जैवविघटन होणारा (नॉन- बायोडीग्रेडेबल) कचरा हा संपूर्ण पृथ्वीसमोरचा फार मोठा प्रश्न आहे. असा कचरा टाकणा-या व्यक्ती भावी पिढ्यांचे नुकसान करीत आहेत. या कच-यामुळे पृथ्वीवरचे पूर्ण पर्यावरण चक्र बिघडते. आपण निर्माण करतो त्या कच-याचे दोन प्रकार असतात. जैवविघटनयोग्य (बायोडीग्रेडेबल) म्हणजे कालांतराने विघटन होऊन जो कचरा सृष्टीत मिसळून जातो असा आणि नॉन- बायोडीग्रेडेबल म्हणजे जो वर्षानुवर्षे, खराबदेखील न होता फक्त साठून राहतो असा नॉन- बायोडीग्रेडेबल कचरा संपूर्ण जीवसृष्टीला अत्यंत धोकादायक आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे हरित ग्राहक जीवनशैलीव्दारे आपल्या हातात आहे.

मूळ संकल्पना व सुरुवात

वर सांगितल्याप्रमाणे एखाद्या कशा प्रकारचा किती कचरा निर्माण होईल? तसेच ती वस्तू बनविण्यासाठी किती उर्जा खर्च झाली? या त-हेचे विचार गेल्या दशकात सर्वच पातळ्यांवर होऊ लागले. कारण नष्ट न होणा-या अशा कच-याच्या ढिगांनी पर्यावरणचक्र बिघडते, जमीन नापीक आणि धोकादायक बनते आणि प्रदूषण वाढते. प्रत्येक उत्पादन अशा प्रकारे पार्कून खरेदी करणा-या जागरूक ग्राहकांची संख्या वाढवणे हे या दिनामागचे उद्दिष्ट आहे.

अधिक माहिती

शीतपेयाची एक बाटली आपल्या हाती येण्यासाठी केल्या जाणा-या प्रक्रियांवर २० बाटल्या पिण्यायोग्य गोडे पाणी खर्च होते – ही बाब योग्य आहे का? संपूर्ण जीवसृष्टीचा शाश्वत विचार केला तर नाही ! कारण आपल्या पृथ्वीवर गोडे पाणी फारच कमी आहे. हीच बाब हजारो ग्राहकोपयोगी छोट्यामोठ्या वस्तूंच्या पॅकिंग उर्फ वेष्टनाची वस्तू वापरण्याआधी आपण पॅकिंग काढून फेकून देतो- त्याचे पुढे काय होते? त्याचे विघटन होते की तसेच प्रदूषण करत पडून राहते? असा विचार करणा-यांची संख्या वेगाने वाढली तरच संतुलित पर्यावरण आणि जीवसृष्टीला भवितव्य आहे ! अगदी कॉम्प्युटर आणि मोबाईल फोनच्या आजच्या युगातला ‘इ’ म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचरादेखील भयानक प्रमाणात वाढतो आहे- त्यातील तंत्रज्ञान तर नाही परंतु बाहेरील कॅबिनेट्सचा (शेल्सचा) पुनर्वापर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आजही बरीचशी उर्जा आपण पारंपारिक नैसर्गिक संसाधनांकडून मिळवतो. तेव्हा एखादी वस्तू बनविण्यासाठी किंवा ती वापरताना किती वीज खर्च करायची? याचा विचारही सर्वांनी केला पाहिजे...

आपल्याच भविष्यासाठी ! आपण काय करू शकतो...

सरकारी व संस्थात्मक पातळीवर निरनिराळे उपाय केले जातातच पण आपणही आपल्या वैयक्तिक पातळीवर अनेक छोटे-छोटे उपाय शोधून कचरा कमी होण्यास मदत करू शकतो.

उदाहरणार्थ

प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरला नकार द्या.

प्राणिज अवयवांपासून बनलेल्या वस्तू विकत घेऊ नका.

लेटरबॉक्सवर ‘नो जंकमेल’ चे चिन्ह लावा.

प्रदूषण वाढवणा-या किंवा करणा-या वस्तूंना, कृतींना पर्याय म्हणून काय करता येईल याचा विचार करा.

पुनर्वापर करण्याजोगी उत्पादने खरेदी करा.

‘वापरा आणि फेका’ प्रकारच्या वस्तूंचा वापर कमी करा.

भरपूर पॅकेज असलेल्या वस्तूंची खरेदी टाळा.

अजूनही वापर करण्यायोग्य वस्तू फेकून देऊ नका.

वस्तू मोडली तर दुसरी नवी वस्तू घेण्याआधी जुन्या वस्तूची दुरुस्ती करता येते का ते पाहा.

कोणत्याही प्रकारच्या कच-याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून तो योग्य ठिकाणी टाका.

विघटन होऊ न शकणारा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे.

कच-याचे प्रमाण घटवण्याचे महत्त्व सांगणारे लेख,पत्रके इ. वाटणे व मिडियातप्रसिद्ध करणे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६