मुला-मुलींच्या कामभावनेला मिळणार्‍या आऊटलेटमध्ये जितकी जास्त सहजता आणि त्यांच्या कुटुंबाचा विश्‍वास तितकी त्यांच्या शरीरसंबंधाची शक्यता कमी रहाते, हे दुर्दैवाने समजून घेतलं जात नाही.

त्याचबरोबर मुला-मुलींनी विविध कार्यक्रमातून एकमेकात मिसळणं, हातात हात घालून ङ्गिरणं, एकत्र नृत्य करणं, एकमेकांना नेहमी सोबत करणं, विशेष प्रसंगात एकमेकांना आलिंगन देणं, प्रेमाचा स्पर्श देणं हे सर्व कामऊर्जा बाहेर टाकण्यासाठी उपयुक्त असतं. त्यामुळे मन नेहमीच मोकळं ताणविरहित राहतं आणि म्हणून उल्हासित राहतं. कामभावना मनात साचून न राहिल्यामुळे मुला-मुलींची नोकरीतील किंवा अभ्यासातील एकाग्रता टिकून राहते. त्यात पालकही जर या जोडीदाराविषयी मोकळेपणाने बोलणारे असले, तर ते पाल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतात. त्यामुळे वैवाहिक जोडीदाराची निवड सुखकारक ठरते. असे अनेक ङ्गायदे कामऊर्जेला व्यक्त होऊ देण्यामध्ये आहेत. विशेषत: गेल्या २५-३० वर्षामध्ये विवाहाचे वय ५ ते १० वर्षांनी पुढे गेलेले आहे. त्यामुळे कामऊर्जेला व्यक्त होऊ देण्याचे मार्ग स्वीकारण्याशिवाय आपल्यापुढे पर्याय राहिलेला नाही आणि हे सत्य कुटुंबाने व समाजाने मान्य न केल्यास, तरुणमंडळी बेधडकपणे नैतिक-अनैतिक सर्व करू पहातील, हे लक्षात घ्यायला हवं.

कुटुंबाकडून मिळणार्‍या आश्‍वस्त पाठिंब्यामुळे आणि उदार संस्कारामुळे तरुण वर्गाच्या संयमाची पायाभरणी होत असते आणि त्याकरिता ‘व्हॅलेंटाइन डे’सारख्या कामऊर्जा व्यक्त होण्याच्या पाऊलवाटा आपण जपल्या पाहिजेत आणि नव्या तयारही केल्या पाहिजेत.
(‘लैंगिक धर्म-व्यक्त आणि अव्यक्त’ या आगामी पुस्तकातून)
----
मंगला सामंत
चलभाष ः ९३७१३२५४११

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate