অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना

'शेतकरी आठवडी बाजार' संकल्पना

प्रस्तावना

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करता यावा याकरिता पुणे शहरामध्ये शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना सुरु केली असुन याअंतर्गत पुणे व पिंपरी शहरांमध्ये एकुण 10 ते 12 शेतकरी आठवडी बाजार व राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 40 शेतकरी आठवडी बाजार पहिल्या टप्प्यामध्ये सुरु करण्याचे नियोजन केले आहे.

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सन 2006 मध्ये सुधारणा करुन त्यामध्ये खाजगी बाजार, थेट पणन, शेतकरी ग्राहक बाजार व कंत्राटी शेती, इ. पर्याय उपलब्ध करुन शेतकऱ्याला आपला कृषि माल विकण्यासाठीचे विविध पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. याअंतर्गत राज्यामध्ये खाजगी बाजार व थेट पणन यांचे मोठया प्रमाणात परवाने देण्यात आले आहेत.तथापि, शेतकरी ग्राहक बाजार या कायद्यातील तरतुदीअंतर्गत अद्याप राज्यामध्ये एकही शेतकरी ग्राहक बाजार सुरु करण्यात आलेला नाही.महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 5 (ड) मध्ये थेट पणन, खाजगी बाजार व शेतकरी ग्राहक बाजार यांची स्थापना करण्याची तरतुद आहे. शेतकरी ग्राहक बाजाराच्या परवान्यासाठी राज्याचे पणन संचालक यांच्याकडी विहित नमुन्यात अर्ज करुन परवानगी घेऊन सदरचे बाजार सुरु करण्याची अधिनियमामध्ये तरतुद आहे. तसेच महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) नियम 1967 मधील नियम 4 (ड) मध्ये शेतकरी ग्राहक बाजाराची स्थापना करण्यासाठी परवाना घेण्याकरिता काही अटी व शर्ती निश्चित केल्या आहेत.

अटी व शर्ती

  1. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार क्षेत्राच्या आत शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करता न येणे
  2. शेतकरी ग्राहक बाजार पूर्ण मालकी हक्क असलेल्या किंवा कमीत कमी 30 वर्षांच्या कालावधीकरिता निर्विवाद ताबा धारण करण्यासाठी भाडेपट्टा कराराअन्वये भाडेपट्ट्याने घेतलेल्या किमान एक एकर एवढया जमिनीवर स्थापन करता येईल.
  3. अर्जदाराची जमीन किंवा शहरी एकुण गुंतवणुक 10/- लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतकी गुंतवणुक करुन लिलावगृह, निवारा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृह, अंतर्गत रस्ते, इ. पायाभूत सुविधा निर्माण करता येतील.
  4. शेतकरी ग्राहक बाजाराची स्थापना करण्यासाठी परवाना फी रु.10,000/- एवढी असेल.
  5. शेतकरी ग्राहक बाजार स्थापन करण्याच्या परवान्यासाठी अर्ज करताना रु.1/- लाख एवढया किंमतीची बँक हमी मा.संचालक, पणन यांच्याकडे जमा करणे.
  6. शेतकरी ग्राहक बाजारात शेतकऱ्यास एका ग्राहकाला 10 किलोग्रॅमपेक्षा अधिक फळे किंवा भाजीपाला किंवा अन्य नाशवंत कृषि उत्पन्न आणि 50 किलोग्रॅमपेक्षा अधिक अन्नधान्ये किंवा अनाशिवंत कृषि उत्पन्न विकण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
  7. शेतकरी ग्राहक बाजारातील खरेदीवर नियम 4 (ह) नुसार बाजार फी आकारण्याची तरतुद आहे. तसेच नियम 4 (आय) नुसार सदर बाजार मालकाने शासनाकडे देखरेख शुल्क भरण्याची तरतुद आहे.
  8. शेतकरी ग्राह्क बाजारात परवानाधारक लिलावगृह, छपऱ्या, गोदाम, शीतगृह, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, इ. साठी मुलभूत पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करता येईल, इ. तरतुदी या कायद्यामध्ये व नियमांमध्ये आहेत.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मालाला अधिकाधिक दर मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील असुन शेतकऱ्यांमध्ये व्यावसायिकता आणण्यासाठी शेतकरी गट, शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन करण्यासाठी शासन विशेष प्रयत्न करित आहे. या अंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे 550 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या असुन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात गट कार्यरत आहेत.सदर गट/ कंपन्या शेतकऱ्यांना उत्पादनाबाबत मार्गदर्शन, आवश्यक निविष्ठांचा पुरवठा आणि उत्पादित कृषि मालाचे विक्री व्यवस्थापन याबाबत कार्यरत आहेत. या गट/कंपन्यांना थेट ग्राहकांना कृषि मालाच्या विक्रीच्या संधी उपलब्ध करुन दिल्यास मध्यस्थांना मिळणारी रक्कम शेतकऱ्यांना मिळेल, शेतमाल विक्री खर्च कमी होईल तसेच शेतमालाची हाताळणी कमी होऊन कृषि मालाचे काढणीपश्चात होणारे नुकसान कमी होईल. तसेच वाहतुक खर्चात मोठया प्रमाणात बचत होईल.

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा योजना राज्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या 4 शहरांमध्ये राबविण्यात येत आहे.यापैकी मुंबई, पुणे व नागपूर या तीन शहरांसाठी सदर योजनेच्या अंमलबजावणीचे काम हे महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडे असुन औरंगाबादसाठीचे कामकाज हे कृषि विभागाकडे आहे. शहरी भागासाठी भाजीपाला पुरवठा योजनेअंतर्गत संकलन व प्रतवारी केंद्रांची उभारणी करणे, मोटराईज्ड वेंडींग कार्ट, वातावरण नियंत्रीत विक्री केंद्र, स्थायी/फिरते विक्री केंद्र या चार घटकाअंतर्गत अनुदान देण्याची तरतुद आहे. या योजनेअंतर्गत स्थायी/फिरते विक्री केंद्र व वातावरण नियंत्रीत विक्री केंद्र या घटकाअंतर्गत मर्यादित स्वरुपातील प्रतिसाद या योजनेस मिळालेला आहे. मोटराईज्ड वेंडींग कार्ट या घटकासाठी पुणे शहरामध्ये मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला व या वाहनांद्वारे सहकारी गृहरचना संस्था तसेच हौसिंग कॉंम्प्लेक्स या ठिकाणी भाजीपाल्याची विक्री थेट ग्राहकांना करण्यात येत आहे. तथापि, या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद तसेच भाजीपाला शिल्लक राहण्याबाबत शेतकऱ्यांकडुन अडचणी विषद करण्यात येत आहेत. कृषि पणन मंडळाने सदर योजनेची अंमलबजावणी सुरु केल्यानंतर शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना भाजीपाला विक्री करता यावा, याकरिता पुणे शहरामध्ये दि.29 जुन 2014 रोजी गांधी भवन, कोथरुड या ठिकाणी पहिला शेतकरी आठवडी बाजार सुरु केला. शेतकरी आठवडी बाजाराचे स्वरुप हे आठवडयातुन एकाच वारी व साधारणपणे 3 ते 4 तासांकरिता शेतकऱ्यांनी आपला माल आणुन थेट ग्राहकांना विक्री करावा, अशा प्रकारची अत्यंत मर्यादित सुविधा उपलब्ध करुन देणे, अशा स्वरुपाची असुन जागेचे भाडे, टेबल, खुर्च्या, साफसफाई, बाजार व्यवस्थापन, इ. साठी शेतकऱ्यांकडुन नाममात्र शुल्क घेऊन शेतकऱ्यांना या शेतकरी आठवडी बाजारामध्ये थेट विक्री सुविधा दिली जाते. सदर उपक्रमास पुणे शहरामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असुन आतापर्यंत सात शेतकरी आठवडी बाजार वेगवेगळया वारी, वेगवेगळया ठिकाणी नियमीतपणे सुरु आहेत. तसेच या शेतकरी आठवडी बाजाराच्या आयोजनासाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडुन जागा मिळवुन पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये एकुण 10 ते 12 शेतकरी आठवडी बाजार सुरु करण्याचे तसेच राज्यामध्ये एकुण 50 शेतकरी आठवडी बाजार सुरु करण्याचा कृषि पणन मंडळाचा मानस आहे. तथापि, कायद्याच्या दृष्टीकोनातुन विचार करता अशा प्रकारचे बाजार हे फक्त कृषि पणन मंडळामार्फत आयोजीत होवू शकतात.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाची स्थापना ही महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील कलम 39 (अ) नुसार झालेली असुन कलम 39 (जे) अंतर्गत कृषि पणन मंडळाची कर्तव्ये व अधिकार आहेत, त्यामध्ये
1) कृषि विषयक खरेदी विक्रीसंबंधात सर्वसाधारण हिताच्या असतील अशा गोष्टी करणे.
2) कृषि उत्पन्नाच्या खरेदी विक्रीच्या विकासाच्या बाबतीत कार्यसत्रे, चर्चासत्रे, प्रदर्शने यांचे आयोजन करणे किंवा त्याची व्यवस्था ठेवणे.

या बाबींची तरतुद आहे.त्यानुसार कृषि पणन मंडळ शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादकांच्या सहकारी संस्था यांच्या मदतीने शेतकरी आठवडे बाजार आयोजीत करित आहे.तसेच या बाबतची सर्वसाधारण नियमावली कृषि पणन मंडळाने तयार केली आहे.

कृषि पणन मंडळातर्फे आयोजीत करण्यात येत असलेल्या शेतकरी आठवडे बाजारांना कायदेशीर संरक्षण मिळावे तसेच त्यांचे कायदेशीररित्या आयोजन करणे, त्याचबरोबर आयोजकांना अशा बाजाराच्या आयोजनासाठी कायदेशीर संरक्षण आणि अधिकार/परवानगी असणे, या बाबी आवश्यक आहेत. शेतकरी आठवडे बाजारामध्ये शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विना मध्यस्थ विकता येतो.तसेच यामध्ये शेतकऱ्यांना येणारा शेतमाल विक्री खर्च अत्यंत माफक स्वरुपाचा आहे.शेतकरी आठवडी बाजार हे शेतकऱ्यांकरिता अत्यंत फायदेशीर ठरत आहेत. तसेच ग्राहकांनाही इलेक्ट्रॉनिक वजन काटयांवर मोजमाप केले जाऊन उच्च दर्जाचा माल हा माफक दरामध्ये उपलब्ध होत असल्याकारणाने ग्राहकांचाही या बाजारांना खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांना आपल्या मालाला जास्तीत जास्त बाजारभाव मिळवुन देण्यासाठी सदर शेतकरी आठवडे बाजार हे यशस्वी होत आहेत.सदर संकल्पना राज्यामध्ये विविध शहरांमध्ये राबविणे हे शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या फायद्याच्या दृष्टीकोनातुन अत्यंत महत्वाचे आहे.सदर बाबींचा विचार करुन शेतकरी आठवडे बाजारांना आवश्यक कायदेशीर संरक्षण देणे गरजेचे वाटते. कृषि पणन मंडळाने सद्यस्थितीत शेतकरी आठवडे बाजारांकरिता तयार केलेली शेतकरी आठवडी बाजाराची संकल्पना, शेतकरी आठवडे बाजाराचे शेतकरी आणि ग्राहकांना फायदे, शेतकरी आठवडे बाजारासाठी कृषि पणन मंडळातर्फे सुरु करण्यात येत असलेले उपक्रम, शेतकरी आठवडी बाजारासाठी नियमावली यामध्ये आयोजकांसाठी नियम/शर्ती/अटी आणि शेतकरी/शेतकरी गट/ शेतकरी उत्पादक कंपनी/उत्पादक सहकारी संस्था यांचेसाठी नियमावली (जबाबदारी) याबाबतचा तपशील खालील प्रमाणे.

शेतकरी आठवडी बाजार संकल्पना

  • शेतकरी तसेच ग्रामिण महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या मालाला थेट बाजार पेठ उपलब्ध करून देणे
  • सर्व प्रकारचा भाजीपाला एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करून देणे
  • शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि उत्पादक सहकारी संस्था यांचा शेतमाल त्यांनी पुरस्कृत केलेल्या गटांमार्फत/ प्रतिनिधींमार्फत विक्री
  • मध्यस्थ नसल्यामुळे ग्राहक अदा करीत असलेली रक्कम थेट शेतकऱ्यांस उपलब्ध
  • मालाची हाताळणी कमी होत असल्याकारणाने सुगीपश्चात नुकसान कमी तसेच मालाचा दर्जा उत्तम राहतो
  • शेतकरी आठवडे बाजाराची वेळ व ठिकाण निश्चित असल्याकारणाने शेतमाल काढणीचे आणि विक्रीचे नियोजन करणे शेतकऱ्यांना शक्य
  • इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत शेतमालाचे वजन. त्यामुळे ग्राहकांमध्ये वजनाबाबत विश्वास निर्माण करणे
  • बाजार पेठेचा अंदाज येत असल्याने बाजारात आणावयाच्या मालाबाबत नियोजन करणे शक्य
  • शंभर टक्के रोखीने व्यवहार • कोणत्याही प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता नाही
  • ग्रामिण भागातील युवकांना चांगल्या अर्थार्जनाचा रोजगार उपलब्ध
  • वाजवी भावामध्ये ग्राहकांना भाजीपाला उपलब्ध

शेतकरी आठवडी बाजाराचे फायदे

शेतकरी

  • शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांचेमार्फत थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची संधी
  • कृषि माल शेतातून थेट बाजारात येत असल्याकारणाने काढणी नंतरच्या होणाऱ्या नुकसानीत मोठी घट
  • रोख स्वरूपात 100 टक्के मालाची रक्कम थेट शेतकऱ्याच्या हातात
  • आपल्या मालाचा बाजार भाव ठरविण्याचा शेतकऱ्याला अधिकार
  • अत्यंत कमी शेतमाल विक्री खर्च
  • ग्राहक आणि शेतकरी यांच्यामध्ये सामंजस्य निर्माण होते
  • ग्राहकांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा
  • थेट विक्रीमुळे मध्यस्थांना मिळणारी रक्कम थेट शेतकऱ्याला प्राप्त
  • बाजारात विक्री होणाऱ्या मालाचा अंदाज आल्याने भाजीपाला शिल्लक रहात नाही.

ग्राहक

  • ताजा स्वच्छ शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध
  • शेतकरी विक्री करीत असल्याकारणाने मालाच्या प्रती बाबत खात्री
  • थेट शेतकऱ्यांशी संवाद होत असल्याकारणाने ग्राहक आपली गरज शेतकऱ्याला सांगू शकतात.
  • थेट शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदीचे ग्राहकांना समाधान
  • घराजवळ भाजीपाला बाजार पेठ उपलब्ध
  • भाजीपाला खरेदीचे आठवड्याचे नियोजन करता येते
  • एकाच छताखाली भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्य, दुध, डाळी, प्रक्रिया उत्पादने, ग्रामिण उत्पादने ग्राहकांना उपलब्ध
  • शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्यामार्फत होत असल्याने ग्राहकांना वजनाबाबत विश्वास


पुणे शहरामध्ये सुमारे 10 शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा कृषि पणन मंडळाचा मानस असून शेतकऱ्यांना प्रत्येक वारी वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आठवड्याच्या प्रत्येक वारी पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे.तसेच राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक शेतकरी आठवडी बाजार सुरू करण्याचा प्रयत्न कृषि पणन मंडळ करणार आहे.अशा प्रकारे राज्यात पहिल्या टप्यात सुमारे 50 शेतकरी आठवडी बाजार उभे राहतील अशी अपेक्षा आहे.

शेतकरी आठवडी बाजार सुरू करतांना प्रथमत: त्या भागाची पाहणी करण्यात येते. त्या भागामध्ये सद्यस्थितीत असलेला भाजीपाल्याचा व्यवसाय कशा पद्धतीने चालतो, परिसरात राहणाऱ्या लोकांना कोणत्या वारी आणि कोणत्या वेळी बाजार सोईचा ठरू शकतो इ. बाबी विचारात घेवून योग्य जागेची निवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जागा निवडीनंतर त्यासाठीच्या आवश्यक परवानग्या तसेच बाजाराचा वार आणि वेळ निश्चित झाल्यानंतर त्या परिसरातील लोकांशी वॉट्सॲप, एसएमएस मार्फत तसेच परिसरामध्ये फ्लेक्स लावून आणि वृत्तपत्रांमध्ये माहिती पत्रके टाकून लोकांपर्यंत शेतकरी बाजाराबाबतची माहिती पोहोचविण्यात येते. तसेच बाजाराच्या उद्घाटनाच्या दिवशी विविध वृत्तपत्रांमध्ये बाजाराबाबतच्या बातम्या छापून येतील यासाठी आवश्यक कार्यवाही कृषि पणन मंडळातर्फे करण्यात येते.

शेतकरी आठवडे बाजारामध्ये बाजार भावांबाबत कोणतेही नियंत्रण कृषि पणन मंडळातर्फे ठेवण्यात येत नाही. तथापि, बाजारामध्ये चांगल्या दर्जाचा भाजीपाला आणि फळे ग्राहकांना उपलब्ध असावीत, इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर व्हावा, स्वच्छता पाळण्यात यावी, शेतकरी बाजारामध्ये कचरा होवू नये, शेतकरी बाजारामुळे ट्रॅफिक जाम होवू नये, पार्किंग निट व्हावे इ. बाबत शेतकऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेवून मार्गदर्शन करण्यात येते. प्रामुख्याने शेतकरी बाजारामध्ये येणारा कृषि माल उच्च दर्जाचा असावा, जास्त पक्व झालेला, किडका, सडलेला, रोगट, फुटलेला म्हणजेच जो माल ग्राहक खरेदी करणार नाही किंवा जो माल ग्राहकांसाठी खाण्यायोग्य नाही अशा प्रकारच्या मालाची शेतकरी आठवडे बाजारामध्ये आवक होवू नये यासाठी आवश्यक मार्गदर्शक सुचना शेतकऱ्यांना वेळोवेळी देण्यात येतात.

शेतकरी आठवडी बाजारासाठी कृषि पणन मंडळातर्फे सुरू करण्यात येत असलेले उपक्रम

  • शेतकरी आठवडे बाजारात सहभागी होत असलेले शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांची तपशीलासह यादी कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या वेब साईटवर टाकणे.
  • शेतकरी आठवडे बाजारामध्ये विक्री होणाऱ्या शेतमालाचे अंदाजे बाजार भाव हे www.msamb.com या वेबसाईटवर प्रसिद्ध करणे.
  • शेतकरी आठवडे बाजारामध्ये येणाऱ्या ग्राहकांना आपण विकत घेत असलेला भाजीपाला कोठून येत आहे याबाबतची माहिती मिळण्यासाठी ग्राहकांच्या सहली शेतकऱ्यांच्या शेतावर आयोजित करणे.
  • शेतकरी आठवडे बाजारांचे आयोजन हे शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या अथवा उत्पादक सहकारी संस्था यांचेमार्फत करण्यात येत आहे. राज्यामध्ये जिल्ह्यांच्या ठिकाणी जे शेतकरी गट शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यासाठी पुढे येतील त्यांच्या पुण्यातील शेतकरी आठवडे बाजारांना भेटी आयोजित करणे, त्यांना शेतकरी आठवडे बाजार आयोजनासंदर्भात करावयाची पूर्व तयारी तसेच आयोजन याबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात येईल.
  • शेतकरी आठवडे बाजारामध्ये शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी/शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्या/उत्पादक सहकारी संस्था यांची नोंदणी कृषि पणन मंडळामध्ये करण्यात येवून त्यांना शेतकरी आठवडे बाजारात शेतमाल विक्रीसाठी परवानगी देण्याची प्रक्रिया निश्चित करणे.
  • शेतकरी आठवडे बाजारांमध्ये व्यापाऱ्यांचा शिरकाव होणार नाही याबाबत खबरदारी घेणे.
  • शेतकरी आठवडे बाजारामध्ये शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि उत्पादक सहकारी संस्था यांच्यामार्फत शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना ओळखपत्र देणे. यामुळे शेतकरी आठवडे बाजारावर नियंत्रण ठेवणे सोईचे असेल.
  • शेतकरी आणि ग्राहक यांचेशी सतत संपर्क ठेवून शेतकरी आठवडे बाजार अधिकाधिक ग्राहक आणि शेतकरीभिमूख होतील यासाठी तसेच शेतकरी आठवडे बाजारातील व्यवहार अधिक पारदर्शक करणेसाठी पणन मंडळ प्रयत्नशिल आहे.

शेतकरी आठवडे बाजार नियमावली

आयोजकांसाठी नियम / अटी / शर्ती

  • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी कोणाचा माल किती कालावधीसाठी विक्री करणार याबाबतचा तपशील शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या /सभासदांच्या सद्याच्या 7/12 च्या उताऱ्यासह पणन मंडळास तसेच शेतकरी आठवडे बाजार आयोजकास शेतकरी आठवडे बाजारामध्ये विक्रीसाठी परवानगी मिळण्यासाठीच्या अर्जासोबत दाखल करावा. तसेच शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करावे.
  • फक्त शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या सभासदांचाच माल थेट ग्राहकांना वाजवी दरात विक्री करण्यात येईल असे हमीपत्र अर्जासोबत देणे आवश्यक राहील. विक्रेत्यावर उत्कृष्ठ प्रकारचा माल विक्रीचे बंधन असेल. याबाबतचा उल्लेख हमीपत्रात करावा लागेल.
  • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था हे आपला / सभासदांचा उत्पादित माल शेतकरी आठवडे बाजारात विक्री करतील. येथील विक्री थेट ग्राहकांनाच असेल. शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था शेतमालाची खरेदी विक्री आपआपसात शेतकरी आठवडे बाजारात करणार नाहीत.
  • शेतकरी आठवडे बाजारात विक्रीसाठी पणन मंडळाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. आयोजकांना परवानगी नसलेल्या शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना परस्पर विक्रीसाठी परवानगी देता येणार नाही. काही अपरिहार्य परिस्थितीत आयोजकांना विक्रीसाठी परवानगी द्यावी लागल्यास याबाबतची माहिती पणन मंडळास देवून पुढील वेळी परवानगीशिवाय संबंधितांना विक्रीसाठी परवानगी देवू नये.
  • प्रत्येक शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना सर्वांना समान तत्वावर जागा वाटप करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील. एका शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना विक्रीसाठी एकच गाळा / जागा देण्यात येईल.
  • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या जागा बदलविण्याचे अधिकार आयोजकास असतील. तथापि, सर्व शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था या सर्वांसाठी जागा बदलविण्याचे नियम व अटी या सारख्याच असतील. प्रथम येणाऱ्यास (शेतमालासह) प्रथम प्राधान्य अथवा चिठ्ठी पद्धतीने अथवा रोटेशन पद्धतीने स्टॉल / जागेचे वाटप करणे आयोजकांवर बंधनकारक राहील. जागेचे न्याय्य वाटप करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहील.
  • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी आठवड्यातील किती शेतकरी बाजारात शेतमालाची विक्री करावी याबाबत (शेतकरी बाजार संख्या/स्थळ) पणन मंडळ शहरांनुसार बाजारांची संख्या निश्चित करून देईल. जास्तित जास्त शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना शेतकरी आठवडे बाजारात माल विक्रीची संधी देण्याचे धोरण राबविण्यात येईल.
  • योजकांनी जागेचे भाडे, टेबल, खुर्च्या, पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, कचरा निर्मूलन, जागेची साफसफाई, अभ्यांगत, पार्किंग नियोजन, सुरक्षा, प्रचार, प्रसिद्धी इ. च्या खर्चासाठी शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था तसेच इतर विक्रेते यांचेकडून वाजवी रक्कम आकारावी. प्रत्येक आठवड्यात आयोजित शेतकरी आठवडे बाजाराचा जमा आणि खर्चांच्या रक्कमांचा हिशेब आयोजकांनी ठेवणे बंधनकारक राहील. कृषि पणन मंडळास सदर हिशेब आठ दिवसांच्या आत सादर करण्याची जबाबदारी आयोजकांवर राहील. तसेच सहभागी विक्रेत्यांनी मागणी केल्यास सदर हिशेब संबंधितांना देणे बंधनकारक असेल. आयोजक प्राप्त रक्कमेमधून सेवाशुल्क म्हणून एकूण प्राप्त रक्कमेपैकी 20 टक्के रक्कम ठेवू शकतील
  • कोणत्याही परिस्थितीत खाजगी व्यापारी / किरकोळ विक्रेते शेतकरी बाजारात विक्रीसाठी येणार नाहीत याची जबाबदारी आयोजकांची राहील.
  • शेतकरी आठवडे बाजारात जास्तित जास्त 50 स्टॉल्स असावेत. त्यापैकी सुमारे 40 स्टॉल्स (80 टक्के) हे शेतमालाच्या (भाजीपाला/फळे/डाळी/कडधान्य/दुध) विक्रीसाठी असणे आवश्यक राहील. सुमारे 10 स्टॉल्स (एकूण स्टॉलच्या संख्येच्या 20 टक्के) खाद्यपदार्थ/पापड/ लोणचे/मसाले/दुग्धजन्य पदार्थ/प्रक्रियायुक्त पदार्थ इ. मालाच्या विक्रीसाठी देता येतील. तथापि, सदस स्टॉल्सची संख्या एकूण स्टॉल्सच्या संख्येच्या 20 टक्के पेक्षा जास्त ठेवता येणार नाही.
  • शेतकरी आठवडे बाजार आयोजक म्हणून शेतकरी गट / उत्पादक कंपन्या / उत्पादक सहकारी संस्था कामकाज करू शकतील. खाजगी व्यक्ती / बचत गट / एन.जी.ओ. तसेच इतर संस्थांना अथवा वैयक्तिकरित्या शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्यास पणन मंडळातर्फे मान्यता देण्यात येणार नाही.
  • “शेतकरी आठवडे बाजार” सुरू करण्यासाठी शेतकरी गट / उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याची परवानगी मागतांना शेतकरी आठवडे बाजारात विक्रीसाठी येणारे शेतकरी / शेतकरी गट / कंपन्या यांची संमती पत्र नोंदणीच्या प्रमाणपत्रासह तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह कृषि पणन मंडळास सादर करणे बंधनकारक राहील.
  • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी ग्राहकांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करावेत. ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही / ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची जबाबदारी विक्रेत्यांची राहील. शेतकरी आठवडे बाजार परिसरात धूम्रपान / मद्यपान करू नये तसेच ग्राहकांशी कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करू नये. याबाबत तक्रारी आल्यास त्यावर प्राधान्याने आयोजकांनी कार्यवाही करावी. केलेल्या कार्यवाहीबाबत पणन मंडळास कळवावे.
  • प्रत्येक शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी स्टॉलवर आपला/संस्थेचा फलक / फ्लेक्स लावणे बंधनकारक राहील. फलकावर शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांच्या प्रमुखाचे नाव आणि मोबाईल नंबर टाकावा. तसेच शेतमालाच्या बाजार भावाचा फलक स्टॉलमध्ये दर्शनिय ठिकाणी लावणे बंधनकारक राहील.
  • शेतकरी आठवडे बाजारामध्ये सहभागी शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांची यादी त्यांच्या शेतमालाच्या विक्रीसह तसेच अंदाजित किंमतींसह कृषि पणन मंडळाच्या वेबसाईटवर टाकण्यात येईल. सदर माहिती कृषि पणन मंडळास ईमेलद्वारे पुरविणे आयोजकांवर बंधनकारक असेल.
  • जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जिल्हा कृषि पणन अधिकारी आणि कृषि पणन तज्ञ यांच्या मदतीने विविध शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांचा शेतमाल विक्रीतील सहभाग वाढविणेची जबाबदारी तसेच जास्तित जास्त शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था थेट शेतमाल विक्रीत सहभागी करण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
  • आयोजक शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांचेकडून शेतकरी आठवडे बाजाराच्या मुळ संकल्पनेस बाधा पोहोचत असल्याचे लक्षात आल्यास संबंधित आयोजकांकडून शेतकरी आठवडे बाजाराचे कामकाज काढून घेण्याचा अधिकार कृषि पणन मंडळास राहील.
  • काही मुलभूत शेतमालाच्या किंमती शेतकरी आठवडे बाजारातील सहभागी शेतकऱ्यांच्या सहमतीने निश्चित करण्याचा अधिकार आयोजकास राहील.
  • आयोजकांनी शेतकरी आठवडे बाजारामध्ये महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचा फ्लेक्स लावणे बंधनकारक राहील. फ्लेक्सवर कृषि पणन मंडळाचा पत्ता,फोन नं., इ- मेल,संपर्क अधिका-याचे, मोबाईल नं., इ मेल इ. चा तपशिल द्यावा. शेतकरी आठवडे बाजाराच्या संदर्भातील सूचना, तक्रारी, तसेच ग्राहकांचे म्हणणे यांची नोंद ठेवण्याची जबाबदारी आयोजकांची राहील.
  • ग्राहक/शेतकरी/ शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्या/ उत्पादकांच्या सहकारी संस्था तसेच इतर शेतकरी आठवडे बाजाराशी संबंधित घटक यांनी त्यांच्या शेतकरी आठवडे बाजारा संदर्भातील सूचना /तक्रारी आयोजकांकडे द्याव्यात. तसेच याबाबत कृषि पणन मंडळाकडेही संपर्क साधावा.

शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांचेसाठी नियमावली (जबाबदारी) –

  • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी आपला/आपल्या सभासदांचाच शेतमाल शेतकरी आठवडे बाजारामध्ये विक्रीसाठी आणणे बंधनकारक राहील.
  • कृषि उत्पन्न बाजार समिती अथवा इतर ठिकाणांहून खरेदी केलेला शेतमाल शेतकरी आठवडे बाजारात विक्री करता येणार नाही. तसे आढळून आल्यास संबंधिताची परवानगी रद्द करण्यात येईल.
  • शेतकरी आठवडे बाजारात फक्त ग्राहकांनाच मालाची विक्री करणे शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांना बंधनकारक राहील. शेतकरी आठवडे बाजारात शेतमालाची घाऊक विक्री करता येणार नाही.
  • शेतमालासोबत येणारा काडी/कचरा/घाण/शिल्लक माल शेतकरी बाजारातून परत नेण्याची जबाबदारी शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांची राहील. शेतमाल विक्रीनंतर कचरा शेतकरी बाजारात टाकून गेल्याचे आढळल्यास दंड आकारण्याचे अथवा शेतमाल विक्रीसाठी देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याचे अधिकार आयोजकास राहतील.
  • शेतकरी आठवडे बाजारात शेतमालाचे वजन करणेसाठी इलेक्टॉनिक वजन काट्याचा वापर करणे विक्रेत्यांवर बंधनकारक राहील.
  • शेतकरी आठवडे बाजारात किरकोळ विक्रेत्यांपेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री होणे आवश्यक आहे. शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था वाजवी दराने शेतमालाची विक्री करीत नसल्याचे आढळून आल्यास त्यांची विक्रीसाठीची परवानगी रद्द करण्यात येईल.
  • शेतकरी आठवडे बाजारात उत्कृष्ठ दर्जाचा माल विक्री होणे आवश्यक आहे. कच्चा, अती पक्व, किडलेला, रोगग्रस्त, फुटलेला (ग्राहक खरेदी करू शकणार नाही असा माल) असा शेतीमाल विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणू नये. असा शेतमाल विक्रीसाठी आणलेला आढळल्यास सदर मालाची विक्री थांबविण्यात येईल. तसेच संबंधित विक्रेत्याची शेतकरी आठवडे बाजाराची परवानगी रद्द करण्यात येईल.
  • शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांनी शेतमाल विक्रीचे व्यवहार रोखीने करणे बंधनकारक राहील. उधारीने व्यवहार केल्यास आणि नंतर रक्कमेची वसूली न झाल्यास त्यास आयोजक अथवा कृषि पणन मंडळ जबाबदार राहणार नाही.
  • विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या शेतमालाची जबाबदारी ही संबंधित शेतकरी / शेतकरी गट / शेतकरी उत्पादक कंपनी / उत्पादक सहकारी संस्था यांची राहील. आयोजक अथवा कृषि पणन मंडळ शिल्लक मालास जबाबदार नसतील.
  • परदेशातून आयात केलेल्या शेतमालाच्या विक्रीसाठी (फळे/भाजीपाला) स्वतंत्र परवानगी घेणे शेतकरी आठवडी बाजारातील विक्रेत्यांवर बंधनकारक राहील.
  • शेतकरी आठवडे बाजारासंदर्भात काही अडचणी/सूचना/तक्रारी असल्यास त्याबाबतचा महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

 

स्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate