অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणलोट विकास आवश्‍यक

प्राचीन जलसंचय तंत्र - कश्‍यप ऋषी

कश्‍यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे. तलाव बांधत असताना शिल्पशास्त्रात पारंगत असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून राजाने आराखडा करावा.
कश्‍यपांनी खेड्यांच्या साखळीची कल्पना मांडली असून, ती अत्यंत महत्त्वाची आहे. राजाने आपल्या देशातील जंगलांमध्ये नद्यांच्या काठावर किंवा पठारावर गुराख्यांसाठी घरे व गुरांसाठी गोठे बांधून त्यांच्या निवासाची सोय करावी. लहान खेड्यांची साखळी तयार करावी. राजाने खेड्यातील लोकांसाठी विहीर व तलाव बांधून बागा तयार कराव्यात. भूमीचे विभाजन खेडी आणि नगरे जोडणारे रस्ते व देशातील महामार्गाने करावे.

  • कश्‍यपाने भूमीच्या परिस्थितीचा विचार करून तलाव तयार करण्यास सांगितले आहे. खेड्यांच्या किंवा नगरांच्या पश्‍चिम, उत्तर, पूर्व किंवा दक्षिण दिशेला जलाशय किंवा तलाव तयार करावा.
  • पाण्याच्या मडक्याप्रमाणे हा तलाव खोल असावा आणि त्याचा आकार बाणाप्रमाणे लांबोळा, तर काही ठिकाणी गोलाकार असावा; पण उथळ नसावा. त्याच्या संरक्षणासाठी मजबूत पाळ बांधावी. या पाळीच्या एका बाजूला मजबूत बांधलेला सांडवा असावा. त्यावर रस्ता असावा. तलावातील जास्त पाण्याला त्यातून मार्ग काढून द्यावा. म्हणून राजाने एक तर टेकडीच्या पायथ्याशी तलाव बांधावा किंवा सपाट भूमीवर मोठ्या तलावाला जोडलेला जलाशय (बोडी) तयार करावा किंवा मैदानी प्रदेशात घट्ट जमिनीवर बारमाही वाहणाऱ्या झऱ्याजवळ भरपूर पाणी साठवता येईल असा तलाव बांधावा. त्या जागी वाळू किंवा लहान दगड इत्यादी नसावेत.
  • अशा प्रकारे बांधलेल्या धरणाला पुराची दारे अशा प्रकारे बसवावीत, की जलाशय पाण्याने तुडुंब भरल्यानंतर पाळीवरून वाहणाऱ्या पाण्याने किंवा पाळी फोडून भरधाव वाहणाऱ्या पाण्याने खेडी, नगरे, किल्ल्याची भिंत, तटबंदी, बागबगीचे, खळ्याची जागा यांना धोका पोचू नये.
  • तलाव बांधल्यावर राजाने दर वर्षी अनेकदा त्याची पाहणी करावी. तलावाच्या पाळीवर पहारेकरी नेमले पाहिजेत. तलावातून काढलेले कालवे आणि लांबोळ्या आकाराचे तलाव यांची राखण करणे पावसाळ्यात आवश्‍यक असते.
  • पाण्याने पूर्ण भरलेल्या तलावामुळे धान्याचे उत्पादन होते. लोक सुखी होतात. रोगराई होत नाही व आगीची भीती राहत नाही.
  • जलाशयाच्या परिसरात सर्व द्विपाद, चतुष्पाद, पक्षी व सरपटणारे प्राणी यांना अवश्‍य वावर करू द्यावा. त्यामुळे त्या परिसरात कोणत्याही साथीच्या रोगाची भीती राहत नाही आणि वातावरण आल्हाददायक राहते.
  • जलाशयाला पाणी पुरविणाऱ्या बारमाही झऱ्यांची व ओढ्यांची काळजी घ्यावी, तसेच पर्वतावरील लहान-मोठे झरे, ओढे, जंगलातील ओहोळ आणि नैसर्गिक तळ्यांचे संरक्षण करावे. त्यामुळे जलाशयाला कायमचा पाण्याचा पुरवठा होत राहतो.
  • जलाशयाच्या परिसरात व कडेने वड, वडवर्गीय जातीचे वृक्ष, बांबू, वेत, कडुनिंब व कदंब ही झाडे लावावीत. या झाडांची मृदा धरून ठेवण्याची व जंतुनाशक म्हणून कार्यक्षमता असते. या झाडांची रोपे योग्य वेळी तलावाच्या काठावर, पाळीच्या उतारावर व कालव्याच्या सांडव्याजवळ लावावीत. त्याच वेळी स्नानाच्या घाटाला अडथळा होऊ नये व पाण्याच्या कुंडावर सावली राहावी.

पाणलोट विकास क्षेत्राचा विचार...

  • थोडक्यात, सध्या आपण ज्याला पाणलोट विकास क्षेत्र म्हणतो तीच कल्पना त्या काळात कश्‍यप ऋषींनी मांडलेली आहे.
  • जंगलातील झरे, ओढे यांची काळजी घ्यावी. नदीच्या उगमस्थानाच्या परिसराची काळजी घेतल्यास नदीच्या खोऱ्याची समृद्धी वाढते. ज्या प्रदेशात जलाशय निर्माण करणे शक्य नसेल अशा ठिकाणी चार प्रकारचे कालवे खोदण्यास सुचवले आहे.
  • कालव्याची रुंदी चार ते दहा हस्त म्हणजेच सहा ते पंधरा फूट असावी व त्या कालव्याचा शेवट एखाद्या तलावात करावा, असेही नमूद केलेले आहे.


विहीर अथवा तलाव खोदण्यासाठीची कश्‍यप ऋषींची संहिता

  • राजाने जलदेवता, वरुण, पृथ्वी देवता व वनदेवता यांची प्रार्थना करून मगच विहीर अथवा तलाव खोदण्यास आज्ञा द्यावी.
  • मानवाने निसर्गचक्र व निसर्गातील मूलतत्त्वांकडे फार काळजीपूर्वक व नम्रतेने बघायला पाहिजे. कारण त्यामुळेच मानवाच्या हस्तक्षेपानंतरही निसर्गातील समतोल कायम राहू शकेल.
  • उपासना किंवा प्रार्थना करण्यामुळे मानवाचा लोभ किंवा हाव या वृत्तीवर नियंत्रण राहते. त्याचबरोबर मानवाला वन, जल यांचे जीवनातील महत्त्व समजते.
  • कश्‍यप ऋषींनी श्रीमुख, विजय, दुंदुभी, चुडामणी, भद्र, जय, नंद असे जलाशयाचे अनेक प्रकार त्यांच्या वैशिष्ट्यांसह सांगितले आहेत.

कश्‍यपांनी सुचविलेले जलाशयाचे आकारमान


एखाद्या जलाशयाचे जास्तीत जास्त आकारमान व सुयोग्य आकार किती असावा याबाबत कश्‍यपांचा विचार आजही अतिशय महत्त्वाचा वाटतो. त्यांनी सुचविलेली परिमाणे पुढीलप्रमाणे ः

  • योग्य आकाराचा जलाशय चार हजार क्युबीटचा असावा. (१ क्युबीट - १८ इंच).
  • मध्यम जलाशय दोन हजार क्युबीट व लहान जलाशय एक हजार क्युबीट असावा.

हे आकार ठरविताना फक्त अभियंत्याच्या यांत्रिकी कर्तृत्वावर अवलंबून राहू नये, तर वसाहतीची पाण्याची गरज, तेथील लोकांमधील सहकार, जंगलाचे स्वरूप, पर्वतावर उगम पावून खाली येणारे झरे, ओढे यांचे स्वरूप, मानवी वस्तीची जागा असा सर्वंकष विचार करावा.

विश्‍ववल्लभ ग्रंथातील डोंगराळ भागातील जलसंचय


चक्रपाणी मिश्राच्या विश्‍ववल्लभ ग्रंथातील विहिरी व तलावाची वैशिष्ट्ये हा ग्रंथ बागायतीवर आधारित आहे. त्यानेही सुरपाल ऋषींप्रमाणेच जमिनीखालील पाण्याचा शोध घेण्यासाठी अनेक खुणांची सविस्तर माहिती दिली आहे; पण तो राजस्थानातील असल्याने या खुणा त्याने जमिनीच्या अनुषंगाने सांगितल्या आहेत. डोंगराळ भागातील पाण्याचे प्रवाह शोधण्यास सांगितलेल्या वेगळ्या खुणांची भर या विषयात टाकली आहे. डोंगराळ भागात विहिरी खोदकाम करताना कठीण खडक लागू शकतात. त्यामुळे कामगारांच्या हत्यारांचे नुकसान होऊ नये म्हणून विशेष दक्षता घेण्यासाठी वेगळी माहिती चक्रपाणीने दिली आहे. निरनिराळ्या प्रकारच्या विहिरी आणि तलावांची माहिती त्याने दिली आहे. दोन पर्वतांच्या घळीतून वाहणाऱ्या नदीवर धरण बांधायचे तंत्र त्याने वर्णिले आहे.कोरडवाहू शेती आणि बागायतीवरील या ग्रंथातून प्राचीन काळाच्या पाण्याच्या नियोजनासंबंधी विविध माहिती उपलब्ध होते. आजचे तंत्रज्ञान पाश्‍चात्त्यांकडून मिळवलेले आहे. या दोन्हींचा मेळ घालण्याचे काम मात्र झालेले नाही. देशाच्या आणि मानवजातीच्या कल्याणाकरिता अभ्यास होणे आवश्‍यक आहे, असे वाटते.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate