पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे.कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर लांब, दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा.
खड्ड्यातील उंची एवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें.मी. अंतरावर सर्व बाजूने चार-पाच मि.लि. व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.
खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरच्या भागात खडी नंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात धुतलेली वाळू भरावी.
अशाप्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
कूपनलिका पुनर्भरण करण्यासाठी साधारणतः 5,000 रुपये एवढा खर्च येतो.
विहीर व कूपनलिका पुनर्भरणाच्या वेळी घ्यावयाची काळजी
ओढ्याला येणारे पाणी हे क्षार व रसायनविरहित असावे.
विहिरी पाणी तळापर्यंत पाइपद्वारे पोचवावे.
पुनर्भरणापूर्वी दोन गाळणी खड्डे असावेत.
पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ काढून टाकावा.
पुनर्भरण हे गाळलेल्या व स्वच्छ पाण्यानेच करावे.
ज्या क्षेत्रावर मीठ फुटले असेल म्हणजेच क्षार जमा झाले असतील, त्या क्षेत्रावरील पाणी विहीर पुनर्भरणास वापरू नये.
औद्योगिक क्षेत्रातील पावसाचे पाणी पुनर्भरणास वापरू नये.
साखर कारखाना परिसरात जेथे मळी जमिनीवर पसरली जाते, त्या भागातील पाणी वापरू नये.
सूक्ष्म जिवाणूजन्य तथा रोगराईस्थित क्षेत्रातील पाणी वापरू नये.
वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेली गाळणी पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ करावी.
कूपनलिका पुनर्भरणासाठी लागणारे साहित्य
लोखंडी ड्रील (चार-पाच मि.मी.) काथ्या, गाळणी, धुतलेली वाळू, वाळूची चाळ, खडी आणि दगडगोटे.
: 02426 - 243268/ 243326
भूजल संशोधन प्रकल्प,
जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी