অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गावांना मिळाली जलसुरक्षा

साखळी सिमेंट बंधारे उभारणी प्रकल्प यशस्वी


जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळात होरपळत असलेला तालुका म्हणून माण तालुक्‍याची ओळख होत आहे. ज्वारी, बाजरीसाठी प्रसिद्ध हा तालुका सर्वांत जास्त छावणीचा म्हणून ओळखला जाऊ लागला होता. मात्र, यंदा दमदार झालेल्या परतीच्या पावसाने व साखळी सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याने माण तालुक्‍यातील 21 गावांतील परिस्थिती बदलत आहे. हिरवागार निसर्ग, ओढ्या-नाल्यावर सलग चार-चार किलोमीटरवर साठलेले पाणी हे चित्र दुष्काळी माण तालुक्‍यातील असेल असे कोणालाही वाटणार नाही. 

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्‍यास दुष्काळ पाचवीलाच पूजलेला आहे. प्रत्येक पाच वर्षांनंतर कमी-अधिक प्रमाणात दुष्काळ येतोच. या दुष्काळावर ठोस उपाय होत नाही. धरणातील पाण्यानेही पूर्ण तालुक्‍याचा पाणीप्रश्‍न मिटणार नाही. हा दुष्काळ कमी करण्यासाठी तालुक्‍यातील काही गावांत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत साखळी सिमेंट कॉंक्रिट बंधारे उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यातून तालुक्‍यात 21 गावांत 107 साखळी सिमेंट बंधारे गेल्या वर्षी बांधण्यात आले. यामध्ये पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणावा असा पाऊस न झाल्याने पाणीसाठा झाला नव्हता. परतीच्या पावसाने मोठा हात दिल्याने सर्वत्र पाणीच पाणी होऊन बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. साखळी बंधारे नसते तर हेच पाणी वाहून गेले असते आणि जानेवारीच्या सुरवातीलाच पाणीटंचाईला सुरवात झाली असती. मात्र, या साखळी बंधाऱ्यांत सुमारे 2046.90 टीएमसी पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.


21 गावांत जलसुरक्षा


माण तालुक्‍यात सलग तीन वर्षांत अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्यामुळे सर्वत्र तीव्र पाणीटंचाई होती. या दुष्काळावर मात करण्यासाठी साखळी सिमेंट बंधारे उभारणीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये पाण्याची टंचाई असलेल्या गावांची माहिती घेऊन प्रकल्प हाती घेण्यात आला. तालुक्‍यातील 21 गावांत 107 सिमेंट बंधारे उभारण्यात आले. खरीप हंगामाच्या सुरवातीस पावसाने काही प्रमाणात बंधारे भरले. मात्र, त्यानंतर पावसाने उघडीप दिली. यंदा परतीचा पाऊस दमदार झाल्याने सर्वच बंधारे खळखळून वाहू लागले.

पाणीपातळीत वाढ


सिमेंट बंधारे, पाझर तलावातील काढण्यात आलेला गाळ यांसारख्या कारणांमुळे या तालुक्‍यात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक माण तालुक्‍यात 1.53 मीटर पाणीपातळीत वाढ झाली आहे. विहिरींना, बोअरवेल यांना पाणी वाढले आहे.


पीक पद्धतीत होणार बदल


गेल्या तीन वर्षांच्या दुष्काळामुळे जिल्ह्यात सर्वांत कमी पेरणी या तालुक्‍यात झाली होती. पाण्याअभावी पिके करपून गेली होती. मात्र, परतीच्या पावसाने माण तालुक्‍याला आधार दिला आहे. सिमेंट बंधाऱ्यांमुळे विहिरी काटोकाठ भरल्या आहेत. यामुळे मुबलक पाणीसाठा झाला आहे. यांचा फायदा रब्बी पिकांना होणार आहे. पाण्यामुळे पीक पद्धतीत बदल होऊ लागला असून, नगदी पिकांकडे शेतकरी वळू लागला आहे. भाजीपाला पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अनेक वर्षांतून कांदा, टोमॅटो, मिरची, कोबी यांसारख्या भाजीपाला पिकांबरोबर रब्बी ज्वारी, हरभरासह वैरणीची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. फळबागाच्या क्षेत्रातही वाढ होणार आहे. तालुक्‍यात रब्बी हंगामात किमान 25 हजार 673 हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली.


पिण्याचा पाणीप्रश्‍न सुटणार


अनेक गावांत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही भरल्या आहेत. तालुक्‍यात सर्वाधिक टंचाईग्रस्त गावांत पिण्याच्या पाण्यासाठी पूर्वी टॅंकर सुरू होते. बंधाऱ्यांमुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असल्याने या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. 

साखळी सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यामुळे होणारे अपेक्षित फायदे 
तालुक्‍यात 106 साखळी सिमेंट कॉंक्रिट बंधाऱ्यांची निमिर्ती. 
तालुक्‍यातील 21 गावांत जलसुरक्षा. 
सिमेंट बंधाऱ्यांमुळे 749 विहिरींचे पुनर्जीवन 
पिण्याचा पाण्याच्या 25 विहिरींना फायदा होणार. 
संरक्षित पाणी मिळणारे अपेक्षित 2100 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार. 

सिमेंट बंधाऱ्यामुळे आमच्या गावात पाणी उपलब्ध झाले आहे. सर्व सिमेंट बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत. गेल्या तीन वर्षांच्या दुष्काळात काही राहिले नव्हते. आता विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे कांदा, टोमॅटो, गहू यांसारखी पिके घेणार आहे.


रेवणसिद्ध खरात, शिंदी खुर्द (ता. माण)


साखळी सिमेंट कॉंक्रिट बंधारे झाल्याने पाणीसाठा चांगला झाला आहे. या पाण्यावर मक्‍याचे पीक घेतले आहे. या पाण्याचा उपयोग भविष्यात चांगल्या प्रकारे होणार आहे. 
श्‍यामराव जगदाळे, मोगराळे, (ता. माण) 

आमच्या गावात 15 सिमेंट बंधारे झाले असून, ते सर्व बंधारे परतीच्या पावसात भरून वाहत होते. बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला. आमच्या गावात कधी नव्हे ती बागायती शेती सुरू होणार आहे. ज्वारीसह भाजीपाला पिके घेण्यास सुरवात झाली आहे. 
नितीन सस्ते, टाकेवाडी, (ता. माण) 

कृषी विभागाकडून दोन बंधारे बांधण्यात आले असून, त्यात चांगला पाणीसाठा झाला आहे. यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याचा; तसेच जनावरांसाठीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. 
धुळदेव आटपाडकर, कुरणेवाडी, (ता. माण) 

विहीर सिमेंट बंधाऱ्यालगत असून, विहीर पाण्याने पूर्ण भरली आहे. या उन्हाळ्यापर्यंत पाणी कमी पडू शकणार नाही. या पाण्यावर वाटाणा पिकाची लागवड केली. पुढे उन्हाळी भुईमूग घेणार आहे. 
सदनकुमार काळे, पिंगळी खुर्द, (ता. माण) 

सिमेंट बंधारे होण्याआधी पाऊस झाला की पाणी वाहून जायचे. सिमेंट बंधारे झाल्यामुळे पाणीसाठा चांगला झाला आहे. या पाण्यामुळे फळबागांच्या क्षेत्रात वाढ करणे शक्‍य होणार आहे. या पाण्यावर हरभरा केला आहे. दुष्काळी भागासाठी बंधारे वरदायी ठरले आहेत. 
सौ. मनीषा दडस, सरपंच, पांगारी, (ता. माण) 


तालुक्‍यासाठी पाणी योजनेच्या मोठ्या घोषणा झाल्या. पावसाचे प्रमाण कमी होते. जो काही पाऊस पडायचा त्याचे पाणी वाहून जात होते. हे पाणी अडवण्याचा संकल्प केला. यातून साखळी सिमेंट बंधारे यांची कल्पना पुढे आली. साखळी सिमेंट बंधाऱ्याची बाब राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढे मांडल्यावर त्यांनी त्वरित मान्यता मिळवून दिली. कृषी विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला. तो यशस्वी करण्यासाठी काही बदल केले. नाल्यांवरील अतिक्रमणे काढून खोलीकरण, सरळीकरण करून घेतले. पावसाळाच्या सुरवातीला व परतीच्या पावसामुळे बंधारे भरून वाहू लागले. पिण्याच्या पाण्याची टंचाई होती तेथे शेतीला पाणी उपलब्ध करू शकलो, याचा आंनद आहे. 
आमदार जयकुमार गोरे, माण-खटाव मतदारसंघ. 

जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या माध्यामातून उभारण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. या पाण्यामुळे येथील पीक पद्धतीत बदल होत आहे. शेतकरी भाजीपाला पिके घेऊ लागला आहे. पाणीबचतीसाठी ठिबक सिंचन वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पुढील कामांसाठी दहा कोटी प्राप्त झाला असून, त्यामध्ये 10 गावांमध्ये 101 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामुळे गावांतील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

प्रतापसिंह कदम, कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा. 
भाऊसाहेब रूपनवर, तालुका कृषी अधिकारी-9423875170.

 

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate