অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समृद्धीचा मार्ग जलयुक्त शिवार

समृद्धीचा मार्ग जलयुक्त शिवार

महाराष्ट्र राज्याच्या बऱ्याचशा भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तसेच पावसाळ्याचे चार महिने सोडले तर राज्यात उन्हाळ्यात होणारा किरकोळ पाऊस सोडल्यास पावसाचा एक थेंबही पडत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या चार महिन्यात होणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी साठवणे आणि त्याचा वर्षभर पुरेल अशा पद्धतीने वापर करणे महत्वाचे होते. याच हेतून महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान योजनेचा शुभारंभ केला.

आतापर्यंतच्या अनुभवाने मोठी ठरणे ही आर्थिकदृष्टया खर्चिक तसेच उपयुक्ततेचा विचार करता परवडणारी नसल्याचे सिद्ध झाले आहे. आतापर्यंत अनेक मोठी धरणे बांधण्यात आली, पण, त्यातून निर्माण होणारी सिंचनाची क्षमता मर्यादित होती. तसेच मोठ्या जलाशयांमुळे मोठ्या प्रमाणावर जमीन पाण्याखाली जाते, सोबतच विस्थापितांचा प्रश्नही मोठा असतो. या सर्वांमुळे या कामांना वेळ लागून त्याचे आर्थिक गणित बिघडते. त्यामुळेच गावाच्या शिवारात पाण्याचा साठा करणे, गावातील नद्या, नाले व नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत यांचे पुनरुज्‍जीवन करणे ही काळाची गरज होती. छोटे छोटे बंधारे बांधणे, नद्या व नाल्यांचे पात्र रुंद आणि खोल करणे, नैसर्गिक झरे वाचवणे या सर्व एकत्रित उद्देशाने जलयुक्त शिवार ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. तसेच ही योजना लहान अकाराची आणि कमी खर्चाची असल्यामुळे, विस्थापितांचा कोणताही प्रश्न नसल्यामुळे राबविणे सोपे झाले. परिणामी राज्यात या जलयुक्त शिवार योजनेला मोठे यश मिळाले.

कोकणातही जलयुक्त शिवार योजना ही कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरली आहे. कोकणातही वर्षातले चार महिने भरपूर पाऊस पडतो. पण, सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर पडणारे हे पावसाचे पाणी जवळच असलेल्या अरबी समुद्रामध्ये वाहून जाते. हे पाणी साठवण्यासाठी कोकणासारखी भौगोलित रचना असलेल्या प्रदेशात मोठी धरणे बांधणे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे गेली अनेक वर्षे हे पाणी वाया जात होते. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून साकारलेली जलयुक्त शिवार योजना कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा मुळात डोंगरांनी व्यापलेला जिल्हा, तसेच पुर्वेकडच्या उंच पर्वतरांगावर पडणारे पावसाचे पाणी लगेचच जवळच्या समुद्रात वाहून जाते. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पारंपारिक भात शेतीपुरतेच पाणी उपलब्ध होते. तसेच रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाणी उपलब्ध होण्यावर मर्यादा येतात. सध्याच्या काळात फक्त पारंपारिक भात शेती किफायतशिर होत नाही. त्यामुळे रब्बी व उन्हाळी शेती ही महत्वाची आहे. ऑक्टोबर ते मे दरम्यानच्या काळात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता महत्वाची आहे. अशा पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने जलयुक्त शिवार अभियान हे सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.

निसर्ग संपन्न अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये साधारण तीन ते चार हजार मि.मी. पावसाची नोंद होते. हे पाणी अडवण्याच्या दृष्टीने सन 2015-16 साली जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 35 गावांची निवड करण्यात आली. तसेच 597 कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी 494 कामे पूर्ण झाली. जलयुक्त शिवारच्या कामांमुळे निर्माण झालेल्या 1 हजार 962 टीएमसी पाणी साठ्यामुळे जिल्ह्यातील 831 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत झाली. निवडण्यात आलेली 35 गावं, देवगड तालुक्यातील हडपीड, वाघिवरे, शिरवली, कोटकामते व कुळवे. वैभववाडी तालुक्यातील नाधवडे, कणकवली तालुक्यातील हरकूळ खुर्द, करंजे, कोळशी, ओझरम, नागसावंतवाडी यांचा समावेश आहे. मालवण तालुक्यातील कुणकवळे, चुनवरेस, चिंदर, कर्लाचा व्हाळ. कुडाळ तालुक्यातील तुळसूली तर्फ माणगाव, हिर्लोक, आंदुर्ले, शिवापूर, भडगाव, गोठोस, आवळेगाव. वेंगुर्ले तालुक्यातील कोचरा, आरवली आणि सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली, केसरी, भालावल, वावळाट, निरवडे, तांबोळी. तर दोडामार्ग तालुक्यातील तळटक, फुकेरी, पाळ्ये, कुंभवडे, कोंडये या गावांचा समावेश आहे. या अभियानाअंतर्गत 46.64 हेक्टर क्षेत्रावर सलग समपातळी चर, 96 माती नाला बांध, 17 सिमेंट नाला बंधाऱ्यातील गाळ काढणे, तीन ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर बांधण्यात आली. 27 ठिकाणी अर्दन स्ट्रक्चर, 30 ठिकाणी लूज बोल्डर स्ट्रक्चर, 5 माती नाला बांधाची दुरुस्ती करण्यात आली. 24 ठिकाणी शेततळी, 72 सारवळी सिमेंट नाला बांध, 5 सिमेंट बंधारा दुरुस्ती, 22.33 हेक्टर मजगीकरण, 26 वळण बंधारे आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

यंदाच्या वर्षी म्हणजेच सन 2016-17 साठी या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील 23 गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये देवगड तालुका - वळवंडी, शेवरे. वैभववाडी तालुका - तिरवेड तर्फ खारेपाटण, उबंर्डे, कणकवली तालुक्यातील वारगांव, कसवण तळवडे, धारेश्वर कासार्डे. मालवण तालुक्यातील वायंगणी, वराड़, पोईप, मसुरे. कुडाळ तालुका - किनळोस, बांबुळी, केरवडे कर्याद नारुर, साळगाव. वेंगुर्ले तालुक्यातील रावदस-कुशेवाडा, पेंडूर. सावंतवाडी तालुक्यातील मळगांव, गेळे, नेमळे, माजगांव व दोडामार्ग तालुक्यातील माटणे व वझरे या गावांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये 272 कामे प्रस्तावीत आहेत. त्यापैकी 206 कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये 4 हेक्टर क्षेत्रावर समतल चर खोदण्यात आली आहे. 14 माती नाल बांध पूर्ण झाले आहेत. दोन ठिकाणी अर्दन स्ट्रक्चर, लूज बोल्डर स्ट्रक्चर 7, शेततळे 22, साखळी सिमेंट बंधारे 26, सिमेंट बंधारा दुरुस्ती 1, नाला खोली करण व सरळीकरण 6, पाझर, साठवण तलाव दुरुस्ती 2, केटी वेअर 2, केटी वेअर दुरुस्ती 9 कामे पूर्ण झाली आहेत. तर 6 ठिकाणी गाळ काढण्यात आलेला आहे. 45 ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आहे. वळण बंधाऱ्यांची 11, वळण बंधारा दुरुस्ती 17, नाला, बांधातील व तलावातील गाळ काढणे 11, सिमेंट नाला बांध गाळ काढण्याची कामे 2 ठिकणी झाली आहेत. तर 2 ठिकाणी शेतपाट बांधण्यात आले असून 19 सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आलेली गावे आजघडीला जलयुक्त झाली आहेत. तसेच या गावकऱ्यांना या अभियानाचा चांगला फायदा झाल्याचे पहावयास मिळते. सध्या जलयुक्त शिवार या अभियानाला जिल्ह्यात लोकचळवळीचे स्वरुप येताना दिसत आहे. त्याचेच प्राथमिक उदाहरण म्हणून पेंडूर, कुणकवळे, कुवळे या गावांचा उल्लेख करता येईल. पेंडूर या ठिकाणी लोकसहभागातून भंगसाळ नदीतील 78 लाख रुपये गाळ काढण्यात आला. तर कुणकवळे गावासाठी या अभियाना अंतर्गत बांधण्यात आलेला मातीचा बांध गावासाठी वरदान ठरत आहे. कुणकवळे पंचक्रोशीत केवळ विहिरी उपलब्ध होत्या. अन्य कोणताही पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नव्हता. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे फक्त भात शेती हेच तेथील लोकांचे उपजिवीकेचे साधन होते. कृषी विभागाने हा बांध बांधल्यानंतर आसपासच्या विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली. तसेच विहिरीतील पाणी पातळी उन्हाळ्यात स्थिर राहिल्यामुळे शेतकऱ्यांना भाज्यांचे उत्पादन घेणे सोयीचे झाले. रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी काजू लागवड केली. 2014-15 मध्ये पावसाने ओढ दिली असताना शेतकऱ्यांनी बाजूच्या बांधातील पाणी वापरून त्यांची शेती टिकवली. तर कुवळे गावातही हे अभियान वरदान ठरले आहे. हा भाग मुख्यतः भात व नागली पिकवण्यासाठी ओळखला जातो. तसेच या भागात आंब्याचेही उत्पादन होते. हे गाव सह्याद्रीच्या डोंगरात वसलेले आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात या गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. त्यामुळे गावात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचे ग्रामसभेने एकमुखाने मंजूर केले. त्या अंतर्गत गावामध्ये 5 सिमेंट नाला बांध, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत सिमेंट नाला बांध 8, वळण बंधारा 1, सलग समतल चर 65.08, माती नाला बांध - 3, घळी बांध 200 अशी कामे झाली आहेत. अशा पद्धतीने पावसाचे पाणी माथा ते पायथा अडवून व भूगर्भात जिरवून पाण्याची साठवणूक केल्याने नदी, नाले व विहिरींची पाणी पातळी वाढली. तसेच वळण बंधाऱ्यामुळे नाल्याचे पाणी वळवून पाटाद्वारे शेत जमिनीस देणे शक्य झाल्यामुळे खरिपात पडणाऱ्या पावसाच्या खंडामुळे उत्पन्नात येणारी तूट कमी करण्यात मदत झाली.

एकूणच जलयुक्त शिवार अभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गावांमध्ये समृद्धी आलेली आहे. हे अभियान लोकचळवळीचे स्वरुप घेताना दिसतो आहे. अनेक गावांमध्ये असणारी पाण्याची समस्या या अभियनामुळे संपली आहे. त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब अडवून शाश्वत शेतीसाठी त्याचा वापर करण्यात मदत होत आहे. त्यादृष्टीने जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांसाठी मोठे वरदानच म्हणावे लागेल.

लेखक - हेमंतकुमार चव्हाण

माहिती सहाय्यक, जि.मा.का. सिंधुदुर्ग

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate