অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलयुक्त शिवारने जाखले झाले हिरवेगार

जलयुक्त शिवारने जाखले झाले हिरवेगार

लोकसहभाग आणि जलयुक्त शिवार अभियानातून गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब-न-थेंब जलसंधारण प्रणालीद्वारे अडवून तो भूगर्भात मुरविल्याने जाखले गावात आज सुमारे 600 टीसीएम पाणीसाठा झाला आहे. या पाण्यामुळे जाखलेच्या शिवारात हिरवीगार पिके डौलू लागली आहेत.

पन्हाळा तालुक्यात जोतिबा डोंगराच्या पायथ्याला 1024 हेक्टर क्षेत्रफळाचे जाखले हे गाव ! डोंगराच्या उताराला असणारे हे गाव तसे पाहिले तर परंपरागत दुष्काळग्रस्तच. 1972 च्या दुष्काळामध्ये या गावात 340 मीटरचा कुरण पाझर तलाव आणि 440 मीटरचा माने पाझर तलाव हे दोन तलाव घेण्यात आले. नंतरच्या काळात वेळी अवेळी आणि अत्यल्प पडणाऱ्या पावसामुळे तलाव कोरडे पडू लागले, त्यामुळे या तलावांकडे कोणाचेही लक्ष गेले नाही, अन बघता-बघता हे तलाव पूर्णत: गाळाने भरुन गेले.. अन जाखले गावावर दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या.

जाखले गावास शेतीच्या पाणी टंचाईबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई भासू लागली. सहनशील आणि कष्टाळू गावकऱ्यांच्या प्रयत्नांना भीषण पाणी टंचाईमुळे यश येईना. दरवर्षी जानेवारीपासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली. दरवर्षी असेच चालत आल्याने टंचाई ही गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली अशी परिस्थिती निर्माण झाली. यावर कायमस्वरुपी उपाय काढण्यासाठी गावातील तरुण पुढे सरसावले, अन् जुलै 2015 मध्ये सागर माने यांनी गावातील तरुणांना संघटीत करुन त्यांच्या सक्रीय सहभागाद्वारे गावात जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली. तरुणाच्या या संकल्पपूर्तीसाठी शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाची साथ मिळाली, अन् पिण्याच्या पाण्याची वानवा असलेल्या जाखले गावात गेल्या अडीच तीन वर्षात जलयुक्त शिवार अभियानातून अक्षरश: गंगाच अवतरलीय.

गावातील तरुणांनी गावाच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन जलयुक्त शिवार अभियानाची कशा प्रकारे अंमलबजावणी करायची याची माहिती घेतली. कृषी विभागाच्या मदतीने गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवणूक करण्याच्यादृष्टीने प्रारुप आराखडा तयार केला. यामध्ये गावात 1972 च्या दुष्काळात घेण्यात आलेल्या पाझर तलावाचे पुनरूज्जीवन करणे, गावातील दोन मोठ्या ओढ्यांवर जागोजागी साखळी सिमेंट बंधारे घेणे, डोंगर उतारावरील ओघळ जोडणी प्रकल्प, सीसीटी, वनतळी घेण्याचे प्राथमिकदृष्ट्या निश्चित केले. आणि मग दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाच्या साथीने जलसंधारणाच्या प्रणाली राबविण्यासाठी ग्रामसभेचीही मंजूरी घेऊन पाण्याच्या मागे धावणाऱ्या या तरुणांनी मागे वळून पाहिलेच नाही. ध्यास केवळ जलयुक्त शिवार आणि जलयुक्त शिवारचाच !

गावात 1972 च्या दुष्काळात घेण्यात आलेल्या कुरण व माने या दोन पाझर तलावांच्या दुरुस्तीसह गाळ काढण्यास प्रारंभ केला. यासाठी शासन योजनांचे सहकार्य घेण्यात आले. याबरोबरच गावातील दोन मोठ्या ओढ्यांवर 1952 साली घेण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीचा बंधाराही तकलादू झाला होता. गावातील थोरला ओढा गाळाने भरुन गेल्याने तो लुप्त अवस्थेतच होता. हेच ते माळवाडी धरण केटी बंधाऱ्यातील गाळ काढून तो मोकळा करण्यात सर्वच गावकऱ्यांनी पुढाकार घेतला. ओढ्याचे खोलीकरण आणि रूंदीकरण मोहीम तीन किलोमीटर अंतरात राबविल्याने लुप्त पावलेले ओढे खऱ्या अर्थाने जीवंत झाले, मोठा पाणीसाठी होऊ शकला.

गावातील पाझर तलाव, ओढ्याचे खोलीकरण आणि रुंदीकरणाचे महत्वाकांक्षी प्रकल्प शासन योजना आणि लोकसहभागातून राबविण्यात आले. जवळपास 11 हजार ट्रॉली गाळ लोकसहभागातून काढून शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. त्यामुळे ओढ्यामध्ये चांगला पाणीसाठी निर्माण होण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगल्या दर्जाची माती मिळाली. त्यामुळे पिकेही चांगली येऊ लागली. असा दुहेरी लाभ जलयुक्त शिवार अभियानाद्वारे शेतकऱ्यांना मिळाला.

जलयुक्त शिवार अभियानातून सुमारे साडेचार कोटींची कामे शासन योजना आणि लोकसहभागातून झाल्याने जवळपास 600 टीसीएम इतका पाणीसाठा जाखलेच्या शिवारात होऊ शकला. यामध्ये पाझर तलावांची दुरुस्ती, ओढ्याचे खोलीकरण, रुंदीकरण आणि 16 सिमेंट नालाबांध, 2 वनतळी, 100 ल्यूज बोल्डर तसेच 24 हेक्टरवर सीसीटी अशा जलसंधारणाच्या प्रणालींची प्रभावी अंमलबजावणी करुन दुष्काळी गावाचे सधन बागायती गावात रूपांतर करण्याच्या गावकऱ्यांच्या विशेषत: गावातील तरुणांच्या प्रयत्नांना जलयुक्त शिवार अभियानाची फार मोठी साथ मिळाली असल्याचे नुतन सरपंच सागर माने यांनी स्पष्ट केले. जलयुक्त शिवार अभियान आणि लोकसहभागातून गावातील ओढ्यातील जवळपास 11 हजार ट्रॉली गाळ काढण्यात आला. त्यामुळे ओढ्यामध्ये आता चांगला पाणीसाठी झाला आहे. या पाण्यावर उसाबरोबरच अन्य पिके घेण्यात शेतकरी मग्न आहे.

गावानजीकचा साडेचार किलोमिटर्स अंतराचा डोंगरउतार असून या डोंगरावर असंख्य ओघळी आहेत. अशा या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन या डोंगरपट्यात ओघळ जोड कार्यक्रम हाती घेण्याचा गावकऱ्यांचा निर्धार आहे. यामध्ये 100 ते 150 ओघळ एकमेकांना जोडून डोंगरपरिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब-न-थेंब तिथेच अडविण्याचा व मुरविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्याचा निश्चय गावातील तरुणांचा केला आहे. नजिकच्या काळात ओघळजोड प्रयोग यशस्वी करुन गावातील पाणी टंचाई कायमची संपविण्याचा गावकऱ्यांचा निर्धार आहे.

- एस.आर.माने

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate