सीरिया येथील युफेरटेस् या नदीकाठी वसलेल्या शहराचे उत्खनन सुरू असून, त्यामध्ये ६२०० वर्षांपूर्वीच्या थडग्यामध्ये शिस्टोसोमियासिस परजीवींची अंडी आढळली आहेत. हा मध्यपूर्वेतील कृषी व सिंचन पद्धतीचा सर्वांत जुना पुरावा मानण्यात येत आहे. हे संशोधन ‘लॅन्सेट इन्फेक्शियस डिसिजेस’ या वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेल्या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
सध्याच्या इराक, इराण, कुवेत, सीरिया आणि तुर्की या देशांमध्ये विभागलेल्या युफेरटेस् या नदीच्या परिसरामध्ये प्राचीन काळी मेसोपोटामिया ही संस्कृती नांदत होती. या ठिकाणी उत्खननामध्ये आढळलेल्या ६२०० वर्षांच्या एका थडग्यामध्ये शिस्टोसोमियासिस परजीवींची अंडी आढळली आहेत. त्याविषयी माहिती देताना इंग्लंड येथील केम्ब्रिज विद्यापीठातील डॉ. पियर्स मिटचेल यांनी सांगितले, की मानवनिर्मित तंत्रज्ञान वापराचा हा सर्वांत प्राचीन व जुना पुरावा आहे. मेसोपोटामियामध्ये अंदाजे ७५०० वर्षांपूर्वी सिंचनाची सुविधा वापरली जात असावी, कारण शिस्टोसोमियासिस हा परजीवी ताज्या उष्ण पाण्यामध्ये राहणाऱ्या गोगलगायींच्या शरीरात काही काळ व्यतित करतो. गोगलगायीच्या संपर्कात येण्यासाठी अशा पाण्यामध्ये काम करणाऱ्या शेतकरी किंवा पोहणाऱ्या माणसांच्या त्वचेमध्ये परजीवी शिरू शकतो. या ठिकाणी आढळलेल्या पिकांसाठी सिंचनाच्या सुविधा या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असाव्यात, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तैल झैदान (सीरिया) येथील या संशोधनासाठी केम्ब्रिज (इंग्लंड), सायप्रस संस्था (सायप्रस), शिकागो विद्यापीठ (अमेरिका) येथील उत्खननशास्त्र, जीवशास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय गट कार्यरत होता.
आज या संशोधनाचे महत्त्व काय
या आधी ५२०० वर्षांपूर्वीच्या इजिप्शियन ममीमध्ये शिस्टोसोमियासिस परजीवींची अंडी आढळली होती. सीरियामध्ये आढळलेल्या थडग्याच्या आतडे आणि पोटाच्या भागामध्ये ही अंडी आढळली असून, डोके आणि पायाच्या भागातील मातीत परजीवीची अंडी आढळली नाहीत. म्हणजेच ही थडग्याची जागा बाह्य घटकांमुळे प्रदूषित झालेली नाही, हे स्पष्ट होते. त्यामुळे ६२०० वर्षांपूर्वीचा हा सर्वांत जुना पुरावा असल्याचे मानले जात आहे.
आधुनिक जगामध्येही शिस्टोसोमियासिस रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, जगभरामध्ये २०० दशलक्ष लोक या परजीवीने ग्रस्त आहेत. आतडे आणि पोटाच्या रक्तवाहिन्यांमध्ये आढळणाऱ्या स्चिस्टोसोमियासिस या पट्टकृमी परजीवीच्या काही प्रजाती असून, त्यामुळे शिस्टोसोमियासिस या रोगाचा प्रादुर्भाव होतो. तसेच, अधिक प्रादुर्भावानंतर रक्तक्षय, किडनीच्या कार्यामध्ये बाधा यासोबतच आतड्याचा कर्करोगही होऊ शकतो.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या ऊस पिकातील खालची पक...
ठिबकद्वारा पाण्यात विरघळणारी खते दिल्यास खतांचे नु...
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साधारण...
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...