सुरगाणा तालुक्यातील गोंदुणे या साडेसातशे लोकवस्तीच्या छोटेशा गावात वनप्रेमी आदिवासी शेतकऱ्यांनी गावाभोवतालच्या 385 हेक्टर क्षेत्रावरील वनाचे संवर्धन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. जलसंधारण आणि वन संवर्धनाच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीला गती मिळाली आहे.
गावाच्या समृद्धीत 2016 -17 मध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांनी विशेष भर टाकली. विविध योजनांच्या माध्यमातून गावात सिमेंट बांध तयार करणे, पाझर तलावातील गाळ काढणे, चर खोदणे अशी कामे करण्यात आली. याचा परिणाम पाणी टंचाई कमी होण्यात तर झालाच पण या बरोबरच जंगलातील वृक्षराजी बहराण्यातही झाला. जल संपत्ती वाढावी यासाठी वन विभागासोबत गावकऱ्यांनी केलेल्या कामांनी प्रभावित होऊन आजूबाजूच्या इतर गावांनी जलसंवर्धनासाठी कामांमध्ये सहभाग घेतला आहे.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण चिमना भोये, मंगळ गावित, शिवराम भोये आदी सहकाऱ्यांनी डोंगरमाथ्यावरील पाणी माथ्यावर अडवून व जिरवून जंगलातील मातीची धूप थांबवण्यासाठी काम केले. वनपाल दादासाहेब बडे यांनी विभागाच्या योजनांचा नियोजित लाभ गावाला मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केले. यातून वर्षभर पाण्याची उपलब्धता राहाण्यास मदत झाली. वृक्ष संगोपणासाठी व संरक्षणासाठी समितीने विशेष कष्ट घेतले आहे.
वन विभागाने पाणीसाठे वाढवण्यासाठी गावाचा सुक्ष्म आराखडा तयार केला. सिमेंट बंधारे व पाझर तलावाचे खोलीकरण आणि जंगलासाठी बांबू रांझ्याच्या क्षेत्रात जल शोषक चर अशी कामे त्यातून उभी राहिली. यासाठी पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक रामानूजन यांनी लक्ष घालून कामाची गुणवत्ता राखण्याकडे लक्ष दिले.
संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडे वर्ग केलेल्या क्षेत्रातल्या पाझर तलावातील गाळ काढण्यासाठी जेसीबी मशीन, ट्रॅक्टर उपलब्ध करुन दिल्याने कामांना गती मिळाली. खेालीकरण झालेल्या तलावात मोठा जलसाठा तयार झाला आहे. वन विभागाने बांबू कार्यवृत्त अंतर्गत बांबू रांझ्यांसमोर बाजूस सहा हजार 700 चर विविध ठिकाणी खेादण्याचा निर्णय घेतला. यातून 4 बाय 0.6 बाय 0.3 मीटर आकाराचे चर खोदण्यात आले. पाणी मुरल्याने उन्हाळ्यातही बांबूची चांगली वाढ होत आहे. या चरांमधली काढलेली माती बांबूच्या मूळांना टाकून भर दिली गेली आहे.
वनविभागाने राष्ट्रीय वनीकरण योजनेअंतर्गत सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची, उंची वाढवण्याची, खोलीकरणाची कामे व नवीन कामे केली आहेत. गाव व परिसरात तलाव व 12 साखळी बंधाऱ्यांमध्ये जवळपास दहा लाख घनफूट पाणी साठा जमा करण्यात यश आले आहे. या कामामुळे गाव व जंगलक्षेत्र सुजलाम सुफलाम झाले आहे. श्रमदानातून ओघळीवर दगड बांध घालणे, गाळ काढणे, त्यांचे दुरुस्तीसाठी पुढाकार घेऊन गावाने सहकार्य पुरवल्याने विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा
हुरुप वाढला आहे. पूर्वीच्या वनराई बंधाऱ्यांचे रुपांतर सिमेंट नाला बांधामध्ये झाल्याने पाण्याची गळती देखील थांबली आहे.
जलसंधारणच्या विविध कामांचा परिणाम विहीरींच्या पाणी पातळीत वाढ होऊन वर्षभरासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच, सिंचन, पाळीव जनावरे, वृक्षसंवर्धनाबरोबरच वन्यप्राण्यांना पाणवठा उपलब्ध करुन देण्यासाठी या पाण्याचा उपयोग होत आहे. वन्यप्राण्याचे आश्रयस्थान विकसीत होण्यासाठी याचा उपयोग होण्याबरोबरच ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबली आहे.
लक्ष्मण भोये, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती गोंदुणे - वन व जल संपत्ती वाढवण्यासाठी ग्रामस्तरीय समिती, शेतकरी, तरुणांसह, स्त्रियांचाही सहभाग महत्त्वाचा ठरला. लोकसहभाग एकोप्याचे महत्त्व पटल्याने सर्वांच्या सहभागातून बंधारे व तलावांसाठी मिळालेल्या निधीचा योग्य वापर झाला. नागरिकांचा उत्साह वाढला असून वृक्षारोपण, गोपालन, दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून गावाचा विकास करायचा आहे.
लेखक:किरण वाघ
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/28/2020