অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

असे बांधा सिमेंट साखळीबंधारे

असे बांधा सिमेंट साखळीबंधारे

२०१२-१३ च्या दुष्काळाने काँक्रीटच्या साखळीबंधाऱ्याला जन्म दिला आहे. नाल्यामध्ये काँक्रीटचे बंधारे ओळीने ठराविक अंतरावर बांधून नाल्याच्या पात्रातच पाणीसाठा करून भूगर्भात जिरवण्याचा हा उपक्रम आहे. नाल्याचा उतार दोन बंधाऱ्यांमधील अंतर ठरवितो. खालच्या बंधाऱ्याचे साठलेले पाणी वरच्या बंधाऱ्याच्या पायथ्याला लागेल अशा पद्धतीने नियोजन केले जाते. या बंधाऱ्याची उंची साधारणत: २.५ ते ३ मी. असावी. माथारुंदी एक ते सव्वा मीटर व खालचा उतार ०.५ : १ व त्यापेक्षा कमी पण ठेवला तरी चालतो.

वास्तविक हे एक लहानसे दगडी धरण आहे. पाया खडकावर वा कठीण भूस्तरात घेतला जायला हवा. तीरावरची माती कोरून तीर वाहून जाऊ नये म्हणून दोन्ही तीरांवर बाजूभिंती बांधल्या जातात. बंधारा माथ्यापर्यंत पाण्याने भरल्यानंतर जास्तीचा पूर बंधाऱ्याच्या डोक्यावरूनच वाहतो आणि पूर्ण बंधारा सांडवा म्हणून काम करतो.

तळाशी उंचीवरून पडणाऱ्या पाण्याची ताकद कमी करण्यासाठी थोडे दगड रचावेत व गरज पडल्यास बंधाऱ्यालगत ३ मी. रुंदीचा हौद तयार करावा. यामुळे पाया उखडणार नाही. बंधाऱ्याची साठवणक्षमता वाढविण्यासाठी नालापात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करावे. आजूबाजूची खासगी जमीन संपादित करावी लागणार नाही, इतकी रुंदी ठेवावी. खोली मऊ खडकापर्यंत करणे चांगले. पाणीसाठा वाढेल व पाणी जलदपणे मुरेल. त्या ठिकाणचा भूस्तर खोली किती करावी याचा अंदाज देतो. शक्यतो काळा खडक फोडण्याच्या फंदात पडू नये.

या बंधाऱ्याचे बांधकाम वेगळ्या पद्धतीने करावे लागते. जागेवरच काँक्रीट मिक्सर आणून वाळू, खडी, सिमेंट व पाणी यांच्या साह्याने काँक्रीट तयार करून ते मनुष्यशक्तीद्वारा जागेवर बसविलेल्या लोखंडी वा लाकडी फार्मवर्कमध्ये २० ते ३० सेंमी. उंचीच्या थरामध्ये एका बाजूने सुरवात करून भरावयाचे असते.

जसजसे काँक्रीट भरू, तसे ७५ मिमी. (3 इंच) व्यासाच्या व्हायब्रेटर निडलने काँक्रीट व्हायब्रेट करून गच्च करावयाचे असते. काँक्रीटमध्ये पाणी मोजकेच घालावयास पाहिजे. प्रमाणापेक्षा पाणी जास्त घातल्यास काँक्रीट पातळ होते व काँक्रीटला चिरा पडतात.

सिमेंट स्लरी फॉर्मवर्कच्या जोडीतून बाहेर जाते व बंधाऱ्याची ताकद व पर्यायाने आयुष्य कमी होते. पाणी कमी घातले तर काँक्रीट काम्पॅक्ट(घट्ट) होत नाही व ते भुंगीर (हनीकोंब) होते. त्याची ताकद पण कमी होते व आयुष्य कमी होते. चांगल्या काँक्रीटमध्ये पाणी व सिमेंटचे प्रमाण ०.४ ते ०.५ असते. हे प्रमाण तापमान जास्त असेल तर जास्त ठेवावे लागते. काँक्रीट लीन (एम १० व कमी) असेल तर प्रमाण जास्त ठेवावे लागते.

स्लंप कोनच्या मदतीने स्लंप मोजून पण काँक्रीटची वर्केबिलिटी ठरवता येते. साधारणत: एका दमात तीन ते चार थरांमध्ये एक मीटर उंचीचे काम करून दोन-तीन दिवसांत बंधाऱ्याचे काम पूर्ण करता येते. चोवीस तासांमध्ये फॉर्मवर्क काढून घेऊन तत्काळ क्यूरिंग (पाणी टाकणे) सुरू करणे आवश्यक आहे. उघडा सरफेस सतत २१ दिवस ओला ठेवणे जरुरीचे आहे. क्यूरिंग पुरेसे न केल्यास पाणी व सिमेंटच्या रासायनिक क्रियेस पाणी कमी पडते व काँक्रीटची ताकद कमी होते.

शासनातर्फे बांधले जाणारे साखळी बंधारे एम-१० काँक्रीटमध्ये बांधले जात असावेत. यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काँक्रीटसाठी लागणारी खडी क्रशरमध्ये तयार केलेली तीन आकाराची असावी. ४० मिमी, २० मिमी. व १० मिमी. वाळू नदीतील वा क्रश सँड एफएम ३ पर्यतची असावी. वाळूमध्ये माती, सिल्ट असू नये. अन्यथा धूवून घ्यावे. वाळूत माती असल्यास काँक्रीटला चीरा पडतात व ताकद कमी होते.

खडी स्वच्छ व ग्रेडेड असावी. चांगली ग्रेडेड नसेल तर काँक्रीटमध्ये पोकळ्या राहातात व बंधाऱ्याला कमकुवत करतात. आपल्याला जमत नसेल तर जाणकाराकडून मिक्स डिझाईन करून घ्यावे व तीन प्रकारच्या खडीचे प्रमाण ठरवावे. साधारणत: एम-१० काँक्रीटसाठी, ३ भाग ४० मिमी., २ भाग २० मिमी. व १ भाग १० मिमी. ३ भाग वाळू व १ भाग सिमेंट (पोते ५० कि.) हे प्रमाण ठीक राहील.

कोर्सर ऍग्रीगेटच्या प्रतवारीनुसार हे प्रमाण बदलावे. सिमेंट चांगले असावे. सहा महिन्यापेक्षा जास्त जुने नसावे. सिमेंट चाचणी करूनच वापरावे. काँक्रीटींग केल्यानंतर सिमेंट चांगले नाही असे आढळल्यास फार अडचण निर्माण होते. काँक्रीटला दुरुस्त करणे जवळजवळ अशक्यच असते. दर ४० ते ५० घ.मी. वा दररोजच्या कामातून सहा क्यूब कॉस्ट करावेत. पहिले तीन सात दिवसानंतर व दुसरे तीन अठ्ठावीस दिवसानंतर अधिकृत प्रयोगशाळेतून चाचणी करून घ्यावे. स्लंप व काँक्रीटचे निष्कर्ष एका रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवावेत. काँक्रीटसाठी वापरले जाणारे पाणी खारे नसावे व ते चांगले असावे.

आजकाल चांगले फॉर्मवर्क मिळतात वा तयार पण करून घेता येतात. लोखंडाचे नट-बोल्टचे फॉर्मवर्क चांगले असतात. प्लाय शीटचे लाकडी पण चालतात. फॉर्मवर्कच्या मजबुतीवर काँक्रीटची गुणवत्ता व आकार अवलंबून असतो. व्हायब्रेटरशिवाय काँक्रीटिंग करू नये. अनेक लोक काँक्रीटमध्ये जास्त पाणी टाकून रॉडिंग करून काम करतात, ते चुकीचे आहे. अलीकडे आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लँटमधून आपल्याला पाहिजे त्या ग्रेडचे काँक्रीट मिळते. प्लँटमधील खडी, वाळू, सिमेंटही तपासून घ्यावे. यामुळे काम सोपे होते. पाया कठीण खडकापर्यंत घेऊन जावा.

एखाद्या फुटात खडकात गुंतविल्यास चांगलेच असते. तीन आठवड्यांपर्यंत चांगले क्यूरिंग केले जात नाही. जागेवर पाणी पुरेसे उपलब्ध नसते. सतत ओले ठेवले जात नाही; दुर्लक्ष होते, असे अनेक ठिकाणी आढळते. सध्या बाजारात क्यूरिंग कंपाऊंड मिळत आहे. फॉर्मवर्क काढल्यानंतर तत्काळ क्यूरिंग कंपाऊंडने सरफेस पेंट करावा. यामुळे बाष्पीभवन कमी होते आणि याच्या जोडीला सतत पाणी शिंपडून ओले पण ठेवावे. या दोन्हीमुळे क्यूरिंग चांगले होईल व अपेक्षित गुणवत्ता मिळवता येईल. 
मो. 9422776670 
(लेखक महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष आहेत.)

----------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate