অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलयुक्त शिवार अभियान उस्मानाबाद

जलयुक्त शिवार अभियान उस्मानाबाद

दुष्काळ व टंचाई निवारणार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्वकांक्षी योजना जलयुक्त शिवार अभियानामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जलसाठ्याबरोबरच भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. या कामामुळे विहिरीच्या पाणीसाठयात 3 ते 3.50 मीटरने सरासरी वाढ झाली आहे.

शासनाने दुष्काळ व टंचाई निवारणार्थ जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानाची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडवून ते पाणी जमिनीत जिरव‌िणे आणि भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शासनाच्या तीन वर्षेपुर्ती निमित्त जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात आलेल्या कामाचा थोडक्यात घेतलेला आढावा...

या अभियानातून सन 2015-16 या वर्षी जिल्ह्यातील 217 गावांची निवड करण्यात आली. या गावात अभियानाच्या माध्यमातून जल संधारणाची कामे करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिल्याच वर्षी या अभियानाअंतर्गत 21025 कामे हाती घेण्यात आली. सन 2015-16 मध्ये करण्यात आलेल्या कामावर 86.54 कोटी रुपये खर्च करुन यामध्ये हाती घेण्यात आलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली. यात मोठयाप्रमाणात लोकसहभागातून देखील कामे करण्यात आली आहेत

सन 2016-17 या वर्षात राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियानासाठी राज्यातून 5 हजार 281 गावांची निवड केली. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील 191 गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये 16 हजार 795 कामे प्रस्तावित करण्यात आली. निवडलेल्या सर्व गावात कामे सुरु करण्यात आली असून यातील 9 हजार 800 कामे पूर्ण झाली आहेत तर प्रगतीपथावर 4 हजार 73 कामे आहेत. प्रगतीपथावरील व पूर्ण कामांची संख्या 13 हजार 873 इतकी आहे. या अभियानांतर्गत दि. 7 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2017 या कालावधीत शासकीय यंत्रणा व लोकसहभागातून 14.73 लाख घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. सन 2016-17 या वर्षातील कामावर आतापर्यंत 74.56 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली कामे 2 हजार 922 आहेत. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत निवडलेल्या गावातील प्रकल्प आराखडयानुसार 26 गावातील कामे शंभर टक्केपूर्ण झाली आहेत तर 71 गावातील कामे ऐंशी टक्केपूर्ण झाली असून 94 गावातील कामे 50 टक्केपर्यंतपूर्ण झाली आहेत. याकामामुळे 9544.57 हेक्टर संरक्षित सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे. सद्यस्थितीत या कामामुळे 6565.30 टीसीएम पाणी साठा झाला आहे.

सन 2017-18 मध्ये या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 178 गावांची निवड करण्यात आली असून यात 10 हजार 579 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या कामाच्या प्रकल्प आराखडयास 2 ऑक्टोबर 2017 रोजीच्या ग्रामसभेच्या मान्यतेनंतर तालुका व जिल्हास्तरीय समितीची मान्यता, सक्षम अधिकाऱ्याची प्रशासकीय मान्यता व त्यानंतर निविदा प्रक्रिया करणे व कार्यारंभ आदेश देवून कामे सुरु करण्यात येणार आहेत.

जलयुक्त शिवारामधील जलसंवर्धनाच्या कामात कंपार्टमेंट बंडिंग, मातीनाला बांध, नाला सरळीकरण व खोलीकरण, सिमेंट नाला, नदी नाले पाझर तलाव व ओढ्यामधील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, बोअर पुनर्भरण, शेततळी आदी कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये यंदाच्या वर्षी सप्टेंबरअखेर चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. याचा परिणाम भूगर्भातील पाणीपातळीत वाढ होण्यात झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कोरडेठाक असणारे बोअर, विहिरी जलयुक्तच्या कामामुळे पाण्याने भरल्या आहेत. बोअरला मुबलक पाणी येऊ लागले आहे. जलयुक्त शिवाराच्या कामामुळे भूगर्भातील पाणीपातळी तर वाढली; पण त्याचबरोबर नदी, नाले, नवीन सिमेंट बंधारे यामध्येही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने जिल्ह्यातील पाणी साठ्यातही भरीव वाढ झाली आहे.

मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी 3 हजार 700 शेततळयाचे उदिष्ट देण्यात आले होते त्यापैकी 2 हजार 224 शेततळे पूर्ण झाली असून चालू असलेली शेततळेचे कामांची संख्या 462 आहे, यामध्ये अनुदान अदायगी केलेल्या शेततळयांची संख्या 1 हजार 472 इतकी आहे, यासाठी 596.15 लक्ष रुपये निधी वितरीत करण्यात आला आहे.

मागेल त्याला शेततळे ऑनलाईन योजनेद्वारे 6 हजार 496 अर्ज प्राप्त झाले असून 1 हजार 96 कामांना कार्यरंभ आदेश देण्यात आले आसून त्यापैकी 447 शेततळयाची कामे पूर्ण झाली आहेत.

लेखक: मनोज शिवाजी सानप

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate