Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/15 10:14:54.477041 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / जलयुक्‍त शिवारने पीकपद्धती बदलली
शेअर करा

T3 2020/08/15 10:14:54.482044 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/15 10:14:54.508625 GMT+0530

जलयुक्‍त शिवारने पीकपद्धती बदलली

कृषी विभागाचा पुढाकार, खंदरमाळवाडी जलस्‍वयंपूर्ण.

कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी

अहमदनगर जिल्ह्यातील खंदरमाळवाडी (ता. संगमनेर) येथील शेतकरी, ग्रामस्‍थांनी जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून गावाला जलस्‍वयंपूर्ण केले आहे. गावशिवारातील विहिरींची पाणीपातळी वाढली. पीकपद्धती बदलून अर्थकारणाला गती मिळाली आणि गाव जलस्वयंपूर्ण झाले, हेच या कामाचे ठळक यश पुढे आले आहे. गावशिवारातील उजाड माळरानावर भाजीपाला शेती बहरली असून या माध्‍यमातून कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी मिळाली आहे. गावाने केलेल्‍या या कामामुळेच जिल्‍हापातळीवर गावचा जलमित्र पुरस्‍काराने गौरव करण्‍यात आला आहे.

नाशिक- पुणे महामार्गावर संगमनेर तालुका मुख्‍यालयापासून तीस किलोमीटर अंतरावर खंदरमाळवाडी नावाचे गाव वसले आहे. डोंगराच्‍या कुशीत वसलेले गाव अशी या गावची ओळख. शेतीवरच गावची अर्थव्‍यवस्‍था आधारलेली आहे. गावात शेतकरी शेतीपूरक व्‍यवसायही उभे राहिले आहेत.

कामाची सुरूवात

प्रथम खंदरमाळवाडी गावाचा भौगोलिक अभ्यास करण्‍यात आला. सरपंच वैशाली डोके, उपसरपंच प्रमोद लेंडे यांच्या नेतृत्वाखाली जलयुक्‍त शिवार अभियान राबवण्‍याचा शेतकरी, ग्रामस्‍थांनी संकल्‍प केला. लोकसहभाग वाढावा यासाठी सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्‍थ यांचा सहभाग घेत नियोजन करण्‍यात आले. लोकसहभाग वाढू लागला. गावात जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीपासून थेट नव्याने नाला खोलीकरणाची कामे सुरू झाली. गावात नवा जलसंवर्धन पॅटर्न त्यातून जन्माला आला, त्यातून गाव जलस्‍वयंपूर्ण झाले. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, तत्‍कालिन जिल्‍हाधिकारी अनिल कवडे, जिल्‍हाधिकारी अभय महाजन यांच्‍या मार्गदर्शनाने जिल्‍हा कृषी अधीक्षक पंडीत लोणारे, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, मंडळ कृषी अधिकारी दशरथ गडाख, कृषी पर्यवेक्षक किशोर आहेर, कृषी सहायक दिलीप वाकचौरे, ग्रामसेवक भारत देशमुख यांच्‍यासह ग्रामपंचायत सदस्‍यासह सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके यांचे प्रयत्‍न महत्‍वाचे ठरले.

अशी झाली कामे

खंदरमाळवाडी गावामध्ये नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व गरज असलेल्या ठिकाणी नव्याने बंधारा बांधण्याचे काम हाती घेतले. गावालगत असलेल्‍या तलावात गाळ साचला होता. झाडाझुडपांनी नाल्याला वेढले होते. त्याची साफसफाई करून खोलीकरण करण्यात आले. उत्तम साइट असलेल्या ठिकाणी नव्याने प्रकल्प पूर्ण करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सलग समतल चर, कम्पार्टमेंट बंडिग, माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, गाळ काढणे, गॅबीयन बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, नाला खोलीकरण, नाला दुरुस्ती, लुज बोल्डर या कामामुळे शिवारात हिरवाई आहे.

बाजरी, मठ हुलग्‍याचे गाव झाले कांद्याचे गाव

खंदरमाळवाडी गावात बाजरी, मठ, हुलगे ही खरिपाची पि‍के घेतली जात होती. गावशिवारात पाणी उपलब्‍ध झाल्‍यानंतर खरिपासोबतच रब्‍बी क्षेत्रात वाढ झाली. गावात फळशेतीसह, कांदा, भेंडी व इतर भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले. गावात 250 ते 300 हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड असून काही ठिकाणी कांदा काढणीही सुरू आहे. उजाड माळरानावरही ठिंबकवर कांदा लागवड करण्‍यात आली आहे. महामार्गालगत पडीक शिवारात यंदा भाऊसाहेब साळगट यांनी कांदा लागवड केली असून सद्यस्थितीत त्‍यांची कांदा काढणी सुरू आहे, कांद्याची गुणवत्‍ता चांगली असून माळरानावरचा कांदा पाहून साळगट यांच्‍या चेह-यावर समाधान आहे. प्रमोद लेंडे यांना आठ एकर शेती आहे, त्‍यातील चार एकर क्षेत्रात कांदा, एकरभर तूर, दोन एकर ज्‍वारी, 20 गुंठे भेंडी व उर्वरित क्षेत्रात गहू आणि हरभरा आहे. ठिंबकवर कांदा लागवड करून लेंडे यांनी पाणीनियोजनचा आदर्श ठेवला आहे. वर्षभरापुर्वी खरिपाची पिके घेणा-या गावाने रब्‍बी पिकांचे नियोजन यशस्‍वी तर केलेच शिवाय उन्‍हाळी हंगामाचे नियोजन करणार असल्‍याचे शेतकरी सांगतात.

पीकपद्धती बदलली

‘जलयुक्‍त शिवार’च्या यशस्वी कामांमुळे गावांमध्ये पीकपद्धतीत आमूलाग्र बदल घडला आहे. खरिपात बाजरी, मूग, तूर, मका, उडीद, हुलगा, भुईमुग एवढीच पिके घेणारी गावे भाजीपाला पिकाकडे वळली आहेत. संगमनेर व आळेफाटा बाजारपेठ जवळच असल्याने बाजारपेठेचीही अडचण दूर झाल्याचे शेतकरी सांगतात. खंदरमाळवाडी गावात साधारणपणे 450 मिलीमीटर पाऊस पडतो. खंदरमाळवाडी परिसरात जमीन हलक्या व खडकाळ प्रकारची आहे. 75 टक्के जमीन हलक्या तर 25 टक्के जमीन खडकाळ प्रकारची आहे. खंदरमाळवाडी परिसरात बाजरी, मूग, तूर, मका, उडीद, हुलगा, भुईमुग ही पिके खरीपात घेतली जातात. रब्बीमध्ये कांदा, गहू, हरभरा व डाळिंब व भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे.

खंदरमाळवाडी दृष्‍टीक्षेपात

लोकसंख्या- 3758 (2011 च्‍या जनगणनेनुसार)

गावातील एकुण शेतकरी खातेदार- 952

भौगोलिक क्षेत्र- 2505 हेक्टर

वहितीखालील क्षेत्र- 1258 हेक्टर

वनविभागाकडील क्षेत्र- 505 हेक्टर

ठळक कामे

सलग समतल चर- 20 हेक्टर

कंम्पार्टमेंट बंडींग- 750 हेक्टर क्षेत्रावर कंम्पार्टमेंट बंडिगचे काम झाले असून या कामांमुळे जमीनीची धुप व वाहून जाणारे पाणी थांबविण्यात यश आले आहे. व त्यामुळे मृद व जलसंधारण होऊन पाणीपातळी व पिकाच्या उत्‍पादनात वाढ झाली आहे.

माती नाला बांध- एक माती नाला बांधाचे काम पुर्ण झाले असून 4 टीसीएम क्षमतेचा माती नाला बांध बांधण्यात आला. त्यामुळे भुगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली असुन दुबार पिकांना हे काम अतिशय उपयुक्त ठरले आहे. या पाण्यावर कांदा व भाजीपाला उत्पादन भरघोस प्रमाणात वाढ झाली आहे. व चारा पिकात वाढ झाल्यामुळे दुग्धव्यवयाय वाढीस लागला आहे.

गाळ काढणे- गावशिवारातील तीन बंधा-यातील गाळ काढण्‍याचे काम पुर्ण झाले असुन 9 टीसीएम क्षमतेने पाणी साठा वाढला आहे.

पाझर तलाव दुरुस्ती- खंदरमाळवाडी येथे गावाजवळील ओढ्यावर जुना पाझर तलावाची पाणी गळती थांबविण्यासाठी दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे पाणी गळती थांबुन गावच्या पाणीपुरवठा विहीरीच्‍या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

सिमेंट नालाबांध- गावशिवारातील 6 सिमेंट नाला बांधाची कामांचा लाभ शेतीला झाला आहे.

जलयुक्‍तची फलश्रृती

-सलग समतल चर, कंम्पार्टमेंट बंडिग व माती नाला बांध झाल्यामुळे दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात कोरड्या पडणाऱ्या विहीरीमुळे मे महिन्यात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे विहीरींच्या पाण्यावर या वर्षी शेतकऱ्यांना भाजीपाला, कांदा तसेच चारा पिके व फळबाग करण्यास सुरुवात केल्यामुळे आर्थिक उत्पन्नात व दुग्ध उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे.

-माती नाला बांधाची कामे झाल्यामुळे खालील भागात विहीरींची पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी दुबार पिके घेऊ लागला आहे.

सलग समतल चर झालेल्या भागात या वर्षी जमीनीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन गवताची चांगल्या प्रकारे वाढ झाली आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतक-यांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध झाला आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत अडविलेल्या पाणी साठ्याचा ताळेबंद

कृषि विभाग- कंम्पार्टमेंट बंडिग- क्षेत्र 750 हेक्‍टर

अडविलेला नवीन पाणी साठा टीसीएम -337.50

सलग समतल चर- क्षेत्र 20 हेक्‍टर

अडविलेला नवीन पाणी साठा टीसीएम -9.00

माती नाला बांध- 1

अडविलेला नवीन पाणीसाठा टीसीएम -4.00

फुटतुट बंधारे दुरुस्ती माती नाला बांध- 2

अडविलेला नवीन पाणीसाठा टीसीएम -20.00

सिमेंट बंधारे- 6

अडविलेला नवीन पाणी साठा सीटीएम-56.23

बंधाऱ्यातील माती काढणे- 3

अडविलेला नवीन पाणी साठा टीसीएम -9.00

जिल्हा परिषद

पाझर तलाव दुरुस्ती- 2

अडविलेला नवीन पाणी साठा टीसीएम -20.00

पाझर तलाव नवीन- 1

अडविलेला नवीन पाणी साठा टीसीएम -10.00

वनीकरण-

सलग समतल चर- 1

अडविलेला नवीन पाणी साठा टीसीएम -30.00

लुज बोल्डर- क्षेत्र 100 हेक्‍टर

माती बंधारा- 1 अडविलेला नवीन पाणी साठा टीसीएम -4.00

लोकसहभागातून झालेली कामे

एका पाझर तलावातून गाळ काढण्‍यात आला असून दोन नाल्‍याचे खोलीकरण करण्‍यात आले. पाच हजार झाडांची लागवड करण्‍यात आली आहे. पाच वनराई बंधारेही लोकसहभागातून पूर्ण करण्‍यात आली आहेत.

ठळक प्रतिक्रिया

खंदरमाळवाडी गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, गाव टँकरमुक्‍त करण्‍याचा संकल्‍प करून जलयुक्‍त शिवार अभियानातून गावात 2015 मध्‍ये कामाला सुरूवात केली. गावशिवारात कामे झाली आणि विहिरींच्‍या पाणीपातळीत वाढ झाली. गाव जलस्‍वंयपूर्ण झाल्‍याचे मोठे समाधान आहे. सोबतच प्रधानमंत्री उज्‍वला योजने अंतर्गत गावातील 150 महिलांना गॅसवाटप करण्‍यात आले, गाव हागणदारीमुक्‍त झाले असून गावातील सर्वांचे सहकार्य व सहभागामुळे शक्‍य झाले.

वैशाली डोके, सरपंच, खंदरमाळवाडी

गावातील शेतकरी पुर्वी बाजरी, मठ, हुलगे ही पिके घेत होती. जलयुक्‍तच्‍या कामानंतर पाणीपातळी वाढली आणि पीकपदधती बदलली. आज गावात कांदा, डाळींब, भेंडी व तूरीचे पिके घेत आहेत.

प्रमोद लेंडे, उपसरपंच,खंदरमाळवाडी

शेतकरी, ग्रामस्‍थांचा लोकसहभाग व कृषी विभागाच्‍या सहकार्याने अनेक वर्षापासून गाळ साचलेला तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्‍यात आले, त्‍यामुळे गावशिवारात पाणीपातळी वाढण्‍यास मदत झाली आहे.

अॅड दिलीप साळगट, शेतकरी, ग्रामस्‍थ

माझी 10 एकर शेती आहे. मुरमाड, खडकाळ शेती असून पडीक होती. शेतीलगत तलावात पाणी उपलब्‍ध असल्‍याने डाळींब, कांदा व ऊस लागवड केली आहे. माझं उजाड माळरान जलयुक्‍तच्‍या कामांमुळे सुजलाम- सुफलाम झाले, याचा आनंद मोठा आहे.

भाऊसाहेब साळगट, शेतकरी

शेतीलगत झालेल्‍या बंधा-यामुळे पिकाला चांगला फायदा झाला आहे. यावर्षी आणखी दोन महिने पाणी पुरेल, असे वाटते, त्‍यामुळे रब्‍बी पिकांला चांगला फायदा होईल.

लक्ष्‍मीबाई बाबासाहेब लेंडे, महिला शेतकरी

पुर्वी आम्‍ही फक्‍त मठ अन हुलगे घेत होतो. शेततळं झालं आणि गहू, हरभरा कांदे घेणं सुरू केलं.

अनिता राजेंद्र लेंडे, महिला शेतकरी

खंदरमाळवाडी गावात 2015 मध्‍ये जलयुक्‍त शिवार अंतर्गत जलसंवर्धनाची कामाला सुरवात झाली. गावातील शेतकरी सुरूवातील फक्‍त खरिपाचा हंगाम घेत होते, जलयुक्‍तच्‍या कामानंतर रब्‍बी क्षेत्रात वाढ झाली आहे. एकूणच या कामांमुळे नव्‍याने 500 टीसीएम एवढा पाणीसाठा अडविण्‍यात आला असून यामुळे गरावशिवारातील विहिरींच्‍या पाणीपातळीत वाढ झाली आहे, त्‍यामुळे पीकपदधतीत बदलली आहे.

दिलीप वाकचौरे, कृषी सहायक

-गणेश फुंदे

माहिती स्रोत: महान्युज

2.89473684211
तारकाचिह्नांवर जा आणि मूल्यांकन देण्यासाठी क्लिक करा
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/15 10:14:54.900757 GMT+0530

T24 2020/08/15 10:14:54.907662 GMT+0530
Back to top

T12020/08/15 10:14:54.336588 GMT+0530

T612020/08/15 10:14:54.356258 GMT+0530

T622020/08/15 10:14:54.465625 GMT+0530

T632020/08/15 10:14:54.466584 GMT+0530