অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नायगाव झाले टॅंकरमुक्त

जामखेड (जि. नगर) तालुक्‍यात डोंगरमाथ्यावर असलेल्या नायगाव गावामध्ये दर वर्षी मार्च महिन्यापासून पाण्याची टंचाई भासत होती, परंतु त्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गाळ उपसा, नालाबंडिंग, समतल चर अशी विविध कामे लोकसहभागातून झाली. त्यामुळे विहिरीच्या पाणीसाठ्यात सुमारे 12 टक्के वाढ झाली. दर वर्षी लागणारे पाण्याचे टॅंकरही यंदा बंद झाले असून, गावही हिरवेगार झाले आहे.

असे झाले नायगाव पाणीदार

  • गावातील विहिरीच्या पाणीसाठ्यात 10-12 टक्के वाढ
  • गावातील 200-225 हेक्‍टर क्षेत्र गाळामुळे झाले सुपीक
  • ऊस, चारा पिके, फळपिकांना उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध
  • गावात 20 ते 22 लाख रुपयांची कामे लोकसहभागातून
  • राजुरी गावाने घेतला नायगावाचा आदर्श
  • नायगाव झाले टॅंकरमुक्त गाव

 

नगर जिल्ह्यात डोंगरमाथ्यावर असलेल्या नायगाव गावात तीन वाड्या आहेत. जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची असल्याने दर वर्षी गावात गहू, बाजरी, ज्वारी, ऊस, मूग, उडीद अशी विविध पिके घेतली जात होती. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या गावाला पाण्याची चांगलीच अडचण भासत होती.

पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ -

नायगावची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. डोंगराळ भाग असल्याने एैन उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत. मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाई भासायची. पिण्याच्या पाण्यासाठी दर वर्षी महिलांना वणवण फिरावे लागत असे. फळबाग, उसासारखी पिकेही जळून जात होती. गावात पिण्याच्या पाण्यासाठी जूनअखेर तीन टॅंकरद्वारा पाणीपुरवठा सुरू राहत असे. काही वेळा पावसाळ्यातही टॅंकरने पाणी पुरवले जायचे. खरिपात वेळेवर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांना पिकेही घेता येत नव्हती. वर्षातून किमान आठ महिने पाण्यासाठी सामना करावा लागत असल्याचे चित्र होते.

पाण्यासाठी गाळउपशासाठी पुढाकार -

गेल्या वर्षी पिण्याच्या पाण्यावर मात करण्यासाठी गावाच्या हद्दीत असलेल्या नायगाव तलावातील गाळाचा उपसा करण्याचे ठरवले. बघता बघता गावातील अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. तलावातील सुमारे एक लाख 16 हजार ब्रास एवढा गाळ काढला. सुमारे 22 लाख रुपयांच्या खर्चातून नालाबंडिंग, दगडी बांध, सलग समतल चर अशी विविध कामे लोकसहभागातून झाली.

पावसाळ्यात पाण्याचा मोठा साठा -

 


कामांचे दृश्‍य परिणाम समोर येऊ लागले. पावसाळ्यात पाऊस झाल्यामुळे तलावात, विहिरींना मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना खरिपाशिवाय अन्य हंगामही साधता येऊ लागले. कांदा, गहू, भुईमूग, चारा पिके, ऊस, ज्वारी, बाजरी, अशी पिकांची विविधता वाढवली आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न सुटला. भर उन्हाळ्यात गाव विविध पिकांनी बहरले आहे. पाणीसाठ्यात सुमारे 12 टक्के, तर बागायती क्षेत्रात 20 टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली.

खरिपात 35 हेक्‍टरवर पेरणी


गेल्या वर्षी पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे नायगाव तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला. त्याचा परिणाम म्हणून परिसरातील विहिरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ऊस या पिकांची सुमारे 35 हेक्‍टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर 18 हेक्‍टरवर फळबाग उभी आहे. सध्या ही पिके चांगल्या वाढीच्या अवस्थेत आहे.

यंदा झाले टॅंकरमुक्त गाव -


गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात तलावातील गाळउपसा केल्यामुळे त्याचा लाभ यंदा दिसून आला. दर वर्षी मार्चपासून पाणीटंचाई भासत असलेल्या नायगावात यंदा जूनअखेरपर्यंत पाणी तळ्यात उपलब्ध झाले आहे. त्याचा कालावधी किमान दोन महिन्यांनी वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाळ्यात एकाही टॅंकरची मागणी केली नाही. यंदा नायगाव टॅंकरमुक्त गाव झाले आहे.

गाळामुळे क्षेत्र झाले सुपीक -


पाणीटंचाईमुळे गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तलावातील गाळउपसा केला. तो गाळ शेतकऱ्यांनी सुमारे 200-225 हेक्‍टर क्षेत्रावर वापरला. हे क्षेत्र आता सुपीक होणार आहे.

नायगावचा आदर्श घेतला राजुरी गावाने-


गेल्या वर्षी नायगावात झालेल्या लोकसहभागातील विविध कामांच्या परिणामांमुळे पाणीटंचाईची समस्या कमी झाल्याचे अनुभवास आले. त्यामुळे यंदा कृषी विभाग व लोकसहभाग यांच्या एकत्रीकरणातून राजुरी गावातही सुमारे 568 हेक्‍टरवर "कंपार्टमेट बंडिंग'चे काम पूूर्ण झाले आहे. सुमारे 31 लाख 48 हजार रुपये खर्चाची कामे करण्यात आली. त्याचा सुमारे 436 शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. आगामी काळातही "नालाबंडिंग'ची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतले जाणार आहेत, असे मल्हारी गायकवाड, मुकंदा कोल्हे या शेतकऱ्यांनी सांगितले.

नायगावकरांना दररोज पाणीपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राधिकरण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 2002-03 मध्ये सुमारे तीन कोटी 20 लाख खर्च करून पाणीपुरवठ्याची कामे केली. त्यानंतर 2003-04 मध्ये या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुरू केला. मात्र अवघ्या दोन महिन्यांतच या योजनेअंतर्गत पाणीपुरवठा बंद झाला. त्यानंतर अनेक वेळा "प्राधिकरण' विभागाशी संपर्क साधून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र विभागाने दुर्लक्ष करत गावाला कायमचाच पाणीपुरवठा बंद केला.


""दर वर्षी पाऊस झाल्यानंतर पावसाच्या पाण्याबरोबर माती वाहून जात होती. गावात "नालाबंडिंग'ची कामे झाली. आता शेतातून माती वाहून जाण्याचे थांबले असून, यंदा उडदाचे पीक घेता आले आहे.''
सर्जेराव शिंदे

""दोन वर्षांपूर्वी विहिरीला पाणी नव्हते. गेल्या वर्षी गावाजवळ असलेल्या तलावातील गाळउपसा केल्यामुळे मला यंदा चार ते पाच एकर ऊस घेता आला. विहिरीला अजूनही पाणी आहे.''
गहिनीनाथ उगले, शेतकरी.

""माझी पाच एकर हलकी ते मध्यम शेती आहे. मात्र दर वर्षी उन्हाळी हंगामात पिके जळून जात होती. परंतु गेल्या वर्षी तलावातील एक हजार 550 ब्रास गाळ शेतात टाकला. त्यात उडीद, ज्वारीसारखी पिके घेतली.
योगेश शिंदे

""गावात दर वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात टॅंकर सुरू ठेवावे लागत होते. मात्र गेल्या वर्षी गाळउपशासारखी विविध कामे हाती घेतल्यामुळे पाणीसाठ्यात 10-12 टक्के वाढ झाली.''
परशुराम पवार - 9420634513
सरपंच, नायगाव, ता. जामखेड, जि. नगर,

""पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गाळउपसा केला. आगामी काळात पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी गाळउपशाची आणखी कामे हाती घेतली जाणार आहेत.''
सुरेश उगले - 9404565195
अध्यक्ष, पाणलोट विकास समिती,

""लोकसहभागातून झालेल्या कामांचा फायदा दिसत आहे. यंदाच्या खरिपात 35 हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.''
डी. टी. सुपेकर, तालुका कृषी अधिकारी,
जामखेड
---------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन ८ जुलै २०१४

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate