অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हिरवे गाव - वृक्ष लागवड

हिरवे गाव - वृक्ष लागवड

सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्‍यातील हिवरे गावाने सुमारे 33 एकर गायरान जमिनीचा पुरेपूर वापर करीत त्यात सीताफळाची लागवड करून गावाच्या उत्पन्नात भर टाकण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. लोकसहभागातून सुमारे 33 एकर क्षेत्रात वृक्ष लागवड करताना जलसंधारणाची कामे करून पाणीटंचाईवर उत्तर शोधले आहे. प्रगतीकडे गावाची आश्‍वासक वाटचाल सुरू झाली आहे.

हिवरे हे कोरेगाव तालुक्‍यातील सुमारे 1700 लोकसंख्येचे गाव. तालुक्‍यात सर्वाधिक दुष्काळाच्या झळा या भागाला बसतात. पाण्याची टंचाई भासत असल्याने ज्वारी, बाजरी आदी पिके घेतली जातात. पाणलोट कामे व धरणाचे पाणी यामुळे ऊसही काही प्रमाणात होतो. हिवरे गावाच्या मालकीच्या डोंगरालगत 33 एकर क्षेत्र गायरान आहे. हे गायरान वर्षानुवर्षे पडून होते. यामध्ये जनावरे चारली जात होती. या जमिनीचा फायदा गावच्या उत्पन्नवाढीसाठी करता येईल, या दृष्टीने फळबाग लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले.

गायरानात फुलतेय सीताफळ

अनेक गावांत मोठ्या प्रमाणात गायरान जमीन असते, पण तिचा उपयोग म्हणावा तसा होत नाही. यातून अतिक्रमणे होतात. हिवरे गावाने मात्र त्यात फळबाग लागवडीचा आदर्श निर्माण केला आहे. गायरानासाठीचे 33 एकर क्षेत्र पडून असल्याने अनेक रस्ते तयार झाले होते. सुरवातीस क्षेत्राच्या बाजूंनी रस्ते काढून दिले. त्यानंतर सर्व क्षेत्रात बांधबंदिस्ती करण्यात आली. कमी पाण्यावर येणारे पीक म्हणून सीताफळाची निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पर्यावरण निधीतून सुमारे साडेपाच हजार खड्डे काढून त्यात रोपे लावण्यात आली. तालुका कृषी अधिकारी एस. बी. साळुंखे यांनी कृषी विभागांतर्गत शतकोटी योजनेतून रोपे उपलब्ध करून दिली.

विहीर, मोटर आणि ठिबकही

फळबागेसाठी लोकसहभागातून विहीर खोदण्यात आली. एकात्मिक पाणलोट कार्यक्रमातून मोटर, पाइपलाइनची कामे झाली. मोटरघर लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या निधीतून उभारले. सुरवातीला टॅंकरद्वारा पाणी देऊन बाग जगवण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर व्हावा यासाठी ग्रामपंचायतीच्या 13 व्या वित्त आयोगातून बागेस ठिबक सिंचन सुविधा बसवण्यात आली. एकात्मिक पाणलोट कार्यक्रमातील प्रवेश प्रेरक उपक्रमातून विहिरीवर विद्युत पंप बसवण्यात आला. सध्या सुमारे 97 टक्के रोपांची अवस्था समाधानकारक आहे. या बागेतील सीताफळांपासून पुढे पल्पनिर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. बागेची नियमित देखरेख करण्याची जबाबदारी मोहन खताळ यांनी उचलली आहे.

पाणलोटाची कामे वेगात

पाणलोटातून गावच्या पाणीटंचाईवर मात करता येईल, या दृष्टीने 2010 मध्ये पाणलोट समितीची स्थापना करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून कृषी पदवीधर अजित खताळ यांची निवड करण्यात आली. समितीच्या माध्यमातून अजित खताळ, सुधीर खताळ, समाधान शिंदे, मोहन खताळ, संदेश कुलकर्णी, आनंदराव खताळ, रामदास खताळ, सुनील खताळ, तानाजी बिडे यांनी कामाचे नियोजन केले. कामाच्या सुरवातीस अडचणी येत होत्या. मात्र ग्रामस्थांना कामाचे महत्त्व समजू लागल्यावर त्यांचा सहभाग वाढू लागला. यामुळे अनेक कामे लोकसहभागातून होण्यास मदत झाली आहे. गावास तीन बाजूंनी डोंगर आहे. या निसर्गसंपदेचा वापर करत माथा ते पायथा पाणलोटाची कामे सुरू झाली आहेत.

खोल सलग समतल चर व बंधारे

जांभ खुर्द ते कवडेवाडी व मधवापूर ते कवडेवाडी यांच्यादरम्यान दोन ठिकाणी खोल सलग समतल चर अर्थात डीप सीसीटीचे सुमारे 55 हेक्‍टर क्षेत्रावर काम यंदाच्या उन्हाळ्यात झाले आहे. लोकसहभागातून ओढ्यावर सुमारे 20 माती बंधारे बांधण्यात आले आहेत. दोन सिमेंट नाल्यांपैकी एक कृषी विभागाच्या माध्यमातून, तर उर्वरित लोकसहभागातून बांधण्यात आले आहेत. सुमारे 700 हेक्‍टर क्षेत्रावर पाऊस मुरावा यासाठी बांधबंदिस्ती केली आहे. प्रत्येक वर्षी कामाच्या जागा निश्‍चित करून तेथे टप्प्याटप्प्याने कामे करण्यात आली आहेत. सध्या अजित खताळ हिवरेचे सरपंच आहेत. पाणलोट समितीच्या माध्यमातून ते सुमारे पाच वर्षांपूर्वीपासून कार्यरत आहेत.

आवळा, चिंच लागवड

गावातील वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून वन विभागाच्या मालकीच्या 33 हेक्‍टर क्षेत्रावर आवळा, कडुलिंब, चिंच, काशीद आदी प्रकारच्या सुमारे 33 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे.

तरुणांचा सहभाग

हिवरे गावच्या विकासासाठी तरुण वर्ग व अन्य ग्रामस्थांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. पाणलोटाच्या कामांसह गावातील गणपती मंदिराची शेड लोकसहभागातून बांधण्यात आली आहे. गाव परिसरात व शेजारील गावांत डोंगर परिसरात कुठेही वणवा लागल्यास तो विझवण्याच्या कामात तरुणांची नेहमीच आघाडी असते. तरुणांचा उत्साह पाहून वन विभागाने स्वखर्चाने गावात सिमेंट बंधारा बांधून दिला आहे. गावच्या सीताफळ लागवड व पाणलोटाच्या कामांना सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, मुख्य वनसंरक्षक एम. के. राव, उप-वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, डी. टी. खाडे, एस. पी. चव्हाण यांचे मार्गदर्शन, तसेच मदत लाभली आहे. गावात पाणीटंचाईची समस्या कायम असल्याने नलिनी चव्हाण यांनी गावास टॅंकर भेट दिला आहे.

ऍग्रोवन सरपंच महापरिषदेची प्रेरणा

यंदाच्या जळगाव येथे झालेल्या ऍग्रोवन सरपंच महापरिषदेत हिवरेचे सरपंच अजित खताळ यांची निवड झाली होती. तेथे झालेल्या मार्गदर्शनातून डीप सीसीटी व ठिबक सिंचनाच्या कामांसाठी प्रेरणा मिळाली व त्याप्रमाणे कामे सुरू झाल्याचे खताळ म्हणाले. येत्या काळात नगर जिल्ह्यातील हिवरेबाजार गावाप्रमाणे पीक पद्धतीचे नियोजन करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अजित खताळ - 8600110113. सरपंच

स्त्रोत: अग्रोवन© 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate