काही पक्षी हजारो मैल स्थलांतर करतात; तर काही जातींचे पक्षी त्यांचा परिसर कधीच सोडत नाहीत ! ही वस्तुस्थिती ध्यानात आल्यानंतर त्यांचा अधिक अभ्यास करण्याच्या तसेच त्यांच्या अधिवासांना ( हॅबिटॅट्स ) गरजेप्रमाणे संरक्षण पुरवण्याच्या हेतूने हा दिवस साजरा होऊ लागला आहे. इतर दिनांच्या तुलनेत हा नवा उपक्रम आहे.

मूळ संकल्पना व सुरुवात

२०१५ मध्ये भारतात प्रथमच हा दिवस पाळण्यात आला. जगभरात ‘ग्लोबल बिग डे’ याच दिवशी साजरा केला जातो. यानुसार, एकाच दिवसात ( २४ तासांत) पक्ष्यांच्या अधिकाधिक जातींची नोंद करण्याचे आव्हान पेलले जाते. यामध्ये भारतीय पक्षीनिरीक्षकांनी ५६७ जातींची नोंद करून जगात ९ वा क्रमांक मिळवला.

अधिक माहिती

पृथ्वीवरील सर्व लहानमोठ्या सजीवांच्या योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी, अधिवास ( हॅबिटॅट्स ) अनुकूल असावा लागतो. अशी परिस्थिती न मिळाल्यास त्यांची संख्या रोडावते तर काही नष्टच होतात. चिमणीपासून देवामाशांपर्यंत अनेकांवर आपण ही वेळ आणली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष संबंधित सजीवांच्या सुरक्षेबरोबरच त्यांचा अधिवास कायम राखणे आणि त्यावर अतिक्रमण न करणे तितकेच महत्त्वाचे ठरते. तब्बल ५६७ जातींचे पक्षी जगात इतरत्र नाही तर फक्त भारतातील त्या विशिष्ट परिसरातच जगू शकतात. उदा. २००६ सालीच असे दिसून आले की रीड बॅबलरची एक प्रजाती फक्त हिमाचल प्रदेशातच आढळते, त्यांचा अधिवास नष्ट झाला तर ते जाणार कुठे? त्यामुळे अधिवासांच्या जपणुकीबद्दल जागृती होणे गरजेचे आहे.

माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६