অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साखळी बंधारे दुष्काळात वरदान

काही वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मंगळवेढा (जि. सोलापूर) तालुक्‍यातील सलगर बुद्रुक येथील दोन ओढ्यांवर साखळी पद्धतीचे सिमेंट बंधारे बांधले आहेत. त्यामुळे ऐन दुष्काळात गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला आहे. बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे विहिरींची पाणीपातळी टिकून आहे. अनेक शेतकऱ्यांना विविध पिकांमधून दुष्काळात चांगले उत्पन्न घेणे शक्‍य झाले आहे.
भारत नागणे

मंगळवेढा तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळजन्य स्थिती आहे. तालुक्‍यातील जत आणि कर्नाटक हद्दीजवळील 35 गावांना तर दुष्काळ पाचवीला पुजला आहे. केवळ शेतीसाठी नव्हे तर पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून पाण्याची मागणी करीत आहेत. या 35 गावांपैकीच सलगर बुद्रुक या गावात राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दोन ओढ्यांवर प्रत्येकी पाच असे दहा साखळी सिमेंट बंधारे बंधाऱ्याचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले. त्यानंतर थोड्याफार झालेल्या पावसाच्या पाण्यामुळे या बंधाऱ्यांत सुमारे 10 कोटी 70 लाख लिटर पाणीसाठा झाला.

त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न तूर्तास मिटला. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2012 पासूनच गावकऱ्यांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला होता. या वर्षी मार्च संपत आला तरी सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर व विंधनविहिरीची पाणीपातळी टिकून असल्याचे गावचे सरपंच निलाप्पा बाबूराव बिराजदार म्हणाले. जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांनी साखळी बंधाऱ्याची पाहणी करून शेतकऱ्यांना झालेल्या फायद्याबद्दल व विहिरींमधील पाणीसाठा पाहून समाधान व्यक्त केले आहे. सध्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे. पाणीपातळी 500 फुटांपर्यंत खोल गेली आहे. सध्या उन्हाळी पिकांची काढणी सुरू आहे. यापुढच्या काळात पाणी टिकून राहील की नाही याची शाश्‍वती नसल्याने शेतकऱ्यांनी पुढील पिके घेणे थांबवले आहे.

पाणीपातळी वाढल्यामुळे घेतली उन्हाळी पिके


साखळी बंधाऱ्यातील पाण्याचा परिसरातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. गावच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांच्या विहिरी व विंधनविहिरींची पाणीपातळी ऐन दुष्काळातही टिकून आहे. शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी तसेच मका, भुईमूग यांसारखी उन्हाळी पिके घेतली. डाळिंब, आंबा आदी फळबागाही जिवंत राहिल्या आहेत.


शंभर एकर क्षेत्र ओलिताखाली


तीन वर्षांपासून सततच्या कमी पावसामुळे उन्हाळी पिके घेणे अशक्‍य झाले होते. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. चारा विकत घ्यावा लागे. बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे सलगर येथील बंधाऱ्याकाठचे सुमारे शंभर एकर क्षेत्र ओलिताखाली आले. जनावरांना चाराही उपलब्ध झाला.


30 एकर डाळिंब बागांना जीवनदान


भागातील अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब बागाही पाण्यामुळे चांगल्याच बहरल्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग कांबळे म्हणाले, की गेल्या जानेवारी- फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. या वर्षी विहीर व बोअरची पाणीपातळी वाढल्यामुळे प्रत्येकी चार एकरावर ऊस व डाळिंब घेतले आहे. चारा पीकही घेतले आहे.


जनावरांचीही भागवली जाते तहान


शिवारात चारा-पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या शेळ्या-मेंढ्या व अन्य जनावरांनाही बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग होत आहे. पिकांबरोबर जनावरांची तहानही भागवली जात आहे.

साखळी बंधाऱ्यामुळे माझी पाच एकर शेती बागायती झाली. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई असते. या वर्षी अद्यापही विहिरींमध्ये पाणी असल्याने उन्हाळ्यातील पिके घेतली आहेत. या वर्षी दीड एकर क्षेत्रावर मका व अडीच एकरांवर डाळिंब आहे. दीड एकरांत मक्‍याचे 60 क्विंटल उत्पादन मिळाले. त्यापासून सुमारे 75 हजार रुपयांचे व दीड ते दोन टन डाळिंब उत्पादनातून 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. सध्या विहिरीची पाणीपातळी खोल गेल्यामुळे विहिरींना पाणी नाही. बोअरला पाणी आहे. त्या पाण्यावरच डाळिंब बाग जगविण्याची धडपड सुरू आहे.


गुंडीबा तुकाराम बनसोड, शेतकरी, सलगर


बिरप्पा धोंडीबा बनसोडे हे सलगर येथील युवा शेतकरी कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून शेती चांगल्या प्रकारे करीत आहेत. ते म्हणाले, की दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके जळून जातात. बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. उपलब्ध पाण्यात दोन एकर मका, दोन एकर ज्वारीसह दोन एकर डाळिंब व एक एकर आंबा आहे. गेल्या वर्षीपेक्षा अधिक पाणी असल्याने उन्हाळी पिकेही घेतली आहेत. मक्‍याची नुकतीच मळणी करण्यात आली. प्रति एकर 23 क्विंटल उत्पादन मिळाले. ऐन दुष्काळात 45 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. डाळिंबाची काढणी सुरू आहे. आतापर्यंत पाच टन डाळिंबाची विक्री करण्यात आली. त्यापासून एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

दुष्काळी सलगर येथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत गेल्या वर्षी दहा साखळी बंधारे बांधले. यात तीस मीटर लांबी व दीड मीटर रुंदीचे तीन बंधारे आहेत. यातील प्रत्येक बंधाऱ्याची पाणी साठवणक्षमता नऊ टीएमसी आहे. चार बंधारे 25 मीटर लांबीचे, दोन बंधारे 45 मीटर रुंद तर एक बंधारा 20 मीटर रुंदीचा आहे. या दहा बंधाऱ्याची एकूण पाणी साठवणक्षमता 107 टीएमसी आहे. यासाठी सुमारे 59 लाख 54 हजार रुपये खर्च झाला. पावसाळ्यात ओढ्यातून वाहून जाणारे पाणी या बंधाऱ्यात अडवल्यामुळे भागातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात चांगला फायदा झाला आहे. गेल्या वर्षी जानेवारीपासून येथे पाण्याचे टॅंकर सुरू करण्यात आले होते. या वर्षी विहिरींची पाणीपातळी टिकून असल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न काही अंशी सुटण्यास मदत झाली आहे.
जी. एन. ताटे, तालुका कृषी अधिकारी, मंगळवेढा

मला दीड एकरातून मक्‍याचे 50 क्विंटल उत्पादन व 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या वर्षी दोन एकरांवर नवीन डाळिंब लागवड आहे. बंधाऱ्यामुळे मार्चअखेरपर्यंत विहिरी व बोअरला चांगले पाणी होते. सध्या विहिरींना पाणी नाही. मात्र सहाशे ते सातशे फुटापर्यंत असलेल्या बोअरला पाणी सध्याही उपलब्ध आहे. बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात फायदा झाला आहे.
पांडुरंग कांबळे

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate