वर्षानुवर्षे दुष्काळ आणि पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गोजुबावी (ता. बारामती, पुणे) गावाने गेल्या दीड वर्षात समतल चर व ओढे रुंदी-खोलीकरणाची कामे लोकसहभागातून केली आहेत. गेल्या वर्षी पावसाचे पाणी शेतशिवारातच जिरल्याने गावाची पाणीपातळी उंचावली आहे. यंदा प्रथमच पिण्याच्या पाण्याचा टॅंकर बंद झाला आहे. रब्बीची पिके शाश्वत नसलेल्या या गावात यंदा शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकेही यशस्वी घेतली. यंदा अद्याप पाऊस झाला नसला तरी जिरायती गोजुबावी गाव हिरवेगार अन् पाणीदार झाले आहे.
पुणे जिल्ह्यात बारामती शहरापासून पाटसच्या दिशेला अवघ्या 12 किलोमीटरवर बारामती विमानतळाशेजारी गोजुबावी गाव आहे. गावाला नदी नाही. दोन ओढे आहेत. मात्र ते बाजूच्या शेतांमधून वाहून आलेल्या गाळाची थाप बसून सपाट झालेले. परिणामी जो पाऊस होई तो न जिरता वाहून जायचा. गावच्या माथ्यावर वन विभागाचे सुमारे अडीचशे एकर काटेरी गायरान जंगल आहे. हे जंगल हाच गावच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत. शासनामार्फत या जंगलात समतल चर खणण्यात आले आहेत. पावसाचे पाणी या चरांमध्ये जिरते. यातून 1972 च्या दुष्काळात खोदलेल्या एका पाझर तलावाला आणि आजूबाजूच्या शेतांनाही ओलावा भेटतो. मात्र मुळात पाऊस कमी आणि त्यातही वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठे असल्याने गावचा दुष्काळ, पाणीटंचाई आणि टॅंकर वर्षानुवर्षे कायम होते. ही परिस्थिती बदलण्याची सुरवात झाली ती गेल्या वर्षी...
बारामती येथे एन्व्हॉर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया ही स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये टंचाईग्रस्त गावांच्या तलावांतील गाळ काढण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. सुमारे पाच कोटी रुपयांहून अधिक खर्चाची कामे यातून झाली. यानंतर गेल्या वर्षापासून "फोरम'मार्फत शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर बारामतीतील दुष्काळी गावांमध्ये ओढ्यांचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यासाठी संबंधित गावांना यंत्रसामग्री मोफत पुरवली जाते. गावाने त्याचा वापर करून ओढ्यांची कामे करून घ्यायची, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. यातून गेल्या वर्षी गोजुबावीसह लोणी भापकर, मुर्टी, मासाळवाडी, जळगाव सुपे, बाबुर्डी व अंजनगाव या गावांत सुमारे 10 किलोमीटर लांबीच्या ओढ्यांचे रुंदी-खोलीकरण करण्यात आले. गोजुबावीत गेल्या वर्षी "फोरम'मार्फत दीड किलोमीटर तर जिल्हा परिषदेमार्फत दोन किलोमीटर ओढ्यांचे असे काम झाले.
रुंदी-खोलीकरण करण्याचे निश्चित झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांचा गट शिरपूर तालुक्यातील जलसंधारणाचे हे काम स्वतः पाहून आला होता. स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन ओढे सरासरी साडेतीन मीटरपर्यंत खोल करण्यात आले. अनेक ठिकाणी ओढ्यांवरील अतिक्रमणेही काढून टाकण्यात आली. ठराविक अंतरावर ओढ्यात माती-मुरमाचे बांध घालण्यात आले. यामुळे ओढ्यांमध्ये बंधाऱ्यांची साखळीही तयार झाली. या पाझर बंधाऱ्यांमुळे गावाची पाणी साठविण्याची व जिरविण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढलीच. शिवाय ओढ्याच्या दोन्ही बाजूंच्या विहिरींच्या पाणीपातळीतही मोठी वाढ झाली. गेल्या वर्षी झालेल्या कामाचा फायदा यंदा दिसून आल्याने शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षीपर्यंत गोजुबावीत उन्हाळ्यात दररोज टॅंकरच्या सात फेऱ्या सुरू होत्या. जानेवारीपर्यंत गावातले सर्व पाणी संपून जायचे. यंदा भूजलात वाढ झाल्याने मार्च अखेरपर्यंत बहुतेक विहिरी पूर्ण भरल्या होत्या. एप्रिल-मे मध्येही विहिरींचे पाणी फारसे कमी झाले नाही. आता पावसाळ्याचा सुरवातीचा दीड महिना कोरडा गेल्यानंतर अद्यापही गावाला पाणीटंचाई जाणवलेली नाही. विहिरींत तसेच ओढ्यांत पुरेसा पाणीसाठा आहे. शेतकरी उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करीत आहेत. शेततळी उभारण्यासह डाळिंब, लिंबू अशा फळबागांना प्राधान्य देण्यात येत आहे. एरवी दाणे भरण्याच्या अवस्थेत वाळून जाणारी रब्बी ज्वारी मागील हंगामात उत्तम आली. रब्बी हंगामाची शाश्वती वाढली. काही शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमूग व चारा पिकांचे यशस्वी उत्पादन घेतले. गावात सेंद्रिय शेती उत्पादक गटांसह एकूण 15 शेतकरी गट कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत पाणी व्यवस्थापन जागृतीचे प्रयत्न सुरू आहेत.
गोजुबावीच्या विकासकामात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांची पुरेशी साथ आवश्यक आहे. सर्वांनी मिळून मनावर घेतलं तर एका वर्षात गावाचा कायापालट होऊ शकतो, असे ग्रामस्थ म्हणतात. ओढ्यावर अतिक्रमणे झाली आहेत. पूर्वी गावचे ओढे तीस-तीस मीटर रुंद होते. आता ते अवघ्या पाच, दहा फुटांपर्यंत लहान झालेत. रुंदी-खोलीकरण करताना अतिक्रमण झालेल्यांकडून विरोध होतो. अशा वेळी अतिक्रमण दूर करणे तर दूर...कोतवालही कामाच्या ठिकाणी उपस्थित राहतोच असे नाही. यामुळे विकासकामांची गती मंदावत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतात.
गोजुबावीतील शेतकरी म्हणतात...
""एन्व्हॉर्न्मेंटल फोरमच्या माध्यमातून गावात पाणी आलंय. लोकसहभाग अजून वाढायला हवा. गावात पाण्याची वाढलेली पाणीपातळी पाहून सुरवातीला झालेला विरोध हळूहळू मावळत आहे.''
गजाबा भगवान सरक, प्रगतिशील शेतकरी
""ओढा रुंदी-खोलीकरणामुळे गावातील दुष्काळ हटला. अजूनही साडेसहा किलोमीटर ओढ्यांचे काम बाकी आहे. येत्या वर्षभरात उर्वरित कामे पूर्ण करणार आहोत.''
कल्याणराव आटोळे, सरपंच, ग्रामपंचायत, गोजुबावी, ता. बारामती
पूर्वी गावात रब्बी ज्वारीचे पीकही समाधानकारक मिळत नव्हते. यंदा मात्र ज्वारी चांगली आली. उन्हाळ्यातही पिके घेणे शक्य झाले. पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
राघू मारुती आटोळे,
सदस्य, ग्रामपंचायत, गोजुबावी
""तालुक्यातील पाणीटंचाई कायमची संपुष्टात आणण्यासाठी फोरममार्फत काम सुरू आहे. तलावातील गाळ उपसा, ओढा रुंदी-खोलीकरणाबरोबरच जनजागृतीसाठी विद्यार्थी व शेतकरी केंद्रस्थानी ठेवून जलसंवर्धनाची मोहीम राबविण्याचा प्रयत्न आहे.''
सौ. सुनेत्राताई पवार, अध्यक्षा, एन्व्हॉर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती
संपर्क
1) गजाबा सरक - 9923871102.
2) कल्याणराव आटोळे, सरपंच - 9881276999.
3) डॉ. महेश गायकवाड, एन्व्हॉर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया - 9922414822.
स्त्रोत:अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
एखाद्या प्रदेशात दीर्घकाळ, सातत्याने सरासरीपेक्षा ...
“पाणी साठवा-गाव वाचवा” अभियानाची माहिती येथे देण्य...
वारंवार पडणार्या दुष्काळामुळे महाराष्ट्राची गणनाद...
पावसाचे पाणी हे प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रातून वा...