पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी. प्रथम अपधाव क्षेत्रात, नंतर पुनर्भरण क्षेत्रात कामे पूर्ण केल्यानंतर साठवण क्षेत्रात कामे करावीत. जैविक आणि अभियांत्रिकी कामे शास्त्रीयदृष्टीने करणे आवश्यक आहे.
पाणलोट क्षेत्राचा विकास करताना त्या भागातील जमीन, पाण्याचा कार्यक्षम वापर करून कमीत कमी खर्चात शेती उत्पादन घेणे आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्रात मृद् व जलसंधारणासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. लागवडीस अयोग्य जमिनीवरील मृद् संधारणासाठी जलशोषक समतल चर, समातळी सलग चर करावेत. वहितीखालील क्षेत्रात जागच्या जागी पावसाचे पाणी मुरविण्यासाठी वेगवेगळ्या मशागत पद्धती, तसेच आंतरपिके पद्धतीचा अवलंब करावा. पाणलोटातील ओहळीत मृद् व जलसंधारणासाठी दगडाचे बांध, गॅबियन बंधारे, मातीचे नाला बांध बांधावेत.
पाणलोट विकासावर द्या लक्ष
- भूसंवर्धन करताना बांधबंदिस्ती, जमिनीची धूप थांबविणे, नदी अडविणे, पाणी जिरविणे महत्त्वाचे आहे. गावातील, शिवारातील पडणाऱ्या पावसाचे पाणी त्या गावात, शिवारातच कसे अडवून जिरविले जाईल याकडे लक्ष द्यावे.
- वहितीखालील क्षेत्र निष्कृष्ट होण्याची क्रिया कमी करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने माती, पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील पाणी आणि माती आपल्याच शेतात राहील याची दक्षता घ्यावी.
- मृद् व जलसंधारणाची कामे वेगवेगळ्या यंत्रणेच्या नियंत्रणाखाली, पाणलोट क्षेत्रात उपलब्ध निधीनुसार प्राधान्यक्रमानुसार राबवावी. ही सगळी कामे एकमेकांना पूरक आहेत. त्यांची यशस्वीताही सर्व घटक घटकांची एकत्रितपणे एकाच पाणलोट क्षेत्रात परस्परांशी सांगड घालून केली, तर त्याचा निश्चितच अधिक फायदा होईल.
- शेतीसाठी भूगर्भातील पाण्याचा उपसा फार जास्त होत आहे. त्यामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. आज जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झालेले आहे.
- जमिनीवरील गवत, झाडे, झुडपे यांचे आच्छादन कमी झाल्यामुळे जमिनीच्या मोठ्या प्रमाणावर धूप होते आणि जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होते. आज जमिनीत मुरणारे पाणी आणि उपसले जाणारे पाणी यांचा समतोल राहिलेला नाही.
भूजल पुनर्भरण
शेत पातळीवर पाणी अडवून जिरविण्यासाठी खोल नांगरणी, उताराला आडवी नांगरणी करावी. म्हणजे पावसाचे वाहते पाणी कमी वेगाने थांबून वाहते, जमिनीत जास्त प्रमाणात मुरते.
कच्चा बंधारा
- आपल्या शेताच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्यात दगड मातीमध्ये छोटासा बांध घालावा. साठविलेले पाणी दीर्घकाळ जमिनीत मुरत राहते.
- हे बंधारे दरवर्षी बांधावे लागतात. कमीत कमी खर्चात, श्रमदानाचे असे बंधारे जागोजागी बांधल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण होईल.
नाला बंडिंग
नाल्यात मातीचे नाला बांध बांधल्यास पावसाचे वाहणारे पाणी दीर्घकाळ साठून राहते. हे साठलेले पाणी जमिनीत कालांतराने मुरत जाते. आजूबाजूच्या परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होते.
वळवणीचा बंधारा
- नाल्याच्या प्रवाहामधून उजव्या आणि डाव्या बाजूने पाणी वळविण्याची सोय असल्यास वाहणारे पाणी शेतातून फिरत येते. यातूनच हे पाणी जमिनीत झिरपत जाते आणि पाणी अडविणे व झिरविणे हे साध्य होते.
- बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात मृद् व जलसंधारणाची कामे केल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरते आणि मुरलेले पाणी झऱ्याच्या स्वरूपात विहिरीत पुन्हा येते.
दगडी बंधारा
- पाणलोट क्षेत्रातून वाहणारे नाले अरुंद असतात. दोन्ही काठांवर खडक आढळतो अशा ठिकाणी दगडी बंधाऱ्याचा उपयोग पावसाचे पाणी अडविणे, साठविणे आणि जमिनीत जिरविणे यासाठी करता येतो.
- दगडी बंधाऱ्याची उंची, उतार, तळातील रुंदी यातील गोष्टी बंधाऱ्याच्या जागेवर अवलंबून असतात. बंधाऱ्यात पाणीसाठा जास्त झाल्यास अधिक येणारे पाणी बंधाऱ्यातून वाहून जाते. यामुळे बंधारा बांधताना हे पाणी बाजूच्या शेत जमिनीतून जाऊ नये याप्रमाणे बांधकाम करावे.
संपर्क - प्रा. मदन पेंडके - 9890433803
(लेखक वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)
स्त्रोत: अग्रोवन