Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/08/11 13:41:19.140359 GMT+0530
मुख्य / शेती / जल व मृद संधारण / जलसंवर्धनातून दुष्काळावर मात
शेअर करा

T3 2020/08/11 13:41:19.145081 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/08/11 13:41:19.171154 GMT+0530

जलसंवर्धनातून दुष्काळावर मात

जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर सोय झालीच, त्यासोबतच वर्षभरात दोन ते तीन पिके शेतकरी घेऊ लागले आहेत.

 

"बायफ मित्र'चा पुढाकार

"पावसाळ्यात भरपूर पाणी आणि उन्हाळ्यात पिण्यासाठी हाल' अशी स्थिती नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या आदिवासी तालुक्‍याची आहे. याच तालुक्‍यातील बारशिंगवे आणि सोनुशी या गावांनी लोकसहभागातून मागील तीन वर्षांत कायापालट केला आहे. जल-मृद संधारणाच्या कामातून पिण्याच्या पाण्याची तर सोय झालीच, त्यासोबतच वर्षभरात दोन ते तीन पिके शेतकरी घेऊ लागले आहेत. 

बारशिंगवे व सोनोशी या गावांत खरीप हंगामात भात, नागली, वरई, खुरासणी, भुईमूग ही पिके पारंपरिक पद्धतीने घेतली जातात. खरीप हंगाम संपल्यानंतर बहुतेक कुटुंबांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर ठरलेले. चार महिने गावाबाहेर काढल्यानंतर परत खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी गावाकडे परतत. या क्रमानेच वर्षानुवर्षे येथील गावे जगत आली आहेत. रब्बी हंगामात शेतीला पाणी नसल्याने बाहेरगावी रोजगाराच्या शोधात जाणे भाग पडत असे. जनावरांना अपुरा चारा, पिण्याच्या पाण्याची समस्या जोडीला होतीच. गावातल्या विहिरी डिसेंबर- जानेवारीत आटून जात. ज्या विहिरी नदीकिनारी आहेत, त्यांच्या साह्याने जनावरांना व माणसांना पाणी मिळत असे. 

अशी झाली सुरवात

सुरवातीला "बायफ मित्र'च्या कार्यकर्त्यांकडून बारशिंगवे व सोनोशी गावातील ग्रामसभेत शेतकऱ्यांना जल-मृद संधारण आणि ग्रामविकास प्रकल्पाची माहिती देण्यात आली. गावातील पाण्याचे स्रोत आदी गोष्टींचे आकलन होण्यासाठी सहभागातून ग्रामीण मूल्यांकन अहवाल (पी.आर.ए.) करण्यात आला. यासाठी गावातील सर्व घटकांना एकत्रित करून त्यांच्याकडून सर्व गोष्टींचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये जीवनचरितार्थाची साधने, पाणी, जमीन, पिके, जनावरे, सामाजिक संस्था, मंडळे, बचत गट यांची माहिती गोळा केली. पाणलोट विकासासाठी नदी, नाले, डोंगर, पडीक जमिनी, वनजमिनी यांचा अभ्यास करण्यात आला. 
यानंतर ग्रामसभेचा ठराव करून पाणलोट क्षेत्र विकास उपक्रम गावात राबविण्याचे ठराव घेण्यात आले. प्राथमिक सर्व्हेक्षण करून गावातील कुटुंबांची संपूर्ण माहिती घेण्यात आली. 

अभ्यासातून विकासाकडे

ऑक्‍टोबर 2010 मध्ये प्रकल्पाने गावात प्रत्यक्ष कामांना सुरवात केली. सर्वप्रथम ग्रामसभेतून निवडलेल्या अभ्यासू शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी निवडण्यात आले. यात नऊ महिला व 16 पुरुषांचा सहभाग होता. या सर्वांची 23 एप्रिल 2011 रोजी हिवरेबाजार (ता. जि. नगर) येथे अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. गावचे सरपंच पोपटराव पवार यांनी हिवरेबाजारमध्ये राबविलेल्या पाणलोट विकासाच्या प्रयोगांविषयी सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. या प्रयोगांनी भारावलेल्या शेतकऱ्यांनी गावात त्याप्रमाणे नियोजन करण्याचा निर्धार केला. 

सर्वसमावेशक आराखडा केला तयार -

ग्रामस्थांना विश्‍वासात घेऊन कामे साकारण्यासाठी सर्वप्रथम नेट प्लॅनिंग करण्यात आले. यामध्ये जमिनीचा उतार, प्रत व गरज यांचा अभ्यास करून उपचार पद्धती ठरवण्यात आल्या. नेट प्लॅनिंग करताना प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा नियोजन आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यास एकत्र करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. यास तांत्रिक मंजुरी घेण्यात आली. या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामस्थांना व जमीनमालकांना एकत्रित करून गावातील तरुणांना प्रशिक्षित करून अहवाल तयार करण्यात आला. यामध्ये जमिनीच्या गरजेनुसार बांधबंदिस्ती, सांडवे, ओघळ नियंत्रण, दगडी बांध इत्यादी उपचार पद्धती नक्की करण्यात आल्या. ग्रामपातळीवर प्रत्यक्ष कामांना सुरवात करताना गावातील काही तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये प्रत्यक्ष शेतावरील कामांचे नियोजन कसे करावे? उतार व उंची यांचा यांचा अंदाज घेऊन कुठल्या उपचार पद्धतींचा अवलंब करावा? उतार कसा मोजावा? क्षेत्र उपचाराच्या पद्धती जसे- दगडी सांडवे टाकणे, सलग समपातळी चर, बांधबंदिस्ती, गॅबियन, माती बांध उंचावणे, जलशोषक चर, अर्धचंद्राकृती चर इत्यादी पद्धतींची माहिती देण्यात आली. यातील स्वयंसेवकांना "पाणलोट सेवक' या नावाने ओळखले जाते. असे सात पाणलोट सेवक या प्रकल्पातून तयार झाले. 

लोकसहभागातून झाला बदल -

शेतांची निवड करून माथा ते पायथा या पाणलोटाच्या नियमाप्रमाणे प्रत्यक्ष कामांना सुरवात केली. पाणलोट सेवकांनी जागा आखून देणे, मजुरांना कामे नेमून देणे व देखरेख ठेवणे यावर भर दिला. कामावर गावातील मजूर हजेरी लावू लागले. सुरवातीला प्रतिसाद अत्यल्प होता. प्रथम मजुरीचे वाटप केल्यानंतर ग्रामस्थांना काम परवडणारे वाटू लागले, त्यांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला. सोनोशी व बारशिंगवे या गावांमध्ये बहुतांश प्रमाणात शेताची बांधबंदिस्ती व दगडी सांडवे या कामांना जास्त मागणी होती. या कामांना गती देण्यासाठी व त्यात ग्रामस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी पाणलोट समितीची स्थापना ग्रामसभेतून केली. बारशिंगवे गावात पांडव पाणलोट विकास समिती या नावाने, तर सोनोशी गावात लोकसंदेश पाणलोट विकास समिती या नावाने वर्ष 2011 मध्ये समिती स्थापन करण्यात आल्या. या समितीमध्ये आठ महिला व 21 पुरुष असे एकूण 29 सभासद आहेत. पाणलोट विकासाच्या कामांना बळकटी येण्यासाठी व ते टिकाऊ होण्यासाठी सुमारे 26 प्रकारच्या वने व फळझाडांची लागवड ग्रामस्थांनी केली. सुमारे 70,467 वृक्षांची लागवड पाणलोट क्षेत्रात करण्यात आली. चारा उपलब्ध होण्यासाठी व बांध दर्जेदार राहण्यासाठी गवताच्या बियाण्यांची लागवड झाली. 

सुधारित शेती उपक्रम :

पाणलोटातून मिळणाऱ्या पाण्यातून उत्पन्न वाढविण्यासाठी सुधारित शेती उपक्रमांवर भर देण्यात आला. यामध्ये पीक प्रात्यक्षिकांचा वापर, अभ्यास दौरा, सुधारित बियाण्यांचा वापर, शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून भाजीपाला उत्पादन, संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, चारसूत्री पद्धतीने भात उत्पादनावर भर देण्यात आला. 

पाणलोट विकास समितीची जबाबदारी -

1) पाणलोट विकासकामांना गती देणे 
2) कामाची प्रत राखणे, मजुरांचे पेमेंट वेळेत करणे 
3) विकास यंत्रणांना कामात सहभागी करून घेणे 
4) उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे, पिकांच्या नियोजनात ग्रामस्थांना सहभागी करून घेणे 
5) झाडांची निगा राखणे व त्यांची संख्या वाढविणे, प्रत्यक्ष कामांवर देखरेख 

पाणलोट क्षेत्र विकास कामांचे परिणाम

- पाणलोट कामांमुळे 318 दशलक्ष घनमीटर पाणी संवर्धन 
- दुबार पिकांखालील क्षेत्र 40 टक्‍क्‍यांनी वाढले 
- चार हेक्‍टर पडीक जमीन लागवडीखाली आली 
- भाजीपाल्याचे लागवड क्षेत्र वाढले 
- जनावरांना भरपूर चारा व पाणी जागेवरच उपलब्ध झाले 
- जानेवारीत आटणाऱ्या विहिरींना बारमाही पाणी उपलब्ध झाले 
- वृक्षारोपणामुळे विविध उपयोगी झाडांची संख्या वाढली 
- गावातच रोजगार उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांचे स्थलांतर थांबले 

जलसंवर्धनाने चित्र पालटले...

बारशिंगवे येथील शेतकरी बाळू पांडुरंग रूपवते यांचे तसे 13 एकर क्षेत्र; मात्र तरीही पावसाळ्याच्या एका भात पिकाशिवाय पर्याय नव्हता, कारण जमिनीची रचनाच तशी अवघड बनली होती. त्यामुळे इतर आठ महिन्यांत नगर, संगमनेरला रोजंदारीवर मजुरीसाठी जावे लागे. 2010 ला गावाच्या शिवारात पाणलोटाचे काम सुरू झाले. बाळू यांनी झोकून देऊन त्या कामात सहभाग दिला. पहिले वर्ष बाहेरची मजुरी बुडाली; पण दीर्घकाळाचे काम झाले. बांधबंदिस्ती करून घेतली. आज 2013 च्या उन्हाळ्यात भातानंतर कांदा पीक काढून रूपवते फळांनी लगडलेल्या आंब्याच्या झाडाला साठविलेल्या पाण्यातून सिंचन करीत आहेत. बारशिंगवेच्या सोमनाथ घाणे, बाळू लहामगे, मच्छिंद्र लहामगे, रामकृष्ण भोईर, निवृत्ती झोले, बाळू धोंगडे, विष्णू पेडणेकर, जनार्दन भांगरे, दिलीप पोटकुळे यांच्या शेतीतील उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. 


संपर्क : 
जितीन साठे, विभागीय अधिकारी (बायफ- मित्र) : 7588094016 
बाळू रूपवते, शेतकरी (बारशिंगवे) 965708582 

सुधारित शेती उपक्रमांचा तपशील

क्रमांक ----पिकाचे नाव ---हंगाम ---केलेला प्रयोग -----एकूण लाभार्थी ---सरासरी लागवड क्षेत्र ----आलेले उत्पादन (किलो) --- उत्पादनातील वाढ (टक्के) 
1) भात ---खरीप 2011----चारसूत्री पद्धतीने लागवड--120---0.5 एकर---1429--25.24 
2) गहू--रब्बी 2011--सुधारित बियाणे (तपोवन)--140---37 गुंठे---743---98.66 
3) कलिंगड---उन्हाळी ---2012---नवीन पीक ---10---10 गुंठे---2750--- ---

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

2.9453125
विलास मेढे Jul 21, 2016 10:35 PM

मु पो अंबोली. ता त्र्यंबक , जि नाशिक 89*****31

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2020/08/11 13:41:19.553656 GMT+0530

T24 2020/08/11 13:41:19.560134 GMT+0530
Back to top

T12020/08/11 13:41:19.032853 GMT+0530

T612020/08/11 13:41:19.052378 GMT+0530

T622020/08/11 13:41:19.129411 GMT+0530

T632020/08/11 13:41:19.130378 GMT+0530