অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनराई बंधारे प्राथमिक प्रयत्न

 

नागपूर जिल्हा

स्थानिक लोक प्रतिनिधींचा, गावातील सर्व लोकांचा व विशेषतः शाळेतील मुलांचा सहभाग घेऊन वनराई बंधारे बांधण्याचे काम एकाच वेळी नागपूर जिल्ह्यातील सर्व १३ तालुक्यांमध्ये श्रीमती अश्विनी भिडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आले. अनेक ठिकाणी प्रात्यक्षिक म्हणून तालुकास्तरीय अधिकार्यांनी श्रमदान करून बंधारे बांधले व ग्रामस्थांना प्रशिक्षण दिले.या प्रयत्नांना संपूर्ण जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि १ ऑक्टोबर २००१ ते २५ ऑक्टोबर २००१ या कालावधीत ३१० गावांमध्ये ४३५ बंधारे बांधण्यात आले. वनराई संस्थेने या बंधार्यांसाठी जवळ जवळ ८० हजार रिकामी सिमेंटची पोटी पुरवली. या पूर्ण झालेल्या बंधार्यामध्ये अंदाजे, ७५० घन मीटर पाणीसाठा अडविण्यात आला. त्याचा रबी हंगामातील पिकांना चांगला फायदा झाला. सिमेंट बंधार्याद्वारे हे पाणी अडविले असते तर त्याला रु.७० लक्ष एवढा खर्च आला असता प्रत्यक्षात तेच काम लोकसहभाग, स्वयंसेवी संस्थांची मदत आणि शासकीय विभागाने समन्वयाने केलेले काम यामुळे अवघ्या ३ लक्ष रुपयांत झाले. याचा परिणाम म्हणून बंधाऱ्याच्या आसपासच्या भागात पिण्याच्या पाण्याच्या व सिंचनाच्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे. सर्व सामान्य ग्रामस्थ याबाबत अत्यंत समाधानी असून असा उपाय प्रतिवर्षी करण्याची व स्वतःच्या गावात पडणारे पावसाचे पाणी गावातच अडविण्याचे त्यांनी ठरविले आहे.

 

वरंध, ता. महाड, जि. रायगड

वरंध गावातील गावकरी वनराईच्या सहाय्याने १९९५ सालापासून दरवर्षी गावातील २ ओढ्यांवर एकंदर १२ वनराई बंधारे बांधतात. सर्व साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरात बंधारे बांधतात. पहिल्या वर्षाच्या बंधाऱ्यातील पाणी देऊन ३० ते ४० एकर जमिनीतील भात शेती वाचवण्यात आली. बंधार्यांमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. आता अंदाजे ५० एकर क्षेत्रात उन्हाळी भुईमुग केला जातो. तसेच वांगी, टोमॅटो इ. नगदी पिके घेतली जातात. भुईमुगापासुन एकरी ८००० रु. उत्त्पन्न मिळते. म्हणजेच बंधार्यामुळे वाढलेल्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे गावाचे उत्पन्न ४,००,००० रुपयांनी प्रतिवर्षी वाढले आहे. ९६ साली ह्या गावातील वनराई बंधार्याची पाहणी श्री. श्रीकांत देशपांडे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रायगड यांनी केली. तसेच मा. श्री प्रभाकर मोरे जिल्ह्याचे पालक मंत्री यांनीही हे काम पहिले. दोघांनाही काम फारच आवडले. त्यापासून मिळणाऱ्या फायद्यांविषयी खात्री पटली आणि त्यांनी पुढाकार घेऊन रोजगार हमी योजने अंतर्गत १९९६ साली रायगड जिल्ह्यात एकंदर ९६८ वनराई बंधारे बांधून घेतले.

 

बेंडगा ता. निलंगा जि. लातूर

या गावामध्ये १९९८ साली एकाच नाल्यावर ८ बंधारे बांधण्यात आले. ह्या आठ बंधार्यांमुळे जे पाणी साठवण्यात आले त्याची लांबी जवळ जवळ ५ कि.मी. इतकी आहे. ह्या ह्या पाण्यामुळे जल क्रांतीच झाली. नाल्याच्या दोन्ही तीरांवर अंदाजे ६० एकरात खरीप हंगामात तुरीचे पिक घेण्यात आले. त्याला पाणी वनराई बंधार्यांमुळेच देता आले. तुरीचे पिक एकरी चार क्विंटल आले. म्हणजेच ६० एकरात २४० क्विंटल तूर झाली. २००० रु.क्विंटल ह्या भावाने तुरी पासून रु. ४,८०,००० चे उत्त्पन्न मिळाले.

भूतमुंगळी ता.निलंगा जि. लातूर

ह्या गावातील महिलांनी ४ वनराई बंधारे श्रमदानाने बांधले. ह्या चार वनराई बंधाऱ्यांच्या पाण्यावर १० एकर क्षेत्रात गव्हाचे पिक घेण्यात आले. गव्हाचे उत्पन्न एकरी १२ क्विंटल इतके मिळाले. दहा हजार रु. प्रति क्विंटल भाव धरला तरी गावाचे उत्पन्न १,२०,००० नी वाढले.

सिंगनाळा टा. निलंगा जि. लातूर

ह्या गावात तीन वनराई बंधारे बांधण्यात आले. विशेष म्हणजे गावातील सखुबाई नावाच्या एका ६० वर्षाच्या महिलेनेही श्रमदानात भाग घेतला. ह्याच महिलेने वनराई बंधाऱ्याच्या पाण्यावर २ एकर क्षेत्रात गव्हाचे पिक घेतले.

हिवरे ता. पुरंदर जि. पुणे

ह्या दुष्काळी भागातील गावात ६ वनराई बंधारे बांधण्यात आले. बंधार्यांमुळे विहिरीतील पाण्याची पातळी वाढली आणि गव्हाच्या पिकाला आवश्यक ते जास्तीचे पाणी देता आले. सलग दोन-तीन वर्षे बंधारे बांधल्यामुळे गावाला पाण्यासाठी टँकरची गरज भासली नाही.

परभणी

नगरपरिषद परभणीने पूर्णा नदीवर १९९७ साली एक मोठा वनराई बंधारा बांधला. हा बंधारा बांधण्यासाठी अंदाजे ३०,००० रिकामी पोटी लागली. १९९७ सालच्या दुष्काळात परभणी शहराला शेवटच्या पंधरा दिवस ह्याच वनराई बंधार्यातून पाणी पुरवण्यात आले.

झरी ता. निलंगा जि. लातूर

या गावात आठ वनराई बंधारे बांधण्यात आले. त्यात साठलेल्या पाण्यातून ४० एकर क्षेत्रातील गहू व उसाला पाणी पुरवण्यात आले. निलंगा पंचायत समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव टंकापुरे झरी गावचेच. ते मोठ्या अभिमानाने सांगतात की, पंचायत समितीच्या कार्यालयात रोज ३००-४०० लोक येतात. आमच्या गावात टँकर लावा अशी मागणी करतात. परंतु त्या ३००-४०० माणसात झरीचा एकही माणूस पाण्यासाठी आलेला दिसत नाही.

वनराई तर्फे तसेच इतर सहयोगी संस्थांतर्फे १८ जिल्ह्यात ६३ तालुक्यात २०२ गावात १९९४-९५ पासून वनराई बंधारे बांधण्यात आले. १९९६-९७ पर्यंत स्वयंसेवी संस्थाच मोठ्या प्रमाणावर हे काम करत होत्या त्यानंतर मात्र शासनाने रोजगार हमी योजनेत वनराई बंधारे बांधण्याच्या कामाचा समावेश केला. अद्यापपर्यंत वनराई संस्थेमार्फत वनराई बंधारे बांधण्यासाठी जवळ जवळ २० लाख रिकामी पोती पुरवण्यात आली आहेत.

 

माहिती लेखन : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate