অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाळवंटी टोळ व त्यांचे नियंत्रण

वाळवंटी टोळ व त्यांचे नियंत्रण

सध्या देशात टोळधाडीने धुडगुस घातला आहे. राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब, दिल्ली, मध्यप्रदेश याबरोबरच आता महाराष्ट्रात शिरकाव केला असुन पिके फस्त करण्यास सुरवात केली आहे. सध्या विदर्भातील आष्टा, मोर्शी, परसोडा (जि. वर्धा), डोमा, चुरणी, बगदरी (जि. अमरावती) येथील पिकांवर टोळधाडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश या रायांच्या सिमेलगत असणा-या (गोंदिया, अमरावती, वर्धा, बुलढाणा, नागपुर) जिल्हयात टोळधाडीच्या प्रादुर्भावाबाबत शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करणे आणि या किडीपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी खबरदारीचे उपाय येाजणे आवश्यक आहे. आधीच लॉकडाऊनमुळे शेतीस मोठा फटका बसला आहे. त्यात आता टोळधाडीचे नवीन संकट शेतक-यांपुढे आले आहे. वाळवंटी टोळ ही जागतिक व आंतरराष्ट्रीय द़ृष्टया महत्व प्राप्त असलेली महत्वाची कीड असुन तिचे शास्त्रीय नाव  Schistocerca gregaria हे आहे. ही कीड तांबुस रंगाची असुन अत्यंत खादाड व नुकसान करणारी आहे तसेच ती मोठया प्रमाणात पिकांचे व इतर वनस्पती तसेच झाडाझुडपांचे नुकसान करु शकते. ही कीड साधारणपणे दोन प्रकारच्या अवस्थेत आढळुन येते. पहिली अवस्था म्हणजे एकाकी अवस्था (Solitary phase), जिच्यामध्ये ही कीड एकटी किंवा विरळ असते. अनुकुल हवामानात ही किड समुहाने किंवा थव्यात आढळते आणि या अवस्थेला समुह अवस्था किंवा थव्याची अवस्था (Gregarious phase) असे म्हणतात. थव्याच्या अवस्थेत ही कीड मोठे अंतर भ्रमण  करु शकते व मोठया प्रमाणात पिकांचे नुकसान करु शकते.

नुकसानीचा प्रकार

वाळवंटी टोळ या किडीची पिल्ले एकत्र येवुन मोठया थव्याने मार्गात येणा-या वनस्पतांचा पूर्णपणे फडशा पाडत पुढे सरकतात. सायंकाळचे वेळी ही कीड झाडाझुडपांमध्ये वास्तव्यास राहते. पूर्ण वाढ झालेले प्रौढ टोळ हे अतिशय चपळ व खादाड असतात. हे प्रौढ झाडाची हिरवी पाने,फुले, फांदया व इतर भाग पूर्णपणे खाऊन टाकतात व पिकांचे अतोनात नुकसान करतात. एका दिवसात टोळ त्यांच्या वजनाएवढे अन्न खात असते. एक चौरस किमी क्षेत्रात जर टोळधाड असेल तर त्यामध्ये जवळजवळ 3000 क्विंटल टोळ असतात. बाल्यावस्थेतील पिल्ले त्यांच्या वजनापेक्षा 6 ते 8 पटीने जास्त अन्न खातात. तांबुस टोळ पुर्णावस्थेत पोहोचल्यावर पिवळया रंगाचे हेातात. असे पिवळे टोळ अंडी घालण्यास  अनुकूल अशा ओलसर रेताड जमिनीच्या शोधात फिरतात. टोळाचे थवे ताशी 12 ते 16 किमी वेगाने उडतात.

किडीचे व्यवस्थापन

साधारणपणे 10000 प्रौढ टोळ प्रती हेक्टर किंवा  5 ते 6 पिल्ले प्रती झुडुप याप्रमाणे किडीची आर्थिक नुकसान पातळी दिसुन येताच शेतकरी बांधवानी गरजेनुसार या किडीच्या व्यवस्थापनासाठी खालील उपाय योजनांचा अवलंब करु शकतात.

१. अंडी घातलेल्या जागा शोधुन जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिल्लांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. अंडी सामुहीकरीत्या नष्ट करावीत.

२ .या किडीची सवय थव्याने एका दिशेने दौडत जाण्याची असल्यामुळे पुढे येणा-या थव्याच्या वाटेवर 60 सेमी रुंद व 75 सेमी खालीचे चर खोदल्यास त्यात या किडीच्या पिल्लांना पकडता येते.

३. शेतात प्लास्टीकच्या बाटल्या, टिनाचे डबे, वादय वा इतर साहित्याचा वापर करुन मोठा आवाज काढल्यास या कीडीस तुमच्या शेतात बसण्यापासुन परावृत्त करता येईल.

४. संध्याकाळी वा रात्रीचे वेळी ही कीड झाडाझुडपावर जमा होत असल्यामुळे अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये मशाली पेटवुन धूर केल्यास या कीडीचा प्रादुर्भाव कमी होवु शकतो.

५. प्रतिबंधात्मक आणि पर्यावरणास अनकूल असा उपाय म्हणजे या किडीच्या थव्याच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास 5% निंबोळी अर्क किंवा अॅझाडीरेक्टीन (1500 पीपीएम) 45मिली प्रती 15 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.

६. विषारी आमिषाचा वापर -  गहू किंवा भाताचे तूस यामध्ये फिप्रोनिल 5 एस.सी. 3मिली मिसळावे व त्यामध्ये किडीस आकर्षित करण्यासाठी मळी मिसळुन रात्री किडीने आश्रय घेतलेल्या झाडाच्या आजुबाजुस किंवा प्रादुर्भावग्रस्त शेतामध्ये प्रति हेक्टरी 20-30 किलो याप्रमाणे फोकून दयावे जेणेकरुन सदर आमिष खाल्यावर किडीचा नाश होईल.

७. आर्थिक नुकसान पातळी लक्षात घेवून गरजेनुसार रासानिक किडनाशकाचा वापर करावा. केंद्रीय किटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने शिफारस केलेप्रमाणे क्लोरपायरीफॉस 20% प्रवाही 24 मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 ई.सी. 10 मिली किंवा मॅलॅथिऑन 50 ई.सी. 37 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारावे.

रासायनिक किटकनाशकांची फवारणी करतांना औषधाच्या पाकीटावरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे, अनेक रसायनांचे एकत्र मिश्रण करणे शक्यतो टाळावे  व फवारणी करताना सुरक्षा साधनांचा वापर करावा.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने वाळवंटी टोळ व त्याच्या नियंत्रणासंबंधी या उपाययोजना सुचविल्या आहेत.

अंतिम सुधारित : 6/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate