काजळा (फांगळी; लॅ.एजिसिरॅस मॅजूस; कुलमिर्सिनेसी). समुद्रकिनारी चिखलात वाढणारे हे झुडूप सु.दोन ते सहा मी. उंच वाढते. मुंबई कारवार, सुंदरबन, अंदमान बेटे व कराची ह्या ठिकाणी ते आढळते. काजळा त्यात पांढरा चीक असतो. पाने मोठी, साधी एकांतरित (एकाआड एक), वरुन फिकट हिरवी व खालून निळसर, तळाकडे निमुळती, आखूड देठाची, टोकास खाचदार; फुलोरा चवरीसारखा असून त्यावर अनेक, लहान, पांढरी व सुवासिक फुले फेब्रुवारीत येतात. फळ 2.5-7 सेंमी. लांब, लांबट, वाकडे, टोकदार, तळाशी पेल्यासारख्या संवर्ताने (फुलाच्या सर्वांत बाहेरील मंडलाने, पुष्प्कोशाने) वेढलेले व पिंगट असते; बी एकच असून ते फळात रुजते व आदिमूळ (वनस्पतीच्या गर्भाच्या अक्षाचा खालचा भाग) बाहेर येते (अपत्यजनन). लाकूड लालसर, कठीण आणि किरकोळ उपयोगाचे असते. साल कातडी कमाविण्यास उपयुक्त; सालीची पूड मत्स्यांना विषारी असते. लेखक: भो.सुं. नवलकर स्त्रोत: मराठी विश्वकोश