অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलफेरभरणाने टॅंकरमुक्ती

दौलताबाद प्रयोगाची वैशिष्ट्ये -


* ग्रामपंचायतीच्या अनोख्या प्रयोगातून पाणी उपलब्ध 
* अवघ्या दोन ते अडीच हजारांत मिटला गावचा दुष्काळ 
* तीन वर्षांपासून मार्च महिन्यातच लागणारा टॅंकर यंदा बंद 
* विहीर पुनर्भरणासाठी वापरलं यादवकालीन कौशल्य 
दुष्काळातही विहिरीत मुबलक पाणी 

औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पाण्याचे स्रोत आटत आहेत. गावा-गावांमध्ये टॅंकर हाच एकमेव उपाय केला जात आहे. मात्र, औरंगाबाद तालुक्‍यातील दौलताबाद हे गाव याला अपवाद ठरलं आहे. दुष्काळ म्हणून रडत न बसता गावाने दुष्काळावर नामी उपाय शोधला. यादवकालीन तलावाचा स्रोत वापरून, जलफेरभरणाचा अनोखा प्रयोग राबवून दुष्काळावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे, शिवाय गाव टॅंकरमुक्त होण्यासही मदत झाली आहे. 
गणेश फुंदे 

औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर दौलताबाद हे सुमारे 15 हजार लोकवस्तीचं गाव आहे. देवगिरी किल्ल्यामुळे गावाला पर्यटनस्थळाचं महत्त्व आहे. साहजिकच गावात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. गाव परिसरात वीटभट्ट्यांचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सुमारे पाच हजार लोक बाहेरगावाहून आले आहेत. इतक्‍या मोठ्या संख्येच्या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी फक्त एक सार्वजनिक विहीर आहे.


जानेवारीतच आटलं पाणी


यंदा जानेवारीतच विहिरीचं पाणी आटू लागलं. दिवसभरातून तासभरच मोटर सुरू राहू लागली. विहिरीतील पाणी वाढावं यासाठी आठ ते दहा आडवे बोअर मारले; मात्र उपयोग झाला नाही. भूजलपातळी खालावल्याने पाणी लागलंच नाही. टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. सार्वजनिक विहिरीपासून काही अंतरावर प्राचीन मोमबत्ता तलाव आहे. त्यातील पाणी मोटरीने पाणी उपसा करून विहिरीत टाकता येईल असा विचार सुरू झाला; मात्र वीजभारनियमनामुळे मोटर किती तास चालेल याचा नेम नव्हता. तलावाजवळ विजेची व्यवस्था नसल्याने त्यासाठी वेगळा खर्च ग्रामपंचायतीला परवडणारा नव्हता. सर्व अडचणी लक्षात घेता इयत्ता पाचवीत शिकण्यात आलेला हवेच्या दाबावर आधारित एक प्रयोग करण्याची कल्पना ग्रामविकास अधिकारी पी. एस. पाटील यांनी मांडली. कमी खर्चिक आणि सहज शक्‍य अशी ही कल्पना सर्वांना आवडली. प्रयोगासाठी सरपंच संजय कांजुणे, उपसरपंच सय्यद हारून यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत चमू झटू लागला. काही दिवसांतच आश्‍वासक चित्र समोर येऊ लागलं.


असा केला प्रयोग...


मोमबत्ता तलाव उंचावर आहे. चारही बाजूंनी असलेल्या डोंगरांत पडलेलं पाणी तलावात वाहून येतं, त्यामुळे तो कधी आटत नाही. त्यात आजही दहा ते पंधरा फूट खोल पाणी आहे. हे पाणी सायफन पद्धतीचा वापर करून जवळच्या नाल्यात सोडावं, असा विचार झाला. दीडशे फूट पाइप नाल्यात सोडण्यात आला. हवेच्या दाबामुळे तलावातील पाणी ओढले जाऊ लागलं. हे पाणी नाल्याद्वारे सुमारे दोन हजार फूट अंतरावरील विहिरीजवळ आणण्यात आलं. सार्वजनिक विहिरीजवळ नाल्यावर भिंत बांधून पाणी अडविण्यात आलं. विहिरीलगत दीडशे फूट लांब आणि सुमारे 15 फूट खोल चर खोदला. त्यात पाणी साठत आहे. हे पाणी जमिनीत झिरपू लागल्याने विहिरीतही नैसर्गिकरीत्या जल स्रोत निर्माण झाले, शिवाय शुद्ध पाणी विहिरीत येऊ लागलं. अवघ्या दोन हजार रुपयांत गावाची ही पाणीपुरवठा योजना साकारली गेली हे विशेष.


गाव झालं टॅंकरमुक्त


दौलताबादला गेल्या तीन वर्षांपासून मार्चमध्येच टॅंकरचा आधार घ्यावा लागायचा. यंदा मात्र गाव टॅंकरमुक्त राहिलं. जानेवारीत आठ दिवसांनंतर गावात पाणी यायचं. आता एक दिवसाआड पुरेसं पाणी मिळत असल्याने ग्रामस्थांत समाधानाचं वातावरण आहे. दौलताबाद ग्रामपंचायतीने तहान लागली म्हणून केवळ विहीर खणली नाही, तर विहिरीत कायमस्वरूपी पाणी कसं राहील याचाही प्रामुख्याने विचार केला. एका साध्या तंत्राने टॅंकर, पैसा, वेळ या सर्वांचीच बचत झाली. आटलेल्या विहिरीलाही पाझर फुटला. अन्य गावांनीही केवळ सरकारी मदतीच्या आशेवर न राहता दौलताबादचा आदर्श घेतला तर बदल घडायला वेळ लागणार नाही. आवश्‍यकता आहे ती कल्पकता, जिद्द आणि एक होऊन काम करण्याची. 

गावात पाण्याचं मोठं संकट निर्माण झालं होतं. विहीर पुनर्भरणाचा विचार केला; पण विजेचा खर्च, भारनियमन अशा अडचणी होत्या, त्यामुळे यादवकालीन कौशल्य विहीर पुनर्भरणासाठी वापरलं. त्या काळी नहरीने याच तलावातलं पाणी विनामोटर देवगिरी किल्ल्यावर नेलं जायचं. त्याच तंत्राचा अवलंब करून हे पाणी विनामोटर नाल्यात सोडलं. आता विहिरीत मुबलक पाणी आहे. 
- संजय कांजुणे, सरपंच, दौलताबाद 

सार्वजनिक विहीर आटल्याने पंधरा हजार लोकसंख्येला पाणी कसं पुरवावं हा गंभीर प्रश्‍न होता. ग्रामसभेत काहींनी टॅंकरची मागणी केली. मात्र, एवढ्या मोठ्या गावाला तसा पाणीपुरवठा करणं शक्‍य नव्हतं. हवेच्या दाबाचा प्रयोग वापरून पाणी विहिरीपर्यंत आणलं. अवघ्या दोन ते अडीच हजारांत गावाचा दुष्काळ मिटला याचं समाधान आहे. 
- पी. एस. पाटील, ग्रामसेवक, दौलताबाद 

गेल्या काही वर्षांपासून गावाला दरवर्षी उन्हाळ्यात टॅंकरने पाणी पुरवलं जायचं. जानेवारीतच आठ ते दहा दिवसांआड नळाला पाणी यायचं. ग्रामपंचायतीच्या अभिनव प्रयोगाने मात्र गावाला दुष्काळमुक्त केलं. आता स्वच्छ आणि पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. 
- सुरेखा जाधव, ग्रामस्थ, दौलताबाद

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate