অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दोडकी-वाळकीची वाटचाल

शेतकऱ्यांनी उभारले बंधारे, शोषखड्डे

कधी काळी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील वाळकी-दोडकी या एकमेकांना जवळपास लागून असलेल्या गावांनी पाण्याची श्रीमंती जपणाऱ्या गावांच्या यादीत समावेश होण्यासाठी धडपड चालविली आहे. त्याकरिता सामूहिक प्रयत्नातून गावात जल व मृद संधारणाच्या कामांना गती आली असून, शासकीय व अशासकीय संस्थांचेही या कार्यात योगदान ग्रामस्थांना मिळत आहे.
टॅंकरयुक्‍त ते टॅंक्‍टरमुक्‍त गावाकडे वाटचाल
वाशिम जिल्ह्यात वाळकी ग्रामपंचायत अंतर्गत वाळकी, दोडकी व गिव्हा या तीन गावांचा समावेश होतो. पाण्याचा निव्वळ उपसा होणाऱ्या या गावांनी जलपुनर्भरणाकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नव्हते. त्याचे परिणाम आजची पिढी जलसंकटाच्या माध्यमातून भोगत आहे. ग्रामपंचायती अंतर्गत 1900 लोकसंख्येचा अंतर्भाव होतो. पाण्याचे मर्यादित स्रोत उन्हाळ्यात कोरडे पडत असल्याने या तीनही गावांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची मदत घ्यावी लागते. दोडकी गावात महिनाभर टॅंकर सुरू राहतो तर वाळकी गावात विहीर अधिग्रहण केली जाते. गावलगतच्या नदी, नाल्याचे रुंदीकरणाची चळवळ राबवीत या गावाने आज टॅंकरमुक्‍तीकडे वाटचाल केली आहे.

लोकसहभागातून साधले उद्दिष्ट

वाळकी- दोडकी या गावांमध्ये फारसे अंतर नाही. गावांतील यापूर्वीची परिस्थिती सांगायची तर गावालगतच्या नाल्याची सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीगत अवस्था झाली होती. शेतातील माती नाल्यात साचल्याने त्याचे आकारमान कमी झाले होते, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत पावसाचे अतिरिक्‍त पाणी थेट लगतच्या शेतात येत पिकाचे नुकसान होत होते. या समस्येचे निदान नाला खोलीकरणाच्या माध्यमातून शोधण्यात आले. सुमारे 65 हजार रुपयांचा निधी लोकवर्गणीच्या माध्यमातून उभा करण्यात आला. नाल्यातील गाळ स्वयंस्फूर्तीने शेतकऱ्यांनी नेत आपल्या शेतात वापरत त्याची सुपीकता वाढविण्याकडे लक्ष दिले. नवाजबाई रतनटाटा ट्रस्टकडून 80 टक्‍के खर्चाचा भार उचलण्यात आला. पैसे स्वरूपात मदत न करता शेतकऱ्यांना अपेक्षित खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करून देण्यात आले. 250 मीटर लांब, 15 मीटर रुंद व साडेतीन मीटर खोलीचे काम यातून झाले. परिसरातील विहिरी व इतर जलस्रोताच्या जलसाठा वाढीस यामुळे हातभार लागणार आहे.

गावनदीचेही रुंदीकरण

गिव्हा ते वाळकी जहॉंगीर या दरम्यान वाहणाऱ्या नदीचे पात्रही संकुचित झाले होते. या नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण लोकसहभागातून करण्यात आले. या कामात कृषी समृद्धी समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाची मदत झाली. 50 टक्‍के लोकवर्गणी व 50 टक्‍के प्रकल्पातून निधीची तरतूद करण्यात आली. 25 मीटर रुंद, 120 मीटर लांब, दोन मीटर खोल अशा प्रकारचे काम यातून झाले. गाळ उपसणे व शेतापर्यंत वाहतूक यासाठी शेतकरी सहभागातून 45 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला.

शोषखड्ड्यातून चालना

पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या वाळकी-दोडकी गावांत जलसंधारण विषयक जाणीव जागृतीचे प्रयत्न होत आहेत. येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष नानवटे तसेच स्वयंशिक्षण प्रयोग या अशासकीय संस्थेने त्यासाठी पुढाकार घेतला. गावात गेल्या वर्षी 52 तर या वर्षी सुमारे 51 शोषखड्डे घेण्यात आले. पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत पाण्याचा निचरा होण्यास यामुळे मदत होते. संरक्षित सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची सोयदेखील त्या माध्यमातून होते. त्यासोबतच जमिनीत पाणी मुरविण्याच्या माध्यमातून भूगर्भातील जलस्रोत बळकटीकरणासही यामुळे मदत होते. शोषखड्डे खोदताना निघणाऱ्या मातीचा उपयोग करीत "एल' टाईप बांध शेतात घेतला जातो, त्यामुळे पावसाळ्यात होणारी मातीची धूप रोखण्यास मदत होते. अशा प्रकारचे फायदे या शोषखड्ड्यांच्या माध्यमातून दिसत असल्याने त्याच्या उभारणीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. शोषखड्डा दहा फूट खोल व 22 फूट रुंद खोदण्यात येत असल्याने त्याचा आकार वाढवित पुढे विहिरीसारखा त्याचा उपयोग होऊ शकतो. गावात चार शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा प्रयोग केला आहे. शोषखड्डा 2500 रुपये रोख व श्रमदान असा वीस टक्‍के लोकवाटा त्यासाठी आवश्‍यक राहतो. उर्वरित निधीची तरतूद स्वयंशिक्षण प्रयोग संस्था व नवाजबाई रतनटाटा ट्रस्टकडून होते. संस्थेच्या माती, पाणी संवर्धन प्रकल्पातून हा उपक्रम राबविला जातो. त्यातूनच शोषखड्ड्याच्या जोडीला तुषारसंचाचा पुरवठा संस्थेने केला आहे. तीन गावांमध्ये सुमारे 72 संच अनुदानावर पुरविण्यात आले आहेत. 17 हजार रुपये लोकहिश्‍श्‍याची अट तुषार संचासाठी आहे.

गाव विकास समितीचे नियंत्रण

नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामात गाव विकास समितीचे नियंत्रण होते. या समितीमध्ये अध्यक्ष रमेश देवरे, सचिव अर्चना बिलारी व अन्य दहा सदस्यांचा समावेश आहे. लोकांमध्ये जाणीवजागृती त्यासोबतच लोकवर्गणी गोळा करून हिशोब ठेवण्याचे काम ही समिती करते.

लोकसहभागातून गावतलाव

15 बाय 40 मीटर आकाराचा व तीन मीटर खोल असा गावतलाव घेण्यात आला. याकरिता कोणत्याही शासकीय व अशासकीय संस्थेची मदत ग्रामस्थांनी घेतली नाही. शंभर टक्‍के लोकवर्गणीतून हे काम झाले. स्वयंशिक्षण प्रयोग ही संस्था पुढे या गावतलावाच्या विस्तारीकरणाला हातभार लावणार आहे.

"ऍग्रोवन'ने वाढविला उत्साह"

सन 2011-12 या वर्षात 90 टक्‍के लोकवाटा व 10 टक्‍के शासननिधीतून ग्रामस्थांनी नाल्यातील गाळाचा उपसा करीत त्याचे विस्तारीकरण केले. त्याचे दृश्‍य परिणाम अल्पावधीतच भूगर्भातील जलसाठे वाढीच्या माध्यमातून अनुभवता आले. त्या विषयी "ऍग्रोवन' मधून यशोगाथा प्रकाशित झाल्यानंतर या गावाचे राज्यस्तरीय कौतुक झाले. त्यानंतर ग्रामस्थांना जलसाक्षर करीत पाण्याच्या समृद्धीकडे वाटचाल केलेले गाव अशी ओळख निर्माण करण्यासाठी ग्रामस्थ सरसावले. निश्‍चितच त्यांचा हा प्रयत्न अंधारातून प्रकाशाकडे नेणारा आहे.
संपर्क - सुभाष नानवटे-9325875999
संतोष ढवळे - 9765731577
उपसरपंच, गटग्रामपंचायत वाळकी

स्त्रोत: अग्रोवन १ जुलै २०१४

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate