অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जल-मृद संधारणाच्या उपाययोजना

पाणलोट क्षेत्र  विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्रातील जमिनीचे क्षेत्र, जमिनीचा प्रकार, जमिनीचा उतार व उंच-सखलपणा, तसेच जमिनीचा भूस्तर लक्षात घ्यावा. याचबरोबरीने पाणलोट क्षेत्रातील ओढे, नाले इत्यादी बाबींचा विचार करून आवश्‍यकतेनुसार जल-मृद संधारणाचे उपाय करावेत.

समपातळी बांधबंदिस्ती

१) शेतातील वाहते पाणी अडविण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने घातलेल्या मातीच्या अथवा दगडाच्या अडथळ्यास 'बांध' असे म्हणतात.
२) साधारणतः सहा टक्के अथवा त्यापेक्षा कमी उतार असणाऱ्या कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात लागवडीयोग्य जमिनीमध्ये समपातळी बांध घातले जातात.
३) समपातळी बांधाच्या उपाययोजनेमुळे वाहत्या पाण्याचा संकलन काळ वाढतो व जमिनीमध्ये पाणी मुरण्यास मदत होते. सलग ढाळाचे (उताराचे) विभाजन झाल्याने वाहणाऱ्या पाण्याची गती रोखली जाऊन धूप कमी होते, जमिनीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होते.

ढालीची (उताराची) बांधबंदिस्ती

१) अनियमित अथवा अतिपावसाच्या प्रदेशात ढालीच्या बांधाची उपाययोजना केली जाते. या स्वरूपाच्या उपाययोजनेमध्ये बांधामधील जास्तीचे पाणी अधुपकारी गतीच्या आधारे बांधाच्या बाहेर काढून दिले जाते.

समपातळी रेषेवर चरी

१) लागवडीस अयोग्य जमिनीमध्ये उताराला आडव्या असणाऱ्या समपातळी रेषेवर खोदलेल्या चरांना ‘समपातळी चर’ असे म्हणतात.
२) चरांमधून खोदलेल्या मातीच्या आधारे चराच्या खालच्या बाजूस बांध घालण्यात येतो. गरजेनुसार नैसर्गिक परिस्थितीचा अभ्यास करून वृक्षलागवडही केली जाते.
३) पावसाचे पाणी समपातळी चरांमध्ये साठावे यासाठी चरांचा आकार ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल एवढा ठेवावा.. दोन चरांमधील अंतर चार मीटर एवढे ठेवतात.

पुनर्भरण चर

१) बाष्पीभवनामुळे होणारा पाण्याचा ऱ्हास टाळून जमिनीच्या पृष्ठभागाखाली पाणी साठा करण्यासाठी पुनर्भरण चराची उपाययोजना अतिशय उपयुक्त आहे.
२) सदर चरांमध्ये ६ ते ८ महिने पुनर्भरणाची प्रक्रिया सुरू राहिल्यामुळे त्याच्या खालच्या बाजूस १०० मीटर अंतरापर्यंत असणाऱ्या पाण्याच्या स्रोतांना वर्षभर पाणी उपलब्ध होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी सदर उपाययोजना उपयुक्त आहे.

पाणी साठविण्यासाठी शेततळे, पाझर तलाव

येत्या काळात उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे व कौशल्याने करावे लागते. काही वेळेस पाऊस पडतच नाही, तर कधी-कधी तो ऐन मोक्याच्या वेळेस ताण देतो. अशा वेळेस संरक्षित सिंचनाच्या आधारे पिकांना वाचवावे लागते. शेततळ्याच्या उपाययोजनेमुळे संरक्षित पाणी देणे शक्य असल्याने पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये ही उपाययोजना महत्त्वाची समजली जाते.

विहीर पुनर्भरण

  • जमिनीमध्ये अनेक वेगवेगळे भिन्न थर आढळतात. या थरांची जाडी, आकारमान वेगवेगळे आहे. पहिला थर मातीचा असून, या थरातून पाणी मुरण्याचा वेग हा दर दिवसाला साधारणपणे दोन सें.मी. असतो.
  • मुरमाच्या थरातून पाणी वाहण्याचा दर दहा सें.मी. असू शकतो. त्या खडकांना भेगा, फटी, सळ व सूक्ष्म छिद्रे असतात. त्या खडकातून पाणी वाहण्याचा दर हा २०० सें.मी. एवढासुद्धा असू शकतो. या सर्वांचा एकत्रितपणे विचार केला असता पावसाचे पाणी जमिनीवर पडल्यापासून भूजल साठ्यापर्यंत पोचण्यास साधारणपणे एक महिना किंवा जास्त कालावधी लागतो. म्हणजेच नैसर्गिक भूजल भरणाचा वेग फार कमी आहे, हे दिसून येते.
  • विहीर पुनर्भरण करताना विहीर व ओढ्याच्या अंतरामध्ये १० फूट लांबीचे दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत. विहिरीपासून पहिला खड्डा १० फूट लांब, १० फूट रुंद व १० फूट खोल घ्यावा. या खड्ड्याच्या तळाशी एक आडवे छिद्र घेऊन चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे हा खड्डा विहिरीशी जोडावा. या खड्ड्याच्या तळाशी २.५ फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. त्या थरावर २.५ फूट जाडीचा थर भरावा. त्यानंतर २.५ फूट जाडीचा वाळूचा चाळ (चालेली वाळू) भरून त्या थरावर धुतलेल्या वाळूचा २.५ जाडीचा थर भरून घ्यावा.
  • पहिल्या खड्ड्यापासून साधारणपणे ३.५ फूट अंतरावर पुन्हा १० फूट लांब, १० फूट रुंद व ३ फूट खोल असा  दुसरा खड्डा घ्यावा. खड्ड्याच्या तळाशी दोन फूट जाडीचा दगड-गोट्यांचा थर भरावा. जमिनीच्या पातळीवर चार इंची पी.व्ही.सी. पाइपद्वारे दोन्ही खड्डे जोडावेत. ओढ्याच्या पाण्यातील पालापाचोळा, कचरा हे  पहिल्या खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाइपद्वारे दुसऱ्या खड्ड्यात जाईल. दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेले स्वच्छ पाणी विहिरीत पाइपद्वारे जाऊन विहीर पुनर्भरण होईल. यासाठी १००० ते १५०० रुपये इतका खर्च साधारणपणे  अपेक्षित आहे.

कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण

  • कूपनलिका पुनर्भरण करताना कूपनलिके जवळून नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.
  • कूपनलिकेच्या सभोवताली २ मी. × २ मी. × २ मी. आकाराचा खड्डा खोदावा.
  • खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात १ ते २ सें.मी. अंतरावर सर्व बाजूंनी ४ ते ५ मि.मी. व्यासाची छिद्रे पाडावीत. या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावा.
  • खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगड-गोटे, त्यावरच्या भागात खडी, नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.
  • अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी या तयार केलेल्या गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल. यासाठी रु. १००० ते १५०० इतका खर्च साधारणपणे येतो.


वैजनाथ बोंबले - ९०४९५५९५५३.
संपर्क - ०२४६५-२२७७५७
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड येथे विषय विशेषज्ञ म्हणून (कृषी अभियांत्रिकी) कार्यरत आहेत)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate