"गाव करील ते राव काय करील' अशी म्हण प्रचलित आहे. त्याच पद्धतीने भोसे (जि. सोलापूर) येथील ग्रामस्थ गेल्या वर्षीच्या दुष्काळात एकत्र आले. सुमारे 35 लाख रुपयांच्या लोकवर्गणीतून बंधारेउभारणी व ओढ रुंदी-खोलीकरणाच्या कामांतून त्यांनी पाणीटंचाईवर मात केली आहे. सुमारे पाच किलोमीटर लांबीच्या ओढ्यावरील बंधाऱ्यात आजही पाणी टिकून राहिले आहे. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविल्यामुळे गाव टॅंकरमुक्त होण्यास मदत झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेले पंढरपूर तालुक्यातील भोसे हे गाव. येथील शेतकरी प्रामुख्याने ऊस, द्राक्ष, केळी डाळिंबासह अन्य पिके घेतात. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके जळून गेली. गेल्या वर्षी संपूर्ण गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. अशा परिस्थितीत जलस्रोत निर्माण करण्याचा विचार पुढे आला. त्यातूनच गावकऱ्यांनी एकत्रित येऊन पावसाचे वाया जाणारे पाणी अडविण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी निधीची गरज होती. अशा वेळी गावचे माजी सरपंच व श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील यांनी मदतीचा हात पुढे केला. ग्रामस्थांनी यथाशक्ती लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात केली. बघता बघता सुमारे 35 लाख रुपयांचा निधी संकलित झाला. त्यानंतर विविध कामांना गती आली. गावातील जुन्या ओढ्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. "पाणी अडवा-पाणी जिरवा' ही संकल्पना तंतोतंत राबवण्यात आली. गावात चार साखळीबंधारे श्रमदानातून बांधण्यात आले.
गेल्या वर्षी पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी ओढ्यावर बांधलेल्या पाच बंधाऱ्यांत अडविण्यात आले. त्याचा येथील सुमारे 500 हून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा झाला. विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांकडील ऊस पिके जोमात आली आहेत. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पाणीपातळी वाढल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. ओढ्याच्या दोन्ही बाजू सुस्थितीत राहाव्यात यासाठी गावकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी बांबूची लागवड केली आहे.
सलग तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील ग्रामस्थांना भेडसावत होता. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. या वर्षी मात्र ओढ्याच्या बंधाऱ्यातील पाण्यामुळे गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीला सद्यःस्थितीतदेखील चांगले पाणी आहे. त्यामुळे या वर्षी पाणीटंचाई असतानादेखील पिण्याचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
गेल्या वर्षी दुष्काळाने येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. पाण्याअभावी अन्य पिकांसह चारापिकेही जळून गेल्याने, अनेक शेतकऱ्यांना जनावरांच्या छावणीवर मुक्काम करावा लागला होता. जलसंधारणाच्या कामांमुळे आजही सुमारे पाच किलोमीटर अंतरापर्यंत ओढ्यात पाणी साठून राहिले आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटून गेला तरी अजून या भागात पावसाचा पत्ता नाही. पावसाअभावी खरीप पेरणी हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा वेळी भोसे येथील शेतकरी पाण्याच्या बाबतीत इतरांपेक्षा समाधानी आहेत.
सांप्रदायिक म्हणून ओळख असलेल्या भोसे गावात आजही अनेक निर्णय सामुदायिकपणे घेतले जातात. त्यातूनच 2012-13 चा सात लाख रुपयांचा तंटामुक्त पुरस्कार गावाला मिळाला. पुरस्काराच्या रकमेचा योग्य कामासाठी विनियोग करण्याच्या हेतूने ही रक्कम जलसंधारणाच्या कामांसाठी खर्च करण्यात आल्याचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वैजिनाथ कोरके यांनी सांगितले.
ओढ्यावरील बंधाऱ्याचे नाव -- -लांबी (मीटर) होणारा पाणीसाठा (दलघमी)
1) इनाम बंधारा- 300 19.8
2) यशवंतराव महाराज बंधारा 870 , 78
3) जमदाडे वस्ती बंधारा 615 37.82
4) कोळी वस्ती बंधारा - 520 22.56
सलग दोन वर्षांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे माझ्या पाच एकर शेतीतील पिकांचे नुकसान झाले होते. गेल्या वर्षीही तीन एकर ऊस पाण्याअभावी जळून गेला होता. बंधाऱ्यातील पाणीसाठ्यामुळे या वर्षी अद्याप पाऊस नसतानाही विहिरीची पाणीपातळी टिकून राहिली आहे. विहिरीतील पाण्यावर घेतलेली पाच एकर क्षेत्रावरील पिके सुस्थितीमध्ये आहेत.
कृष्णा अवघडे-9850104977
गेल्या वर्षी पाणीटंचाईमुळे माझी दोन एकर द्राक्षबाग आणि तीन एकर उसाचे पीक पाण्याअभावी जळून गेले होते. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर झाला होता. कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने झालेल्या जलसंधारणाच्या कामांचा चांगला फायदा झाला आहे.
सुनील कोरके
दर वर्षी उन्हाळी पिके घेता येत नव्हती; यंदा मात्र ओढ्यातील पाण्यामुळे कडवळ, भुईमूग आदी पिके घेता आली. शिवाय पाणी उपलब्ध असल्यामुळे आडसाली उसाची लागवडदेखील केली आहे.
महादेव जमदाडे-9923787297
दुष्काळामुळे असह्य झालेल्या ग्रामस्थांना बंधाऱ्यातील पाण्यामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे. दर वर्षी गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागे; यंदा मात्र टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली नाही. शिवाय ओढ्याकाठच्या भागातील शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे.
दगडू बनसोडे
सरपंच, भोसे
अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दर वर्षी पाणीटंचाईचे संकट येणार, हे ओळखून आम्ही दूरदृष्टीने गावओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम ग्रामस्थांच्या सहकार्यातून व लोकवर्गणीतून पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी गावातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली होती. जनावरांसाठी चाराछावणी सुरू करण्यात आली होती. बंधाऱ्यातील पाण्यामुळे यंदा तशी परिस्थिती गावकऱ्यांवर आली नाही.
राजूबापू पाटील-9822425551
संचालक, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन 24 जुलै २०१४
अंतिम सुधारित : 10/7/2020
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतक...
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा...
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्...