लोकसंख्येत होणारी वाढ सर्वार्थाने घातक आहे. पृथ्वीवरील मर्यादित नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिवापर होण्याचा धोका यातून वाढतो. या समस्येची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा ‘पॉप्युलेशन डे’ जगभर पाळला जातो.

मूळ संकल्पना व सुरुवात

१९५० साली जगाची लोकसंख्या २.५ अब्ज होती. अवघ्या ३७ वर्षात ११ जुलै १९८७ रोजी ती बरोबर दुप्पट म्हणजे ५ अब्ज झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १९८७ सालापासून, युनोच्या विकास कार्यक्रम (युएनडीपी) समितीने ठरविल्यानुसार ११ जुलै हा दिवस इशारा – दिन म्हणून पाळला जातो.

अधिक माहिती

पृथ्वीची लोकसंख्या २०११ मध्ये ७ अब्ज होती आणि २०५० पर्यंत ९.६ अब्ज होण्याची शक्यता आहे. यामध्ये, चीनपेक्षाही भारताची ‘प्रगती’ वेगाने होत आहे ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे ! या अभूतपूर्व वाढीमुळे फक्त भारतच नाही; संपूर्ण जगापुढेच बकाल शहरीकरण, बेरोजगारी, अपुरे अन्न- पाणी- आरोग्य, प्रदूषण यांसारख्या मुलभूत समस्या उभ्या ठाकल्या आहेत. पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्तीचा बेबंद आणि असंतुलित वापर पाहता ही वाढ सर्वांनाच जड जाणार आहे.

मध्य आशिया आणि आफ्रिकेतील युद्धस्थिती तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे विस्थापित होणा-यांची संख्या (६ कोटींपेक्षा जास्त) लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने २०१५ सालासाठी ‘बिकट स्थितीतील संवेदनशील लोकसंख्या’ ही थीम ठरवली आहे. या गोष्टीचे भान ठेवणे हे आपणा सर्वांनाच आवश्यक आहे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६