অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा सिंचन क्षेत्राला लाभ

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा सिंचन क्षेत्राला लाभ

· केंद्रीय जल आयोगातर्फे 750 कोटी रुपये

· अपूर्ण कामांना मिळाली गती

· वितरण प्रणालीच्या कामामुळे शेतकऱ्यांना थेट पाणी

· बंद नलीका वितरणामुळे पाण्याचा अपव्यय टळणार

· 421 कोटी रुपयाचे निविदा, 30 हजार 600 हेक्टरला पाणी

गोसीखुर्द या राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने नाबार्डमार्फत 750 कोटी रुपये उपलबध करुन दिल्यामुळे मुख्य कालव्यापासून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत थेट पाणी पोहचविण्याचे बंदनालिका वितरण प्रणालीद्वारे पाणी देण्यात येणार आहे. यासाठी 421 कोटी रुपयाच्या निविदांची प्रक्रिया पूर्ण झाली असून यामुळे लाभक्षेत्रातील 30 हजार 600 हेक्टर प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प हा नागपूर, भंडारा, चंद्रपूर या जिल्हयाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरणार असल्यामुळे राज्य व केंद्र शासनाने अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये 620 दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पातून 62 हजार 263 हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध झाली असून या प्रकल्पाच्या पाणी वितरीकेचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 2 लाख 50 हजार 800 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 2019-20 पर्यंतचे नियोजन करण्यात आले आहे.

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प नऊ घटका मिळून तयार झाला असून यामध्ये मुख्य धरण चार उपसासिंचन योजना, उजवा कालवा, डावा कालवा, असोला-मेंढा प्रकल्प व इतर छोटया पाच उपसासिंचन योजनेचा समावेश आहे. या प्रकल्पाच्या कामांना गती मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सिंचनासाठी पाणी मिळत असल्यामुळे भात पिकासह इतर पीकांच्या उत्पादनामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या प्रकल्पाचे काम नियोजित आराखडयानुसार पूर्ण करण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राथमिकता दिली असून केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होत आहे.

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पामधून उजवा कालवा 99 किलोमीटरचा असून भंडारा व चंद्रपूर या जिल्हयातील सुमारे 71 हजार 810 हेक्टर सिंचन निर्माण होणार असून त्यापैकी 13 हजार 926 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे. डावा कालवा हा 23 किलोमीटरचा असून यामधून 31 हजार 577 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणारअसून त्यापैकी 10 हजार 683 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. उजवा कालव्याच्या पुढे आसोला मेंढा प्रकल्प व मुख्य कालव्यापर्यंत राहणार असून त्याची लांबी 43 किलोमीटरची आहे. यामधून 12 हजार 356 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले आहे.

गोसीखुर्द प्रकल्पामधून तीन जिल्हयांना प्रत्यक्ष लाभ मिळत असून यामध्ये नागपूर जिल्हयातील 22 हजार 997 हेक्टर सिंचन क्षमतेपैकी 13 हजार 696 हेक्टर क्षेत्राला सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. भंडारा जिल्हयातील 87 हजार 647 क्षमतेपैकी 24 हजार 300 हेक्टर क्षेत्राला सिंचन सुरु आहे, तर चंद्रपूर जिल्हयातील 1 लक्ष 40 हजार 156 सिंचन क्षमतेपैकी 24 हजार 206 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळत आहे. या प्रकल्पावर चार उपसासिंचन योजना असून यामध्ये टेकेपार उपसासिंचन योजनेवर 7 हजार 710 हेक्टर, आंभोरा उपसासिंचन योजनेवर 11 हजार 195 हेक्टर, मोखाबर्डी उपसासिंचन योजना तसेच नेरला उपसासिंचन योजनेवरही प्रत्यक्ष सिंचनाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी तीन वर्षाचा कालबध्द नियोजन आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता अरुण कांबळे, तसेच अधीक्षक अभियंता जे.एम. शेख यांनी दिली.

    प्रकल्पाचे उद्दिष्ट
  • डिसेंबर-2017 पर्यंत 940 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा व ऑक्टोबर-2018 पर्यंत 1146 दलघमी पूर्ण पाणीसाठा निर्माण करणे.
  • धरणाचे सांडव्यामधील चार बांधकाम विमाचके बंद करण्याचे काम पूर्ण करणे.
  • मोखाबर्डी उपसासिंचन योजना कार्यान्वीत करुन 1498 हेक्टर व जून-2018 पर्यंत अतिरिक्त 7 हजार 250 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे.
  • बंदनलिकेद्वारे 42 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण करणे.
  • कालव्यावरील पाच उपसासिंचन योजना जून-2019 पर्यंत पूर्ण करणे.
  • लेखक - अनिल गडेकर

    जिल्हा माहिती अधिकारी, नागपूर

    माहिती स्रोत : महान्यूज

    अंतिम सुधारित : 6/27/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate