অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलस्वयूंपर्णतेकडे भोयरे पठार

जलस्वयूंपर्णतेकडे भोयरे पठार गावाची आश्‍वासक वाटचाल

आदर्श गाव योजना समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार गावाची (जि. नगर) प्रेरणा परिसरातील गावांना मिळाली नाही तरच नवल म्हणायचे. पारनेर तालुक्‍यातील निवडुंगेवाडी गावाने तर यंदाच्या दुष्काळातही अनेक वर्षांनी टॅंकरमुक्ती मिळवली. तेही डीप सीसीटी म्हणजे खोल सलग समतल चर व कंपार्टमेंट बंडिंग (शेताचे बांध) यांच्या कामांतून. हिवरेबाजारच्या अगदी शेजारी असलेल्या भोयरे पठार गावानेही त्याच दिशेने आपली पावले टाकायला सुरवात केली आहे. येत्या काळात पिण्याचे आणि शेतीचे पाणी याबाबत आम्ही स्वयंपूर्ण होऊ, असा इथल्या गावकऱ्यांना ठाम विश्‍वास आहे.

पाणलोटाची कामेही गावात प्रगतिपथावर आहेत.
हिवरेबाजार येथे यशवंत कृषिग्राम व पाणलोट विकास संस्था कार्यरत आहे. पोपटराव पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आदर्श गाव योजनेअंतर्गत भोयरे पठार येथे शिवाजी पांडुरंग ठाणगे तांत्रिक स्तरावर कार्यरत आहेत. या गावात गेल्या दोन वर्षांपासून आदर्श गाव योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. 

हिवरेबाजार गावाची वेस ओलांडली की वनविभागाचे राखीव क्षेत्र सुरू होते. आणि त्यामधून जाणारा घाटाचा रस्ता आपल्याला भोयरे पठार गावात घेऊन जातो. माथा ते पायथा या संकल्पनेनुसार डीप सीसीटी, लूज बोर्डर, कंपार्टमेंट बंडिंग आदी विविध कामे गावात सुरू असलेली सध्या पाहण्यास मिळतात. याबाबत बोलताना ठाणगे म्हणाले, की डीप सीसीटीचे काम गावात सुमारे 110 हेक्‍टर क्षेत्रावर पूर्ण झाले आहे. तसेच कंपार्टमेंट बंडिंगचे काम 250 हेक्‍टर क्षेत्रावर झाले असून, अद्याप 296 हेक्‍टर क्षेत्रावर हे काम बाकी आहे. यंदाच्या वर्षी पिण्याचे पाणी मिळण्याइतकी परिस्थिती चांगली आहे. मात्र पाणीपुरवठा योजना ज्या पाणलोट क्षेत्रात आहे त्याचे काम या वर्षी हाती घेतले असून ते अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न पूर्ण सुटला आहे असे म्हणता येणार नाही. या वर्षी त्याचे दृश्‍य परिणाम समोर येतील. 

मार्च- एप्रिलच्या याच काळात मागील वर्षी पिण्याचे पाणी पुरेसे उपलब्ध नव्हते. पाण्याअभावी जनावरांचेही हाल सुरू होते. गावात सरासरी पाऊस 300 ते 350 मि.मी.पर्यंत पडतो. गेल्या वर्षी मात्र तो अत्यंत कमी म्हणजे 189 मि.मी.पर्यंतच झाला. मात्र सद्य:स्थितीत झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे यंदा मात्र परिस्थिती चांगली राहिली आहे. शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन चांगल्या प्रकारे करता आले. शेवंती, वांगी, टोमॅटो, गहू, हरभरा आदी पिके घेणे शक्‍य झाले आहे. पाणलोट क्षेत्रातील सुमारे 27 विहिरींची पाणीपातळी दोन फुटांपासून ते 12 फुटांपर्यंत वाढली. भूजलाची पातळी वाढली ही महत्त्वाची गोष्ट. अर्थात इथून पुढच्या पाणलोट कामांमुळे गाव दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने आम्ही कसोशीने प्रयत्न करू लागलो असल्याचे भोयरे पठारच्या गावकऱ्यांनी सांगितले. 

पूर्वीचे दिवस अत्यंत प्रतिकूल होते. गेल्या वर्षी या काळात पाणीच नव्हते. आता पाणलोटाची कामे होत आहेत. पाण्याची परिस्थिती सुधारते आहे. 
बाळू टकले, शेतकरी 

मी गुजरात राज्यात शीपयार्डमध्ये नोकरी करतो. माझी पत्नी इथली शेती सांभाळते. पाण्याचे स्रोत गावात वाढू लागले आहेत ही चांगली गोष्ट आहे. गेल्या पाच वर्षांत आम्ही चार एकर माळरान खरेदी केले आहे. विहीर घेतली आहे. विहिरीत आताच्या काळात 50 फूट पाणी होते. या पाण्यावरच 15 गुंठ्यांत शेवंती घेतली असून, त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. आता विहिरीत 30 ते 35 फूट पाणी असून दोन महिने पाणी पुरेल. 
भाऊसाहेब उमप- 

आमच्या गावात मूग, सूर्यफूल, कांदा, बाजरी, कडधान्ये, ज्वारी, हरभरा, गहू, आदी पिके घेतली जातात. उन्हाळ्यात पाणी असेल तर वांगी, शेवंती, भाजीपाला, कोथिंबीर आदी पिके घेतली जातात. पाणी जसजसे जिरेल तसतसे अधिक उपलब्ध होईल. विहिरीला थोडे तरी पाणी आहे. लसूण तसेच कांदा बीजोत्पादन घेतो. पिण्याचे पाणी चांगल्या प्रमाणात आहे. थोडा लसूणघास आहे. 
जयवंत गाडे


केवळ हिवरेबाजारला भेट नको! भोवतालची चारही गावे मॉडेल होताहेत


आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले, की पाणलाटोतील आदर्श गावाला भेट द्यायची म्हटले की हिवरेबाजारचे नाव घेतले जाते. मात्र आमच्या गावाच्या परिसरातील चार गावे झपाट्याने विकसित होत आहेत. येत्या काळात आम्ही हीच गावे भेट देण्याच्या दृष्टीने मॉडेल करणार आहोत. भोयरे पठार, पिंपळगाव कवडा, निवडुंगवाडी व दहीठणे गुंजाळ अशी ही गावे आहेत. हिवरेबाजारच्या कडेची सहा गावे निर्मल ग्राम, तर चार गावे पाणलोट ग्राम झाली आहेत. पिंपळगाव कवडा गावचा समावेश आदर्श गाव योजनेत झाला आहे. 

भोयरे पठार गावाने ज्या वेळी विकासाची तयारी दर्शवली तेव्हा त्यांच्यापुढे दोनच अटी आम्ही ठेवल्या त्या म्हणजे लोकसहभागातून श्रमदान व आदर्श गावांची सप्तसूत्री पाळणे. त्यादृष्टीने आता गावात तसा विकास होऊ लागला आहे. गावात पाणलोटाचे क्षेत्र सुमारे 1300 हेक्‍टर आहे. दहीठणे गुंजाळ येथील सरपंच तर युवा असून, त्याच्या पुढाकाराने गावाने प्रगतीकडे वाटचाल सुरू केली आहे. शेजारच्या गावचा आदर्श घेऊन अनेक गावे आता आपल्या विकासाला लागली आहेत. टाकळी ढोकेश्‍वर गावांतर्गत निवडुंगवाडी येते. मात्र वाडीने आपली प्रगती केली. सुमारे 14 वर्षांनंतर टॅंकरमुक्ती मिळवली. त्याची प्रेरणा घेऊन टाकळी ढोकेश्‍वर गावानेही ग्रामसभा घेतली. सुमारे 12 हजार लोकसंख्येचे हे गाव येत्या काळात आदर्श मॉडेल म्हणून लोकांसमोर येईल असा विश्‍वास आहे. मृद्‌संधारण हा पाणलोटातील सर्वांत महत्त्वाचा भाग. त्यातूनच पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब भूगर्भात जिरेल आणि विहिरींची पाण्याची पातळी वाढेल.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate