অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनराई बंधारे

महाराष्ट्रातील एकूण ४३८६४ गावांपैकी ३५७१७ गावे कोरडवाहू किंवा पर्जन्याधारित आहेत. या गावांना कोणत्याही प्रकारचे प्रवाही सिंचन उपलब्ध नाही. पर्जन्यावर आधारित भूजल पुनर्भरणाची प्रक्रिया मंद गतीची आहे. भूपृष्ठावरील मातीचे थरातून भूजलस्तरीय खडकापर्यंत पाणी मुरण्याचे प्रमाण पडणार्या पावसाच्या केवळ १२ ते १४ टक्के पर्यंतच आहे. महाराष्ट्राचे १/३ क्षेत्र डोंगराळ भागाचे आहे, १/३ क्षेत्र अवर्षणप्रवण आहे आणि उरलेले १/३ क्षेत्र अति पर्जन्यमानाचे आहे. अशा एकंदर परिस्थितीमुळे पावसाळ्याचे चार महिने सोडता उरलेले आठ महिने जवळ जवळ सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्यच असते. कोकणात आणि विदर्भाच्या काही भागात अतिवृष्टी होते पण पडणारे जवळ जवळ सर्व पाणी वाहून जाते. पावसाला संपता संपताच पाण्याची टंचाई जाणवू लागते.

अवर्षण प्रवण भागात मुळातच पाऊस कमी पडतो आणि पडणारा पाऊस थोड्या दिवसात पडून जातो, त्यामुळे जवळ जवळ वर्षभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची पाळी ग्रामीण भागातील जनतेवर विशेषतः महिलांवर येते. कित्येक वेळा टँकरने पाणी आणून ते गावातल्या विहरीत ओतावे लागते आणि असे ओतलेले पाणी मिळवण्यासाठीही स्त्रियांची तारांबळ होते. पिण्याच्या पाण्याची ही तर्हा तर शेतीची परिस्थिती फारच अवघड आहे. महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या वा अंतिमतः घेता येणाऱ्या सर्व मोठे, मध्यम, लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात येणारी, नागरी भागालागातची व खात्रीशीर पाऊसमान असणारी अशी गावे वगळली तरी भविष्यामध्ये सुद्धा बरीचशी गावे कोरडवाहू राहणार आहेत. या सर्व गावांसाठी पाणलोट विकासाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. अनेक ठिकाणी  अशा कार्यक्रमांची सुरुवातही झाली आहे.

पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत पाणी अडविण्यासाठी व मुरवण्यासाठी केल्या जाणार्या उपायांपैकी काही महत्वाचे उपाय खालीलप्रमाणे आहेत.

अनघड दगडाचे बांध

पाणलोटातील डोंगरमाथ्यावरून ओघळीची सुरवात होते. या ओघळीद्वारा वाहून जाणारे माती व पाणी अडविण्यासाठी ओघळीच्या आकाराप्रमाणे अनघड दगडाचे बांध घालतात. हे बांध आकाराने छोटे असतात. २ ते ३ मीटर लांब व जास्तीत जास्त एक मीटर उंचीचे हे बांध अनघड दगड एकमेकांवर सांधेमोड पद्धतीने रचून बांधले जातात. त्यांच्यामुळे पाणी वाह्ण्याचा वेग कमी होतो. वाहून जाणारे पाणी अडून राहते. हे काम संपूर्णपणे श्रमदानाने करता येते.

मातीचे नाला बांध

एक मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या आणि १५ मीटरपेक्षा कमी रुंद असणाऱ्या नाल्यावर मातीचे नाला बंध घालतात. ह्यासाठी नाल्याच्या तालाचा उतार ३ टक्क्यांपेक्षा कमी असावा. मातीच्या नाला बांधामुळे जमिनीची धूप थांबते. बंधापासून १ ते २ कि.मी. च्या परिसरातील विहिरीच्या भूजल साठ्यात वाढ होऊन बागायती क्षेत्र वाढते. तसेच पाणवहाळ क्षेत्रातून वाहून आलेला गाळ खतासारखा वापरता येतो.

सलग समपातळी चर

सलग समपातळी चराला डोंगर माथ्यापासून सुरवात करतात. कन्टूर मार्करच्या  सहाय्याने प्रथम डोंगरमाथा व उतारावर सलग समपातळी रेषांची आखणी केली जाते. ह्या रेषेवर ६० सेंमी. रुंद व ३० सेंमी. खोल सलग चर खोडले जातात. अशा चरांमुळे जमिनीची धूप थांबते. तसेच पडणार्या पावसाचा थेंब न् थेंब जिरवला जातो. पाणी जमिनीच्या पोटातून पाझरून खाली गेल्याने भूजल उपलब्धीत वाढ होते. ह्या चरांतून निघालेल्या मातीवर वनीकरणही केले जाते. स्थानिक लोकांना रोजगाराबरोबरच पिण्याचे पाणी व सिंचनाचे पाणीही मिळते. सलग समपातळी चरात पाणी साठून राहत नसल्याने पडणार्या प्रत्येक पावसाचे पाणी अडविले जाते हा सलग समपातळी चरांचा एक महत्वाचा फायदा आहे.

वळण बांध

नाल्याच्या प्रवाहातून वाहणारे पाणी अडवून ते शेतात वळविण्यासाठी वळण बांधांचा उपयोग होतो. वळण बंधांचे संपूर्ण बांधकाम अनघड दगडाचे १:५ या प्रमाणात सिमेंट व वाळू या मिश्रणाने करतात. उघड्या भागात पॉईटिंग करतात व वरच्या बाजूस १० सेंमी जाडीचे १:२:४ सिमेंट कॉंक्रीटचे कोपिंग करतात. साठलेले पाणी शेतात वळवण्यासाठी बांधाच्या खालच्या बाजूंला ६० सेंमी. जाडीची दगडी भिंत बांधतात. तेथून नाल्याचे दोन्ही काठ खाडून शेतात पाणी वळवितात.

सिमेंट नाला बांध

काळ्या आणि खोल जमिनीतील नाल्यावर सिमेंट नाला बांध बांधला जातो. अशा बांधा शेजारची जमिन पाणी धरून ठेवणारी नसावी. सिमेंट नाला बांधामुळे सभोवतालच्या विहिरींच्या पाणी साठ्यात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होते. एकूण बागायती क्षेत्रात २५ टक्के वाढ होते. पाणी जास्त जास्त दिवस टिकून राहत असल्याने पावसाळा संपल्यावर पिकांना पाणी देता येते. मात्र हे बंधारे खर्चिक आहेत. दर हजार घन मीटर पाणी साठ्या साठी रु. २०००/- ते रु. २६,००० इतका खर्च येतो.

भूमिगत बंधारा

ज्या नाल्यामध्ये वाळूचा थर १ मी. पेक्षा जास्त असेल अशा नाल्यातील पाणी जमिनीत मुरवण्याकरिता भूमिगत बंधार्याचा वापर करतात. नाल्याच्या पत्रातील वाळू उकरून जमिनीच्या पक्क्या खडकापर्यंत खोदाई केली जाते. खोदलेल्या भागात खाली माती घालून त्यावर पाणी मारून व धुम्मस करून ठराविक घनता आणण्यासाठी दबाई केली जाते. ही माती नाल्याच्या तळापर्यंत भरतात. अशा भूमिगत बंधार्यांमुळे नाल्याच्या लगतच्या क्षेत्रात पाणी मुरते. त्याचा फायदा शेजारच्या विहिरींना कायमस्वरूपी होतो. पाणी वाळूमध्ये व कच्च्या खडकात जमिनीखाली असल्याने बाष्पीभवन होत नाही. उपलब्ध पाणी पूर्णपणे वापरता येते.

या खेरीज वनराई बंधारे आणि गॅबियन बंधारे यांचा वापर केला असता कमी खर्चात जास्त पाणी अडविता येते.

माथ्यापासून पायथ्यापर्यंत संकल्पनेनुसार म्हणजे डोंगराच्या माथ्यापासून किंवा नदीच्या नाल्याच्या उगमापासून सपाटीपर्यंत वरील वेगवेगळे उपाय करून अडविता व मुरविता येते. हे सर्व उपाय स्वतंत्रपणे किंवा एकत्रपणे एखाद्या ओढ्याच्या/नाल्याच्या पात्रात राबविल्यास मोठ्या प्रमाणावर पाणी अडविता येते. पण हे सर्व उपाय करण्यापूर्वी डोंगराचे सर्वेक्षण करणे, वेगवेगळ्या ठिकाणच्या उंची, समपातळी निश्चित करणे, आराखडे तयार करणे, नियोजन करणे अशी अनेक पूर्व तयारीची कामे करावी लागतात. सिमेंट बंधाऱ्या सारख्या कामांसाठी प्रशिक्षित अभियंतांची गरज असते. गाव तळी, पाझर तलाव, नियंत्रक बांध, सिमेंट बंधारे अशा कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. या सर्व बाबींमुळे पाणलोट विकास कामे सुरु करून पार पाडण्यासाठी गावकर्यांना सरकारी यंत्रणा अथवा स्वयंसेवी संस्थांवर अवलंबून राहावे लागते. सर्वसाधारणपणे पंधरा वर्षांचे नियोजन करून महाराष्ट्रातील सर्व पाणलोट हे पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत आणण्यात येणार आहेत. म्हणजे पाणलोट विकास कार्यक्रमात सामील होण्यात नियोजनानुसार उशीर असेल अशा गावांनी आपली निवड होईपर्यंत वाट बघत, तहानलेलेच राहायचे का ?

वनराई बंधारे बांधले असता गावाची पिण्याच्या पाण्याची तसेच शेतीसाठी सिंचनाची गरज काही प्रमाणात भागते. वनराई बंधारे बांधण्यासाठी कोणत्याही मोठ्या पूर्वतयारीची आवश्यकता नाही. फारश्या नियोजनाची आवश्यकता नाही. आणि तांत्रिक ज्ञान असणाऱ्या अभियंत्याच्या मदती शिवायच कोणत्याही गावातले गावकरी शेतकरी वनराई बंधारे बांधू शकतात. ह्या बंधार्यांना खर्च ही जवळ जवळ नाहीच.

गावातून वाहणाऱ्या ०.१ चौ. मैल ते किंवा ५ चौ. मैलांपर्यंत कॅचमेंट असणाऱ्या नाल्यांवर वनराई बंधारे बांधणे अत्यंत फायद्याचे ठरते. वनराई बंधाऱ्या साठी जागा निवडताना खालील मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे.

  1. ओढ्याची रुंदी जास्त आणि खोली कमी असणारी जागा. अशा जागी प्रवाहाची गती अत्यंत कमी असते.
  2. जेथे वनराई बंधारा बांधावयाचा तेथील पाणी वाहते असले पाहिजे.
  3. जेथे बंधार्याची लांबी कमीत कमी ठेऊन अधिकात अधिक पाणी साठवता येऊ शकेल असे ठिकाण निवडावे.
  4. ओढ्याचे दोन्ही काठ मजबूत असतील अशीच जागा निवडावी.
  5. वनराई बंधारा बांधावयाच्या ठिकाणी ओढ्याला वळण नसावे. प्रवाह सरळ असावा.
  6. वनराई बंधारा बांधावयाच्या जागी माती, वाळू इत्यादी साठलेली नसावी अन्यथा साठलेले पाणी जमिनीच्या खालून वाहून जाईल.
  7. जेथे ओढ्याचा उतार कमीत कमी असेल अथवा पात्र जवळ जवळ सपाट असेल अशी जागा निवडावी म्हणजे जास्तीत जास्त पाणी साठते. दोन बंधार्यातील उतार ३ टक्के असावा.
  8. पाण्याच्या फुगवट्यामुळे कोणताही रस्ता, पूल, घर, अथवा शेत पाण्याखाली जाणार नाही अशी काळजी घेऊनच जागा निवडावी.

वनराई बंधार्याची जागा पक्की केल्यानंतर पावसाळ्याच्या अखेरी अखेरीस, जेव्हा ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाची गती कमी होते तेव्हा वनराई बंधारे बांधावेत. मध्य प्रदेशात केलेल्या प्रयोगानुसार बंधार्याची उंची जास्तीत जास्त २ मीटर पर्यंत ठेवता येते. बंधार्याची उंची आणि बंधार्याच्या माथ्याची रुंदी ठरविल्यास बंधाऱ्याच्या तळाची रुंदी ठरविता येते. बंधाऱ्याच्या बाजूंचा उतारही योग्य राहावा म्हणून तळापासून प्रत्येक थप्पीला प्रत्येक बाजूने ०.२५ मीटर (अंदाजे १० इंच) रुंदी कमी करीत जावे. महाराष्ट्रात बहुतेक करून २ मीटर तळाची रुंदी, ०.६० मीटर माथ्याची रुंदी आणि १ मीटर उंचीने वनराई बंधारे उपयुक्त ठरतात.

वनराई बंधार्याकरिता आवश्यक साधनसामुग्री

सिमेंट / युरिया / खते इ. ची रिकामी पोती,

पोटी शिवण्यासाठी प्लास्टिकची सुतळी,

दाभण, रेती, माती इ.

 

माहिती लेखन : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate