অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अशी करा क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा

अशी करा क्षारपड जमिनींमध्ये सुधारणा

सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात वर्षानुवर्षे साठतात. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात. हा जमिनी सुधारण्यासाठी सामूहिक उपाययोजनांची गरज आहे.
सिंचन क्षेत्रातील भारी काळ्या आणि नदीकाठच्या पोयटायुक्त जमिनीचा सामू, विद्राव्य क्षार आणि विनिमय सोडिअमचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या जमिनी क्षार व चोपण झाल्या आहेत.

नदीकाठच्या आणि कालवा सिंचन क्षेत्रातील क्षार व चोपणयुक्त जमिनीच्या भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मावर अतिशय विपरीत परिणाम झाला आहे. हे गुणधर्म सुधरविण्यासाठी निचऱ्याच्या माध्यमातून अतिरिक्त पाण्याबरोबर असलेल्या विद्राव्य क्षारांचा भूमिगत किंवा उघड्या चरांद्वारे बाहेर काढण्याबरोबर एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा लागणार आहे, तसेच या जमिनीमुळे सिंचन क्षेत्रातील विहिरी व कूपनलिकेतील पाणीसुद्धा क्षारयुक्त होत आहे. या क्षार व चोपणयुक्त जमिनींची व्याप्ती कमी करण्यासाठी माती परीक्षण करून प्रथमतः जमिनीचे वर्गीकरण करावे.

क्षारपड जमिनीमध्ये अ) क्षारयुक्त, ब) क्षारयुक्त - चोपण आणि क) चोपण जमीन असे तीन प्रकार आहेत. या प्रकारानुसार जमिनीची सुधारणा करणे अवलंबून असते, अन्यथा जमिनी जास्त क्षारपड होत जातात. त्यासाठी अशा विविध क्षारपड जमिनींचे प्रकार, कारणे, गुणधर्म आणि सुधारणा समजावून घेऊनच एकात्मिक सुधारणा व्यवस्थापनेवर भर द्यावा.

जमिनी क्षारपड होण्याची कारणे

उष्ण व कोरड्या हवामानाच्या विभागात पाऊस कमी असल्यामुळे जमिनीतील क्षारांचा निचरा होत नाही. सिंचन क्षेत्रात भारी चिकण मातीच्या अतिखोल काळ्या, निचरा कमी असलेल्या जमिनीस अतिरिक्त पाण्याचा वापर जास्त होतो. नैसर्गिक ओढे, नाले बुजवून जमिनींची ठेवण सखल भागात केल्याने भूमिगत नैसर्गिक निचरा कमी झाला आहे. त्यामुळे क्षार जमिनीतच साठू लागले आहेत. कालवा सिंचन क्षेत्रात कालव्याच्या बाजूने कॉंक्रिट मुलामा न केल्याने पाण्याच्या पाझरामुळे आजूबाजूच्या जमिनी पाणथळ होऊन क्षार व चोपणयुक्त बनल्या आहेत. जास्त पाणी लागणारे उसासारखे पीक वारंवार घेतल्याने व पिकांची फेरपालट न केल्याने जमिनी क्षारपड होत गेल्या आहेत. राज्यातील जमिनी अग्निजन्य बेसाल्ट खडकापासून बनल्या आहेत. त्यामध्ये अल्कधर्मीय खनिजांचे प्रमाण जास्त आहे. खनिजांचे विघटनानंतर मुक्त क्षार जमिनीत साठतात. सिंचनास क्षारयुक्त पाण्याचा अमर्याद वापर झाल्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढते आहे.

सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनींचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बिघडले आहेत. कोरडवाहू क्षेत्रात पावसाळ्यामध्ये उंच भागावरून पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेले क्षार पाणलोट क्षेत्राच्या पायथ्याशी असलेल्या सखल भागात वर्षानुवर्षे साठतात. उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होते, क्षार जमिनीवर साठत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनतात.

क्षारयुक्त जमिनींचे गुणधर्म

 1. जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी असतो.
 2. जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.
 3. विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असते.
 4. उन्हाळ्यामध्ये जमिनीच्या पृष्ठभागावर क्‍लोराईड व सल्फेटयुक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअमच्या पांढऱ्या क्षारांचा पातळ थर आढळतो.
 5. जास्त क्षारांमुळे पाणी व अन्नद्रव्ये शोषून घेण्यास पिकांना जास्त ऊर्जा खर्च करावी लागते.
 6. जमिनीतील पाण्याची पातळी उथळ (एक मीटरच्या आत) असते.
 7. पिकांची पाने पिवळी पडून वाढ खुंटते.

क्षारयुक्त जमिनींची सुधारणा

 1. शेताभोवती खोल चर काढावेत, पृष्ठभागावरील क्षारांचा थर खरवडून जमिनीबाहेर काढावेत.
 2. शेतात लहान लहान 20 गुंठ्यांचे वाफे तयार करून चांगले ओलिताचे पाणी देऊन विद्राव्य क्षारांचा निचरा करावा.
 3. सेंद्रिय खतांचा हेक्‍टरी 20 ते 25 टन वापर करावा.
 4. जमिनीवर सेंद्रिय पदार्थांचा (उदा. पाचट) आच्छादनासाठी वापर करावा, जमीन पडीक ठेवू नये.
 5. हिरवळीची पिके धैंचा, ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावा.
 6. भाजीपाला रोपे सरी वरंब्याच्या मध्यभागी लागवड करावी.
 7. सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये, तसेच रासायनिक भूसुधारकांमध्ये जिप्सम, गंधक यांचा वापर करू नये.
 8. क्षार सहनशील पिकांची (तक्ता क्र. 1 प्रमाणे) निवड करून लागवड करावी.

क्षारयुक्त - चोपण जमिनींचे गुणधर्म


 1. जमिनीचा सामू 8.5 पेक्षा कमी किंवा जास्त असतो.
 2. जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा जास्त असते.
 3. विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.
 4. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम क्‍लोराईड/ सल्फेट + सोडिअमचे क्षार जमिनीत साठतात.
 5. जमिनीची जडणघडण बिघडते, पिके पिवळी पडून वाढ खुंटते.
 6. पृष्ठभागावर मातीमिश्रित क्षार रेतीसारखे दिसतात.
 7. पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात पृष्ठभाग तेलकट डागासारखा दिसतो.

क्षारयुक्त - चोपण जमिनींची सुधारणा

जमिनीला उतार द्यावा. शेताभोवती खोल चर काढावेत. सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करावा. सिंचनास चांगले पाणी वापरावे. सेंद्रिय खतांचा व जोर खतांचा (निंबोळी पेंड, करंज पेंड इत्यादी) वापर शक्‍यतो जास्त करावा. हिरवळीची पिके धैंचा/ ताग 45 ते 50 व्या दिवशी तीन वर्षांतून एकदा तरी जमिनीत गाडावे. माती परीक्षणानुसार जिप्समची मात्रा आवश्‍यकतेच्या 50 टक्के पहिल्या वर्षी आणि उरलेली मात्रा दोन वर्षांनी सेंद्रिय खतात मिसळून जमिनीच्या वरच्या 20 सें.मी. थरात मिसळावे. सेंद्रिय भूसुधारके मळीकंपोस्ट, स्पेंटवॉश जमिनीत टाकू नये. क्षार सहनशील पिकांची (तक्ता क्र. 1 प्रमाणे) निवड करून लागवड करावी.

चोपण जमिनींचे गुणधर्म

 1. जमिनीचा सामू 8.5 पेक्षा जास्त असतो.
 2. जमिनीची विद्युत वाहकता (क्षारता) 1.5 डेसी सायमन प्रति मीटरपेक्षा कमी असते.
 3. विनिमय सोडिअमचे प्रमाण 15 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असते.
 4. जमिनीत सोडिअमचे कार्बोनेट किंवा बायकार्बोनेटबरोबरचे प्रमाण वाढते.
 5. जमिनी पावसाळ्यात चिबड व उन्हाळ्यात अतिशय कडक होतात.
 6. जमिनीच्या पृष्ठभागावर कडक थर व घट्टपणामुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होते.
 7. जमिनीचा पृष्ठभाग राखाडी रंगाचा दिसतो. पृष्ठभाग अतिशय टणक व भेगाळलेला बनतो.

चोपण जमिनींची सुधारणा


 1. भूमिगत चरांची व्यवस्था करावी.
 2. रासायनिक भूसुधारकांचा वापर करताना मातीपरीक्षण करून जिप्समचा आवश्‍यकतेनुसार वापर करावा. जमिनीत मुक्त चुना दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास (जिप्सम) व जास्त असल्यास (गंधक) यांचा शेणखतातून आवश्‍यकतेनुसार वापर करावा.
 3. सेंद्रिय खतांचा उदा. शेणखत, कंपोस्ट खतांचा वापर नियमित करावा व सेंद्रिय भूसुधारक मुळी कंपोस्टचा वापर नियंत्रित करावा.
 4. हिरवळीची पिके धैंचा/ ताग 45 ते 50 व्या दिवशी दोन वर्षांतून एकदा गाडावे.
 5. आम्लयुक्त रासायनिक खतांचा वापर करावा. उदा. अमोनिअम सल्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी.
 6. पिकांना शिफारशीतील नत्राची मात्रा 25 टक्के वाढवून द्यावी.
 7. माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह (फेरस सल्फेट 25 किलो/ हे.), जस्त (झिंक सल्फेट 20 किलो/ हे.) ही जमिनीत सेंद्रिय खतात मिसळून द्यावीत.
 8. सबसॉईलरने खोल नांगरट करावी, परंतु रोटाव्हेरटचा वापर करू नये. जमिनीत नेहमी वाफसा असावा.
 9. पाणी व्यवस्थापन ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीने करावे.
 10. क्षार सहनशील (तक्ता क्र. 1 प्रमाणे) पिकांची निवड करून लागवड करावी.

पाण्यावाटे क्षारांचा निचरा

क्षारपड जमिनीच्या सुधारणांमध्ये पाण्यावाटे क्षारांचा निचरा चराद्वारे करणे अत्यंत प्रभावी उपाययोजना आहे. त्यामध्ये उघडे चर निचरा पद्धती आणि भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धती असे दोन प्रकार पडतात.

उघडे चर निचरा पद्धती

शेताच्या उंच भागाकडून सखल भागाकडे पाण्याचा प्रवाह वाहत जातो. त्या वेळी तीन ते चार फूट खोलीचे चर शेतजमिनीच्या उताराच्या आडव्या दिशेने घेऊन ते चर मुख्य चरात किंवा नाल्यास जोडून पाण्याचा निचरा करावा. अशा प्रकारे घेतलेल्या चरात जर लहान-मोठे दगडगोटे, मुरूम, विटांचा चुरा, वाळू भरून त्यावर माती टाकली तर चरांमुळे वाया जाणारी जमीन लागवडीखाली आणता येईल. शिवाय मशागतीस अडथळा येणार नाही आणि चरांची वारंवार दुरुस्ती करावी लागणार नाही.

भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धती

चोपणयुक्त जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. काळ्या भारी जमिनीमध्ये चोपण जमिनीचे प्रमाण सतत वाढत आहे. अशा जमिनीतील क्षारांचा नियमित निचरा करण्यासाठी चर काढणे जरुरीचे आहे. क्षारयुक्त व चोपण जमिनीत मुख्य चर दोन मीटर खोलपर्यंत काढावा आणि बाजूचे जर एक ते दीड मीटर खोलीपर्यंत काढावेत. बाजूच्या दोन चरांमधील अंतर भारी काळ्या जमिनीत 30 मीटर आणि मध्यम काळ्या जमिनीत 60 मीटर ठेवावे. मुख्य चरांमध्ये पीव्हीसी 30 सें.मी. व्यासाचा पाइप वापरावा. बाजूच्या चरामध्ये दगडगोट्यांचा थर द्यावा आणि त्यावर जाड वाळूचा आणि त्यानंतर बारीक वाळूचा थर देऊन माती टाकून जमीन सपाट करावी.

चोपणयुक्त जमिनीमध्ये निचरा प्रणालीबरोबर भूसुधारके वापरणे गरजेचे असते. म्हणून निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते. ही आखणी करताना समस्यायुक्त क्षेत्राचे सर्वेक्षण, कंटूर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांशी संलग्न असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो.

शिफारस

 1. भारी काळ्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी सच्छिद्र पाइप भूमिगत निचरा प्रणाली (1.25 मीटर खोली, दोन पाइपमधील अंतर 25 मीटर आणि जिप्सम आवश्‍यकतेच्या 50 टक्के व हिरवळीचे पीक धैंचा) यांचा एकात्मिक वापर करावा.
 2. अशा पद्धतीने जमिनीचे माती परीक्षण करून, गुणधर्म अभ्यासून वर्गीकरणाप्रमाणे एकात्मिक पद्धतीने सुधारणा केल्यास क्षारपड जमिनींची सुधारणा करून जमिनीचे आरोग्य चांगले ठेवता येईल आणि विविध पिकांचे शाश्‍वत उत्पन्न घेता येईल.
 3. क्षार व चोपण जमिनीसाठी पिकांची सहनशीलता
 4. पिकांचा प्रकार +क्षार संवेदनशील +मध्यम क्षार सहनशील +जास्त क्षार सहनशील
 5. अन्नधान्य पिके +उडीद, तूर, हरभरा, मूग, वाटाणा, तीळ +गहू, बाजरी, मका, भात, मोहरी, करडई, सोयाबीन, एरंडी, सूर्यफूल, जवस +ऊस, कापूस
 6. भाजीपाला पिके +चवळी, मुळा, श्रावण घेवडा +कांदा, बटाटा, कोबी, लसूण, टोमॅटो, गाजर, काकडी +पालक, शुगरबीट
 7. फळबागा पिके +संत्रा, लिंबू, मोसंबी, पपई, सफरचंद, कॉफी, स्ट्रॉबेरी +चिकू, डाळिंब, अंजीर, पेरू, द्राक्षे, सीताफळ, आंबा +नारळ, बोर, खजूर, आवळा
 8. वन पिके +साग, शिरस, चिंच +बाभूळ, कडुनिंब +विलायती बाभूळ, शिसम, निलगिरी
 9. चारा पिके +ब्ल्यू पॅनिक, पांढरे व तांबडे क्‍लोव्हर +पॅरागवत, जायंट गवत, सुदान गवत, जयवंत गवत +बरसीम, लसूण घास, ऱ्होडस गवत, कर्नाल, बरमुडा गवत

संपर्क : 02426- 243209
(लेखक मृद्विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

 © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate