অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जमीन, पीक अवस्थेनुसार करा पाणी नियोजन

जमीन, पीक अवस्थेनुसार करा पाणी नियोजन

संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन

  1. पिकाची पाण्याची गरज ही हवामानावर म्हणजे हवामानाच्या विविध घटकांवर (उदा. तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिवसाचे सूर्यप्रकाशाचे तास इ.) अवलंबून असते.
  2. संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन हे एका विशिष्ट संदर्भीय पिकासाठी बाष्पीभवन व पर्णोत्सर्जनाद्वारा लागणाऱ्या पाण्याची गरज दर्शविते. विविध पिकांची पाण्याची गरज ही पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जनाशी संबंधित असते. हा संबंध विविध पिकांच्या पीक गुणांकाद्वारा निश्‍चित केला जातो.
  3. जर विशिष्ट पिकाचा त्याच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पीक गुणांक माहिती असेल तर विशिष्ट जागेच्या हवामानाप्रमाणे सूत्रांच्या साहायाने संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढून विशिष्ट पिकाची त्या वाढीच्या अवस्थेसाठी बाष्पर्णोत्सर्जन किंवा पाण्याची गरज काढता येते.

संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढण्याच्या पद्धती

पेनमन मॉटिथ पद्धत

  1. या पद्धतीद्वारा जर आपणास विशिष्ट प्रदेशाचे दररोजचे जास्तीत जास्त तापमान, कमीत कमी तापमान, जास्तीत जास्त आर्द्रता, कमीत कमी आर्द्रता, सूर्यप्रकाशाचे तास व वाऱ्याचा वेग माहिती असेल तर सूत्राच्या साह्याने संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढता येते.
  2. वरील सर्व हवामान विषयक माहिती वेधशाळेद्वारा किंवा स्वयंचलित हवामान केंद्राद्वारा उपलब्ध होऊ शकते. या हवामान घटकाची माहिती दररोज उपलब्ध होण्यास अडचणी असल्यास बऱ्याच वेळा मागील 25-30 वर्षांच्या हवामानाच्या घटकाची माहिती घेऊन प्रत्येक आठवड्याचे सरासरी बाष्पपर्णोत्सर्जन काढून त्याचाही वापर करता येईल.

बाष्पीभवन पात्र पद्धत

  1. वर नमुद केलेल्या घटकांचे मोजमाप करून (प्रचलित हवामान केंद्र किंवा स्वयंचलित हवामान केंद्राद्वारा) विविध सूत्रांद्वारा संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जन काढता येते. या सर्व हवामानाच्या घटकांची माहिती काढणे किंवा मोजणे हे क्‍लिष्ट होऊ शकते. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम पाण्याच्या बाष्पीभवनावर होतो, त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाविषयी माहिती असेल तर पिकाची पाण्याची गरज काढता येते.
  2. संदर्भीय बाष्पपर्णोत्सर्जनाची किंवा पाण्याच्या बाष्पीभवनाची माहिती हवामान खात्याच्या वेधशाळेमधून किंवा बाष्पीभवन पात्राद्वारा घेता येते. बऱ्याच वेळा वेधशाळेमधून माहिती घेण्यास विलंब लागू शकतो.
  3. अशा वेळी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात बाष्पीभवन पात्र बसविल्यास त्याद्वारा पाण्याच्या बाष्पीभवनाचे मोजमाप करू शकतात. बाष्पीभवन पात्र प्रत्येक शेतासाठी वेगळे बसविण्याची आवश्‍यकता नाही. शेतकरी सामुदायिक पद्धतीने संपूर्ण गावासाठी एकाच बाष्पीभवन पात्राचा उपयोग करू शकतात.
  4. बाष्पीभवन पात्र 1.2 मीटर व्यासाचे व 30 सेमी खोलीचे दोन्ही बाजूंनी पांढऱ्या रंगाने रंगविलेले असते. हे पात्र लोखंडी पत्र्यापासून बनविलेले असते. हे पात्र शेतात एका लाकडी चौकटीवर ठेवावे. चौकटीखालून हवा खेळत राहील हे बघावे. बाष्पीभवन पात्राच्या मध्यभागी एक दर्शक असतो. या दर्शकाला एक मोजपट्टी बसविली असते. बाष्पीभवन पात्र प्रथम दर्शकाच्या टोकापर्यंत भरावे (सकाळ 8 च्या दरम्यान). दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता, मागच्या संपूर्ण दिवसाच्या हवामानाप्रमाणे बाष्पीभवन पात्रामधल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याची पातळी खाली गेली असेल. पाण्याची पातळी किती मिलिमीटरनी खाली गेली हे मोजपट्टीच्या साह्याने मोजावे. हे मोजमाप म्हणजे एका दिवसात झालेले पाण्याचे बाष्पीभवन.
  5. बाष्पीभवन पात्रामधील पाण्याचे बाष्पीभवन संपूर्ण पीक असणाऱ्या जमिनीमधून होणाऱ्या बाष्पीभवनापेक्षा जास्त असते.
  6. असे बाष्पीभवन पात्र लोखंडी असल्याने त्याचे तापमान वाढल्यामुळे तसेच बाष्पीभवन पात्रातील पृष्ठभाग हा संपूर्ण पाण्याचा असल्याने होते; परंतु बाष्पीभवन पात्रामधून होणारे बाष्पीभवन व जमिनीमधून होणारे बाष्पीभवन यामध्ये संबंध आहे.
  7. बाष्पीभवन पात्रातून होणारे बाष्पीभवन हे जमिनीमधून होणाऱ्या बाष्पीभवनाच्या 70 ते 80 टक्के असते. यालाच बाष्पीभवन पात्र गुणांक असे संबोधतात. हा गुणांक 0.7 ते 0.8 इतका घ्यावा. पश्‍चिम महाराष्ट्रासाठी हा गुणांक 0.8 इतका धरावा. बाष्पीभवन पात्रातील बाष्पीभवनास बाष्पीभवन पात्र गुणांकाने गुणल्यास संदर्भीय पर्णोत्सर्जन मिळते.

पीक गुणांक (ब)

  1. पाण्याची गरजही पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार बदलत असते. सुरवातीच्या काळात गरज कमी असते. जशी वाढ होते तशी गरज वाढत जाऊन, पूर्ण वाढ झाल्यावर व फुले फळे धारणा झाल्यावर गरज थोडी कमी होते.
  2. पीक व पिकांच्या अवस्थेप्रमाणे बदलती पाण्याची गरजही पीक गुणांकाच्या साह्याने लक्षात घेता येते.
  3. पीक गुणांक हा साधारणतः पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे 0.2 ते 1.15 च्या दरम्यान असू शकतो.
  4. महत्त्वाच्या पिकांचा अधिकतम पीक गुणांक ः
  5. भाजीपाला - 0.85, फळझाडे - 0.75, केळी - 1.0, ऊस - 1.10

ओलित गुणांक (क)

  1. कुठल्याही सिंचन पद्धतीने पिकास पाणी देताना हे त्याच्या मुळांच्या कार्यक्षम क्षेत्रात द्यावे लागते. प्रवाही व फवारा सिंचन पद्धतीद्वारा पाणी हे जमिनीच्या संपूर्ण पृष्ठभागावर द्यावे लागते, त्यामुळे या पद्धतीद्वारा मुळांच्या कार्यक्षम कक्षेसह इतरही भाग ओला होतो.
  2. ठिबक सिंचन प्रणालीमध्ये पाणी तोटीद्वारा मुळाच्या कक्षेमध्ये देता येते, त्यामुळे तोट्यांची संख्या व प्रवाह यांचा व्यवस्थात मेळ घडवून आणून फक्त पिकाच्या मुळाच्या कार्यक्षम कक्षेतच पाणी देता येते व बाकीचा भाग कोरडा ठेवता येतो.
  3. ठिबक सिंचन प्रणालीद्वारा सिंचनाच्या पाण्याची मात्रा काढताना शेताचे किंवा झाडाचे संपूर्ण क्षेत्रफळ गृहीत न धरता फक्त जो भाग ओला करावयाचा आहे तेवढाच गृहीत धरावा. त्यासाठी एकूण क्षेत्रफळास ओलित गुणांकाने गुणावे लागते. ओलित गुणांक 0.1 ते 1.0 एवढा पिकानुसार गृहीत धरावा.
  4. ओलित गुणांक पीक व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसारसुद्धा बदलत जातो. मुख्यत्वे करून फळझाडांसाठी सुरवातीच्या काळात कार्यक्षम मुळांचे क्षेत्र हे जास्त नसल्याने ओलित गुणांक हासुद्धा कमी असतो. तो झाडाच्या वयाप्रमाणे वाढत जातो. हा नंतर स्थिर होतो.

महत्त्वाच्या पिकांचा अधिकतम ओलित गुणांक

  1. खूप कमी अंतरावरची पिके (उदा. लसूण, कांदा, भुईमूग इ.) - 1.0
  2. कमी अंतरावरची पिके (उदा. भाजीपाल, ऊस) - 0.6 ते 0.8
  3. मध्यम अंतरावरची पिके (उदा. केळी, द्राक्षे) - 0.4 ते 0.6
  4. जास्त अंतरावरची पिके (उदा. फळझाडे - डाळिंब, लिंबू) - 0.2 ते 0.4
  5. खूप अंतरावरची पिके (उदा. आंबा, नारळ, चिकू) - 0.2 ते 0.25

फळझाडांसाठी झाडांनी व्यापलेले क्षेत्र (ड)

एका झाडाने व्यापलेले क्षेत्र हे दोन ओळींमधील अंतर (मीटर) गुणिले एका ओळीतील दोन झाडांमधील अंतर (मीटर) याप्रमाणे काढावे.

ओळीत घेणाऱ्या पिकांसाठी एका तोटीचे क्षेत्र (ड)

एका तोटीचे क्षेत्र हे उपनळ्यांमधील अंतर (मीटर) गुणिले एका उपनळीवर असलेल्या दोन तोट्यांमधील अंतर (मीटर) या प्रमाणे काढावे.

संचाची कार्यश्रमता (इ)

  1. संचाची कार्यक्षमता ही आराखडा तयार करतानाची एक महत्त्वाची बाब आहे. ठिबक सिंचन प्रणालीचा आराखडा अपेक्षित कार्यक्षमतेसाठी तयार करता येतो. ठिबक संच प्रणालीसाठी लागणारा खर्च व पाणी वापराची कार्यक्षमता याचा योग्य मेळ घालून संचाची अपेक्षित कार्यक्षमता साधारणतः 90 ते 95 टक्के (0.9 ते 0.15) एवढी गृहीत धरावी.

 

स्त्रोत : अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate