অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनराई बंधारा बांधण्याची रीत

वनराई बंधारा बांधण्याची रीत व फायदे

आवश्यक तेवढी पोती जमा करावीत. प्रत्येक पोत्यात रेती, माती इ. भरून पोती शिवून घ्यावीत. ओढ्यात ज्या ठिकाणी वनराई बंधारा बांधावयाचा असेल तेथील काठ वनराई बंधाऱ्याच्या आकाराप्रमाणेच अंदाजे १ मीटर पर्यंत खोदून घ्यावेत. ओढ्याच्या तळ्यात जमा झालेला कचरा, रेती, माती इ. अंदाजे एक फुटापर्यंत साफ करून घ्यावी आणि एक फुट खोलीचा पाया घ्यावा. त्यानंतर प्रवाहाच्या दिशेस काटकोन करतील अशा तर्हेने आकृतीत दाखविल्यानुसार पोत्यांचे आडवे थर रचण्यास सुरवात करावी. थर रचताना सांधेमोड करण्याची काळजी घावी. प्रत्येक दोन-तीन थरानंतर मातीचा एक थर द्यावा. मातीच्या थरामुळे पोत्यांच्या मधील फटी बुजतात व पाणी पूर्णपणे अडविले जाते. त्यामुळे बंधारे पक्के होण्यास मदत होते. वनराई बंधारा बांधून झाल्यावर त्याच्यावर मुरुमाचा २० ते २५ सेंमी. जाडीचा थर दिला असता पोत्यांचे तसेच त्यातील मातीचे उंदीर, घुशी इ. पासून संरक्षण होते.

वनराई बंधारे बांधताना पोत्यांच्या थरांमधोमध तळापासून वरपर्यंत ३० सेंमी. रुंदीची आणि बंधाऱ्याच्या लांबी एवढ्या लांबीची काळ्या मातीची भिंत बांधण्याची पद्धतही आहे. ही मातीची भिंत पोत्यांच्या प्रत्येक थराबरोबर वाढवीत न्यावी. तसेच प्रत्येक थरानंतर ती चांगली धुमसुन घावी. अशा प्रकारे वनराई बंधारा बांधला असता त्यातून पाणी अजिबात वाहून जात नाही.

वनराई बंधार्याचे फायदे :

अत्यंत कमी खर्च. फक्त रिकाम्या पोत्यांची किंमत घ्यावी लागते. अन्य सर्व कामे श्रमदानाने होऊ शकतात.

  • कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक ज्ञानाची गरज नसल्याने दोन चार शेतकरी एकत्र येऊनही वनराई बंधारा बांधू शकतात.
  • एकाच नाल्यावर चार पाच वनराई बंधारे बांधले असता फार मोठ्या प्रमाणावर पाणी अडवता येते.
  • पावसाळ्या नंतर वाहून जाणारे पाणी अडविले जाते आणि त्याचा वापर पिण्यासाठी तसेच शेतीसाठी होऊ शकतो. तसेच हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे आसपासच्या भागातील विहिरींचे पाणीही वाढते.
  • वनराई बंधार्यांना कोणत्याही प्रकारची देखरेख, डागडुजी वा दुरुस्ती लागत नाही.
  • स्टील, सिमेंट, रेती इ. वस्तू बाहेरून आणण्याची आवश्यकता नाही. गावातच फुकट जाणारी खत, सिमेंट इत्यादींची पोटी आणि श्रमदानातून वनराई बंधारे बांधले जातात.
  • सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीच्या काळात एखादे चेक डॅम बांधण्यासाठी जेवढा खर्च येईल त्याच्या व्याजापेक्षाही कमी रकमेत वनराई बंधारा होत असल्याने आर्थिक दृष्टीने अत्यंत उपयुक्त.
  • वनराई बंधारे बांधण्यासाठी गाव पातळीवर ग्रामस्थांनी एकत्रित येण्याची गरज असल्याने आवश्यक ते नेतृत्वही विकसित होते.

सध्या लघु पाट बंधार्याद्वारे पाणी साठवण्याचा खर्च १० लाख घन फुटास ३.५० लाख ते ४.५० लाख एवढा होतो. तोच वनराई बंध्यार्यासाठी प्रत्येक १० लाख घन फुटास अंदाजे ४०,००० रु. खर्च येतो.

सर्व साधारणपणे एका बंधाऱ्यातील पाण्यावर २ ते ३ एकर शेतीला चार वेळा पाणी देता येते. अशा प्रकारचे पाच बंधारे एका पाठोपाठ एक बांधले असता १० ते १५ एकर पर्यंत जमिनीतील पिकांना पाणी देता येऊ शकेल.एका एकरातील उत्त्पन्न रु. १०,००० धरल्यास पाच वनराई बंधार्यांमुळे एक लाख ते दीड लाख रु. पर्यंत उत्त्पन्न वाढवता येऊ शकते.

लहानात लहान वनराई बंधार्याला म्हणजे २ फुट उंचीच्या व ३० फुट लांबीच्या वनराई बंधार्यास सर्व साधारणपणे ५३५ रिकामी पोती  लागतात. एका पोत्यास एक रु. किंमत धरल्यास ह्या बंधार्याचा खर्च रु. ५३५/- इतका होतो. आणि त्यात १०० फुट लांबी पर्यंत पाणी अडल्यास साधारणपणे ८५००० लिटर्स इतके पाणी साठते. म्हणजेच जवळ जवळ ९ टँकर पाणी साठते. एक टँकर पाण्याचा खर्च रु. ५०० धरला तर ५३५ रु. खर्चाच्या एका वनराई बंधार्यांमुळे रु.४५०० टँकरचा खर्च वाचतो. हे झाले लहानात लहान बंधाऱ्या बाबत .जर मोठा बंधारा म्हणजे ५ फुट उंचीचा व ७० फुट लांबीचा बंधारा बांधला तर त्यास २१३२ पोटी लागतात. म्हणजेच खर्च रु. २१३२/- त्यात ३०० फुट लांबीपर्यंत पाणी साठू शकले तर एकंदर १४,८५,७५० लिटर पाणी साठते. म्हणजेच रु. ५०० प्रती टँकर प्रमाणे रु. ७४,०००/- इतका खर्च वाचतो. असे पाच बंधारे गावकर्यांनी श्रमदानाने घातले तर खर्च होईल, रु. १०६६० पण खर्च वाचेल रु. ३,७०,०००/- एवढ्या रकमेचा आणि बागायती उत्त्पन्न मिळेल जवळ जवळ रु. ३ लाख रुपयांचे. ह्या खेरीज बायाबापड्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण वाचेल ती वेगळीच तीचे मूल्य रुपये, आणे, पैशात करता येणे शक्य नाही.

जर ओढ्याची रुंदी कमी असेल आणि खोली जास्त असेल आणि त्यामुळे प्रवाहाची गती जास्त असेल तर वनराई बंधारे टिकत नाहीत. अशा वेळी गॅबियन बंधारे बांधणे उपयुक्त ठरते. गॅबियन बंधारा म्हणजे अनघड उपलब्ध दगडामध्ये जाळीच्या गुंडाळ्यात नालापात्राला आडवे घातलेले बांध. ह्यासाठी नालातळ सर्व साधारणपणे १० ते १५ मीटर रुंदीचा असावा आणि नाला पात्रामध्ये कोठेही कठीण खडक उघडा पडलेला नसावा. गॅबियन बंधारा हा नाल्याच्या प्रवाहाशी काटकोन करील असा बांधावा. त्यासाठी नाल्याच्या दोन्ही काठांमध्ये एक मीटर जाईल असे खोदकाम करावे. १० गेज (३ मी.मी.) जाडीची ६”x६” आकाराची जाळी असणारी तारेची जाळी नाला पात्रात पसरावी त्या जाळीवर पायाची रुंदी ६ फूट, उंची ४ फूट आणि माथ्याची उंची २ फूट भरेल अशा तर्हेने दगड रचावेत. मोठे दगड तळाच्या थरात पसरावेत. प्रत्येक थरात सांध मोड करण्याची दक्षता घ्यावी. दगड पूर्णपणे रचून झाल्यावर दोन्ही बाजूस शिल्लक असणारी जाळी ओढून घेऊन बांधाच्या मध्यावर तारेने घट्ट बांधून घ्यावी. सर्व जाळी बांधाच्या पूर्ण लांबी पर्यंत बांधावी. म्हणजे पूर्ण अनघड दगडांचा बांध तेवढ्या लांबी रुंदी मध्ये एकजीव होईल. हे एक प्रकारे दगडांचे जड गाठोडेच तयार होते. आणि हा एकजीव दगडी बांध पाणलोटातील पुराच्या पाण्यातही आणि बांधावरून पुराचे पाणी वाहून गेले तरीही वाहून जात नाही.

गॅबियन बंधारा बांधण्यासाठी जाळीची रुंदी १७ फुट ते १८ फुट असावी. हा बंधारा बांधण्यासाठी जाळीची रुंदी १७ फुट ते १८ फूट असावी. हा बंधारा बांधण्यासाठी फक्त जाळीचाच खर्च करावा लागतो. बाकी कामे श्रमदानाने करता येतात. गॅबियन पद्धतीच्या ह्या बंधार्यात सुरवातीला गाळ साठण्यास सुरवात होते. नंतर हा गाळ दगडांच्या फटींमध्ये बसून त्यामध्ये गवत उगवणे सुरु होते. सदरील बांधास प्रवाहाच्या बाजूस दोन फूट माती ओढून तळाला लावल्यास पहिल्याच वर्षी बांध अभेद्य होतो. एकदा हा बांध अभेद्य झाला की त्यात पाणी साठणे सुरु होते.

माहिती लेखन : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate