অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भूगर्भातील पाणीसाठ्याचा आधार

भूगर्भातील पाणीसाठ्याचा आधार

मॉन्सूनचा पाऊस लांबला व महाराष्ट्र हवालदिल झाला, ही बातमी वृत्तपत्रात वाचली. मी १९४९ पासून शेती करत अाहे. प्रत्येक वर्षाच्या मॉन्सूनच्या पावसाच्या आगमनाकडे माझे लक्ष असते. १९४९ ते १९७२ या तेवीस वर्षांत मॉन्सूनच्या पावसाने आजच्यापेक्षाही अधिक ओढ दिली होती; पण त्या वेळी महाराष्ट्र आजच्या इतका हवालदिल झाला नव्हता. याचे मुख्य कारण १९७२ पर्यंत भूगर्भातील पाणीसाठे समृद्ध होते. त्या काळात आमच्या विहिरींना भरपूर पाणी होते. दुष्काळातसुद्धा हे पाणी कमी होत नव्हते. त्यामुळे १९७२ पर्यंतचे दुष्काळ आम्हाला सुसह्य झाले व आमचा दुष्काळी भाग टिकून राहिला. यानंतर विहिरींची संख्या व खोली वाढू लागली. बोअरवेलची संख्या व खोलीही बेसुमार वाढली व आजही वाढत आहे. यातून भूगर्भातील पाणीसाठ्याची अक्षरशः उधळपट्टी झाली. १९७२ नंतर या सर्वच विहिरींचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले. २००० पर्यंत अनेक विहिरींनी तळ गाठला व आज बहुतांश विहिरी कोरड्या ठणठणीत पडल्या आहेत. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच विहिरींना थोडे पाणी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वारंवार पडणाऱ्या दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करणे व जनावरे जगवण्यासाठी चाऱ्याच्या छावण्या काढणे हा नवीन प्रकार सुरू झाला.

भविष्यात या येणाऱ्या संकटाची चाहूल लागताच कै. वसंतदादांनी द्रष्टेपणे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ असा आम जनतेला संदेश दिला होता; पण महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षांत फक्त पाणी अडवणे या एकाच गोष्टीकडे लक्ष दिले गेले. या सिंचन प्रकल्पासाठी भरपूर पैसे खर्च करून अनेक सिंचन प्रकल्पांची कामे सुरू झाली; पण सिंचन प्रकल्पाची साईट निवडीपासून प्रत्यक्ष सिंचन सुरू होईपर्यंत अनेक अडथळे आहेत. प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून तो पूर्ण होण्यास पंचवीस ते तीस वर्षांचा कालावधी लागतो. या कामातील मोठ्या भ्रष्टाचारामुळे निकृष्ट दर्जाची कामे होतात. त्यामध्ये अनेक त्रुटी, प्रकल्पाची सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन यातील फार मोठी तफावत, हेच पाणी पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगासाठी विभागून वाटणी, पाणी वाटपातील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भांडणे व पाण्याचा नाश इतक्या संकटातून प्रवास केल्यावरसुद्धा या सिंचन प्रकल्पाच्या अडचणी संपत नाहीत. अनेक प्रकल्प गाळाने भरून त्याची पाणी साठवण क्षमता फार मोठ्या प्रमाणावर घटली आहे. या गाळामुळे धरणातून जमिनीत जिरणारे पाण्याचे पाझर पूर्णपणे बंद झाले आहेत. धरणातील पाण्याचे अहोरात्र बाष्पीभवन चालू आहे. इतके सर्व असूनही मॉन्सून चांगला बरसला नाही तर ही धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. इतके सर्व विस्ताराने लिहिण्याचे कारण महाराष्ट्र अजून पूर्णपणे मॉन्सूनच्या पावसावरच अवलंबून आहे. साठवलेल्या नुसत्या पाण्यावर वाढत जाणारी दुष्काळाची दाहकता कमी करता येणार नाही. यासाठी मॉन्सूनचा पाऊस जास्तीत जास्त जमिनीत जिरवणे हा फक्त एकच खात्रीचा उपाय शिल्लक आहे.

पूर्वी चराऊ कुरणे समृद्ध होती. जंगले सुरक्षित होती. या विस्तीर्ण क्षेत्रावर पडणारा पाऊस जमिनीत जिरत होता, त्यामुळे भूगर्भातील पाणीसाठे तुडुंब भरलेले होते. या पाण्याचा फारसा उपसा होत नसे. प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात निसर्गाच्या योजनेप्रमाणे जमिनीत पाणी जिरणे चालूच असे, त्यामुळे त्या वेळी पावसाळा संपला तरी नद्या व ओढे वर्षभर निवळशंख पाण्याने वाहत असत व ग्रामीण भागाची वर्षभर पाण्याची पूर्ण गरज भागत असे. ही हकिकत फार पूर्वीची नाही. ही निसर्गाने केलेली पाण्याची व्यवस्था १९४० ते १९५० या वर्षांपर्यंत चालू होती. त्या वेळेपर्यंत भूगर्भातले पाणीसाठे सुरक्षित होते. भूतकाळात अनेक मोठे दुष्काळ पडले. त्यात माणसे अन्नावाचून दगावल्याचे दाखले आहेत; पण पाण्यावाचून माणसे मेल्याचे दाखले नाहीत. याचा अर्थ दुष्काळात या भूगर्भातील पाणीसाठ्याचा मोठा आधार असतो. कारण हे पाणीसाठे कशानेही नाश पावत नाहीत. ते कमी होत नाहीत, ते दीर्घकाळ टिकू शकतात. या भूगर्भातील पाणीसाठ्याबद्दल व त्या पाण्याच्या उपयुक्ततेबद्दल, त्या पाण्याच्या वापराबद्दल फारशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही.

चराऊ समृद्ध कुरणावर व संरक्षित वनक्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचे पाणी जिरण्याची नैसर्गिक प्रक्रिया कधीही बंद पडत नाही. कृत्रिम पद्धतीने जमिनीत पाणी जिरण्याचे काम दीर्घकाळ चालत नाही. उदा. धरणाच्या पाण्यात गाळ साचला, की जमिनीत पाणी जिरण्याची क्रिया पूर्ण बंद पडते. पाणी जमिनीत जिरण्यासाठी अनेक पाझर तलाव तयार आहेत; पण कालांतराने यातले पाणी जिरण्याचे पूर्णपणे बंद होते व ते नावालाच पाझर तलाव राहतात, असा माझा अनुभव आहे. यासाठी नैसर्गिकरीत्या मॉन्सूनचा पाऊस जमिनीत जिरण्याच्या प्रक्रियेतून भूगर्भात जे पाणीसाठे तयार झाले त्यावर संशोधन व अभ्यास झाला पाहिजे. त्यासंबंधीची शास्त्रीय माहिती जनतेला कळाली पाहिजे, त्यामुळे सर्वांना या पाणीसाठ्याचे महत्त्व कळेल, त्याच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल. हे पाणीसाठे पूर्णपणे लुप्त झाले तर भविष्यात येणाऱ्या दुष्काळाची तीव्रता वाढत जाईल. मनुष्यप्राण्यासह इतर सर्व जीवसृष्टीचे रक्षण करणे दिवसेंदिवस अवघड होईल. यासाठी चराऊ कुरणे ओसाड पडली आहेत, ती पुन्हा समृद्ध बनवणे व जंगलाचे संरक्षण या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.

नारायण देशपांडे- मोबा. - ९०९६१४०८०१
(लेखक आटपाटी येथील शेती परिवार कल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate