অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘जलयुक्त’ शिवार अभियानामुळे जळगावमध्ये झाली गतवर्षी पेक्षा 70 टॅंकरची घट

‘जलयुक्त’ शिवार अभियानामुळे जळगावमध्ये झाली गतवर्षी पेक्षा 70 टॅंकरची घट

महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार अभियान’ योजनेत गेल्या वर्षी 232 गावांमध्ये झालेल्या कामांमुळे जिल्ह्यात सुमारे तीस हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. भूजल पातळीही दीड मीटरने वाढली होती. त्याचा लाभ जवळपास 58 हजार हेक्‍टर शेत जमिनीला झाल्याचे आशादायक चित्र आहे. त्याचाच परिणाम म्हणून गतवर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची व पर्यायाने टॅंकरच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे. गतवर्षी (मे 2016 अखेर) 96 गावांना 86 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा झाला. यंदा केवळ 32 गावांना 17 टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होत आहे.

जलयुक्त शिवार अभियानाची अंमलबजावणी करताना जिल्हा प्रशासनाने, अभियान राबविणाऱ्या यंत्रणेने या अभियानातील कामे चांगल्याप्रकारे केल्याने लवकरच जळगाव जिल्हा ‘जल'गाव होऊन टॅंकरमुक्त होण्यास मदत होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना बारमाही शाश्‍वत पाण्याची सोय निर्माण होण्यास मदत होते आहे.

पाऊस चांगला, धरणात पाणीसाठा

गेल्या तीन वर्षांपासून सतत नापिकी, दुष्काळाचे चित्र होते. गेल्या जून ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात 99.1 टक्के पाऊस झाला. यामुळे यंदा जलसाठ्यात चांगला पाणीसाठा झाला. धरणेही भरली. त्यात जलसंधारणाची कामे झाल्याने त्यात पाण्याची साठवण चांगली झाली. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या जलसंधारण उपचारांच्या कामांमुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी दोन ते तीन मीटरची वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मार्च 2017 अखेर जिल्ह्यातील निरीक्षण विहिरींच्या पातळीची मोजणी केल्यानंतर ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानात पहिल्या टप्प्यात 232 गावांत विविध कामे करून जलसंधारण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात 222 गावांमध्ये ही कामे सुरू आहेत. या कामांमुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणी अडवून जिरवण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात 206 गावे जलयुक्त अभियान राबविण्यासाठी निश्‍चित करण्यात आली आहेत.

लोकसहभाग ठरला महत्त्वाचा

या कामांमध्ये लोकसहभाग हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरला. त्यातच यंदा पावसाळा चांगला झाल्याने खोलीकरण केलेले नाले, गाळ काढलेले तलाव आणि सर्व उपचारांमध्ये चांगल्या प्रमाणावर पाणी अडवले आणि जिरले सुद्धा. याचा परिणाम भूजल पातळी वाढण्यात झाला आहे. विहिरींची पाणी पातळी मोजण्यासाठी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात निरीक्षण विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. मोजमापात अधिक अचूकता यावी यासाठी जिल्ह्यात 1544 गावांमध्ये निरीक्षण विहिरी निश्‍चित करण्यात आल्या आहेत.

प्रकल्पात जुलैपर्यंत पुरेल एवढा साठा

सद्यःस्थितीत जिल्ह्यात सर्व मोठ्या प्रकल्पात 24.59 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यासाठी 2016-17 साठी 443 गावांना 9 प्रकारच्या 579 उपाययोजना राबविण्यासाठी 7 कोटी 35 लक्ष 5 हजार रुपयांचा संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. सद्यःस्थितीत 13 गावांमध्ये 6 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

नऊ लाख घनमीटर गाळ काढला

एकूण 9 नद्यांचा गाळ काढण्यात आला. 84 साखळी सिमेंट बंधारे उभारण्यात आले. लोकसहभागातून 36 लाख 34 हजार घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला. त्यापैकी 9 लाख 45 हजार घनमीटर गाळ लोकसहभागातून काढला आहे.

दुसऱ्या टप्प्यात 222 गावे

पहिल्या टप्प्यात झालेल्या झालेल्या कामांमुळे एकूण 36 हजार 118 टीसीएम एवढे पाणी साठविले गेले आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 222 गावांची निवड झाली असून 5551 कामे मंजूर आहेत. जिल्हा समितीने 175 कोटी 43 लाखाचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 129 कोटी 75 हजारांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 2248 कामे पूर्ण झाली असून 1874 कामे प्रगतिपथावर आहेत. यावर्षी मेहरूण तलावातील 1 लाख 3 हजार 586 घनमीटर गाळ काढण्यात आला. 1 कोटी 15 लाख आठ हजार रुपयांचा निधी त्यासाठी खर्च झाला. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या मदतीने 92 हजार 611 घनमीटर गाळ काढला. जिल्ह्यातील पाच नद्यांवर 21 ठिकाणी सिमेंट नालाबांध तयार करण्यात आले आहेत.

सद्यस्थिती :

वर्षे

टॅंकर

गावे

2016 (31 मे अखेर)

86

96

2017 (31 मे अखेर)

17

32

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी सांगितले, की जलयुक्त शिवार अभियानात झालेल्या कामांमुळे भूजल पातळीत दीड ते दोन मीटरने वाढ झाली आहे. यामुळे पाण्याच्या टॅंकरमध्ये घट झाली आहे. गत पावसाळ्यात पाऊसही चांगला झाला होता. यामुळे पाण्याची पातळी टिकून आहे. जिल्ह्यात जी पारंपरिक पिके घेतली जातात ती पिके ठिबक पद्धतीने घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबाबत कृषी विभागाला सांगण्यात आले आहे. यंदाही जी कामे होतील ती अधिक दर्जेदार होण्याकडे लक्ष असेल.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे म्हणाले, की जलयुक्तच्या कामामुळे तीस हजार टीसीएम एवढा पाणीसाठा झाला. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. 58 हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आले. यंदा दीड ते दोन हजार कामे पूर्ण झाली आहे. चार हजार कामे सुरू आहेत.यंदाही पाऊस चांगला होण्याचे भाकीत असल्याने पाणीसाठा अधिक होण्यास मदत होईल.

-देविदास वाणी,

जळगाव

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate