वावडिंग : (हिं. बाबरंग, वायविडंग; गु. वायवडिंग, वावडिंग; क. वायुविलंग; सं. विडंग; इं. एंबेलिया; लॅ. एंबेलिया राइब्स, कुल मिर्सिनेसी). फुलझाडांपैकी हे मोठे आरोही (वर चढणारे) झुडूप भारतात सर्वत्र (विशेषतः महाराष्ट्रातील डोंगराळ भागात, दक्षिण कोकण, उत्तर कारवार, गिरसप्पा धबधब्याच्या आसपास), पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, चीन इ. देशांत आढळते. फांद्या लांब, बारीक व लवचिक असून लांब पेऱ्यावर वल्क रंध्रयुक्त (साल छिद्रे असलेली) असते. पाने साधी, एकआड एक, चिवट, दीर्घवृत्ताकृति-कुंतसम (भाल्यासारखी), वर चमकदार पण खाली फिकट रुपेरी असतात. सर्व वावडिंग : (१) फुलोऱ्यासह फांदी, (२) फूल, (३) फळ. सर्व पृष्ठभागावर फार लहान लालसर प्रपिंड (ग्रंथी) असतात. फुले लहान, द्विलिंगी, पंचभागी (प्रत्येक मंडलात पाच दले असलेली), केसाळ, अनेक, हिरवट पिवळी व सुगंधी असून फेब्रुवारीत विरळ शाखायुक्त परिमंजरीवर येतात. मृदुफळे ३ - ४ मिमी. व्यासाची, गोलसर, गुळगुळीत, काळी व रसाळ असतात. ती मिरीसारखी दिसतात. त्यांत एकच बी असते. शुष्क फळ कृमिघ्न (कृमिनाशक), स्तंभक (आकुंचन करणारे), पौष्टिक व आरोग्य प्राप्त करून देणारे असते. फळांचा काढा ज्वरात आणि छातीच्या व त्वचेच्या रोगांवर देतात. मुळांचा काढा दिवसातून दोन तीन वेळा घेतल्यास इन्फ्ल्यूएंझाचा विकार जातो, असे नमूद आहे. फळांपासून केलेले मलम नायटा व त्यासारख्या त्वचारोगांवर लावतात. लहान मुलांना जंत झाले असता फळांचे चूर्ण मधातून देतात व उदरवायूवर फळे दुधात उकळून पाजतात. फळे मिरीत भेसळ करण्यासही वापरतात. संदर्भ – Kirtikar, K. R.; Basu, B. D. Indian Medicinal Plants, Vol. 2, New Delhi, 1975. लेखक : ज. वि. जमदाडे / शं. आ. परांडेकर स्त्रोत : मराठी विश्वकोश