ज्या ठिकाणी जास्त पाऊस व जास्त उतार असेल, अशा ठिकाणी यांत्रिकी कामे करावीत. कमी पाऊस, कमी उतार व कमी खोलीच्या जमिनीत जागच्या जागी पाणी मुरविण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा. जर या पद्धतीने पाणी मुरवणे शक्य नसेल, तर मृद् व जलसंधारण पद्धतीचा अवलंब करताना प्रथम जागच्या जागी म्हणजे शिवारातल्या शिवारात पाणी मुरविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या तंत्राची अंमलबजावणी करावी, यांत्रिकी बांधबंदिस्ती करावी.
कोरडवाहू शेतीत जेथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे आणि जमिनीला फारसा उतार नाही, अशा ठिकाणी उताराला आडवे वाफे तयार करावेत. वाफे तयार करताना जमिनीच्या उतारानुसार व प्रकारानुसार नांगराने उभे-आडवे 6 x 6 मी. ते 10 x 10 मी. अंतरावर आडवे सपाट वाफे तयार करावेत. वरंब्याची उंची 20 ते 30 सें. मी. ठेवावी. असे वाफे जागोजागी पाणी मुरविण्यास मदत करतात, त्यामुळे जमिनीत नेहमीपेक्षा 50 टक्के जास्त ओल साठविली जाते.
मध्यम ते भारी जमिनीत बळिराम नांगराने उतारास आडवे सरी- वरंबे तयार करावेत, त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्यांतून जमिनीत मुरते. सऱ्यांमुळे उताराची लांबी कमी होऊन निरनिराळ्या भागात विभागली जाते, त्यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यास जागोजागी अडथळे निर्माण होतात आणि पाणी जमिनीत मुरते. या पद्धतीत 80 टक्क्यांपर्यंत पाणी जमिनीत मुरते, तसेच जमिनीतून माती वाहून जात नाही. सऱ्यांची लांबी साधारणतः 90 मीटरपर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे 35 ते 40 टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.
या पद्धतीत मुख्य वरंबे उताराला आडवे ठेवावेत, तर बंदिस्त वरंबे उताराच्या दिशेने ठेवावेत. अशा रीतीने उताराला आडवे बंदिस्त सरी- वरंबे तयार होतात. मुख्य वरंब्याची लांबी सहा मीटर व उंची 30 सें. मी. ठेवावी, तर बंदिस्त वरंब्याची उंची 20 सें. मी. व दोन वरंब्यांतील अंतर तीन मीटर ठेवावे. या पद्धतीत जास्त पाऊस पडला तरी बंदिस्त वरंबे फुटून संथ गतीने पाणी शेतातून बाहेर जाते. ही पद्धत कोरडवाहू भागात चोपण व क्षारयुक्त जमिनीत पाणी मुरविण्यासाठी उपयुक्त असून, त्यामुळे जमिनीतील विद्राव्य क्षारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
या पद्धतीमुळे पाणलोट क्षेत्रातील माती व पाणी वेगवेगळ्या स्तरांवर थोपवून धरले जाते, त्यामुळे जमिनीत पाणी मुरविण्याचा कालावधी वाढविला जातो आणि जमिनीतील ओलावा वाढविण्यास मदत होते. यासाठी सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी आणि पेरणी यासारखी जमिनीची मशागतीची कामे समपातळीत पण उताराच्या आडव्या दिशेने करावीत, त्यामुळे जमिनीच्या उताराची संपूर्ण लांबी लहान लहान वरंब्यांत विभागली जाते, त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, धूपीस आळा बसतो. जमीन सपाट केल्यामुळे जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सारख्या प्रमाणात पाणी साचते. जमिनीच्या धूपीस आळा बसतो.
संपर्क - 0217 - 2373047, 2373209
विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.
------------------------------------------------------------------------------------------------
अंतिम सुधारित : 10/7/2020
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...
पाणी बचती संबधी नियोजनालबध्द कार्यक्रम आखून त्याची...
महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेशाती...
ज्या गोठ्यांमध्ये जनावरांची स्वच्छता राखली जात नाह...