जागतिक पाणी संशोधन परिषदेच्या अंदाजानुसार येणाऱ्या 20 वर्षांच्या काळात 40 टक्के पाण्याच्या वापरात वाढ होणार आहे. उपलब्ध पाण्यापेक्षा 17 टक्के अधिक पाणी अन्नधान्य उत्पादनासाठी लागणार आहे. मागील शतकात जगाची लोकसंख्या तिपटीने वाढली त्यामुळे पाण्याचा उपसा आणि वापर सात पटीने वाढला. दुसऱ्या बाजूला गोड्या पाण्याचे साठे मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले. त्यामुळे गोड पाण्यात विलक्षण घट झाली. परिणामी, चांगले जलस्रोत वाढत्या दबावाखाली असून त्यांचा दर्जा खालावत आहे.
आजही भूतलावर पडणाऱ्या पर्जन्यमानाच्या 42 टक्के पाऊस समुद्रात वाहून जातो. या पुढील काळात समुद्रात वाहून जाणारे पाणी जल-मृद्संधारणाच्या उपचारातून अडविणे आवश्यक आहे. यासाठी शेतकरी जलसाक्षर झाला पाहिजे. यासाठी राज्याच्या कृषी व जल धोरणात बदल आवश्यक आहेत.
जलस्रोत सांभाळा
जलस्रोतांच्या क्षमतेचा विचार केला असता, नद्यांच्या तुलनेत सरोवरांमध्ये म्हणजेच गाव तलाव, शेततळ्यामध्ये दहा पटीने जास्त पाणी आहे. जमिनीच्या ओलाव्यामध्ये नद्यांपेक्षा दुपटीने पाणी उपलब्ध आहे. वातावरणातील ओलाव्यामध्ये जवळपास नद्यांएवढे पाणी उपलब्ध आहे. बदलत्या वातावरणामध्ये भविष्यात कोरडवाहू शेतीत या चारही स्रोतांचा अतिशय कुशलतेने वापर करावा लागणार आहे. यासाठी आच्छादन तसेच आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतींचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने आतापासूनच करावा.
जून ते ऑक्टोबर महिन्यात पाऊस किती पडला यापेक्षा तो कसा पडला, याला कोरडवाहू शेतीमध्ये जास्त महत्त्व आहे. पावसाळ्यात एकूण पाऊस थोडा कमी जरी पडला, पण ठराविक अंतराने हमखास पडला तर कोरडवाहू शेतीमध्ये त्याचे महत्त्व फार मोठे आहे. अशा पावसात पिके हमखास चांगली येतात.
पावसाचे पाणी शेतातच मुरवा
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे आहे. यासाठी प्रथम शेतकऱ्यांनी स्वतःचे शेत हेच सूक्ष्म पाणलोट समजून शेताच्या चार धुऱ्याच्या आत पाऊस मुरवावा.
उताराला आडवी मशागत करावी. एक तासा आड किंवा प्रत्येक तासाला डवऱ्याच्या जानकुळाला दोरी बांधून सऱ्या काढून त्या माध्यमातून सरी वरंबे आणि गादी वाफे अशा प्रकारची रानबांधणी करावी. यामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी शेतामध्ये जिरेल. ओलावा वाढेल. उर्वरित पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये जमा करावे.
आतापर्यंत जल व मृद्संधारणाची कामे झाली आहेत, त्याचा काही अंशी फायदा झाला. परंतु विदर्भातील काळ्या खोल जमिनीमध्ये ही कामे टिकली नाहीत. शेतकऱ्यांनासुद्धा ते अडचणीचे वाटत असल्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु आता मूलस्थानी जल व मृद्संधारण या तंत्रज्ञानाने आशा पल्लवीत झाल्या आहेत.