नांगरणी बंद करून जमिनीवर पिकाच्या शेष भागाचे आच्छादन ठेवायचे. पुढे काडातून थेट पेरणी करणाऱ्या यंत्राने पेरणी केली, की किफायतशीर उत्पादन आणि सुपीक जमीन, असे संवर्धित शेतीचे स्वरूप असले, तरी त्याच्यातही काही अडचणी आहेत. संवर्धित शेतीच्या परिषदेमध्ये चिली देशातील शास्त्रज्ञांनी शोधनिबंधात संवर्धित शेतीमधील काही अडचणी मांडल्या आहेत. त्यांची माहिती आजच्या लेखात घेत आहोत.
एखाद्या नवीन पद्धतीचा अभ्यास करीत असता त्यात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास होणे जास्त महत्त्वाचे असते. नेमके चांगल्या गोष्टी जशा समोर आणल्या जातात, तशा अडचणी, मर्यादा मांडण्याची फारशी कोणाची तयारी दिसत नाही. कृषी विस्तारातील ही एक मोठी शोकांतिका आहे. मध्य चिलीमधील उष्ण हवामानाच्या प्रदेशात कृषी शास्त्रज्ञांनी जवळपास 14 वर्षे प्रचलित शेती व संवर्धित शेती पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. या देशात थंड पावसाळी हिवाळा, गरम कोरडा उन्हाळा, तीव्र उन्हाचा तडाखा, पाण्याच्या बाष्पीभवनाचा प्रचंड वेग असे हवामानाचे स्वरूप आहे. त्यामुळे या भागाला "मेडीट्रेनियन' हवामानाचा प्रदेश असे म्हटले जाते. या प्रदेशात शेताची भरपूर मशागत केली जाते. जनावरे चरावयास सोडण्याचे प्रमाण मोठे आहे, तसेच काड जाळून टाकण्याची प्रथा आहे. या तीनही प्रथा बंद करून शून्य मशागत व जास्तीत जास्त काडाच्या आच्छादनातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढावा यासाठी संवर्धित शेतीचा अवलंब करण्याचे प्रयोग आखले गेले. जगभरातील अनेक भागांत संवर्धित शेती मोठ्या प्रमाणावर फोफावली तरी या प्रदेशात ती फारसे बाळसे धरू शकली नाही.
मागील एका लेखात आपण पाहिले आहे, की संवर्धित शेतीतील चिलीच्या तज्ज्ञ शास्त्रज्ञाने ब्राझील, अर्जेंटिनामध्ये संवर्धित शेतीचा प्रसार केला; परंतु चिलीत मात्र तो होऊ शकलेला नाही. याबाबत त्यांचे म्हणणे असे आहे, की डिसेंबर, जानेवारीमध्ये कापण्या झाल्यानंतर काडाचे आच्छादन टाकले, तर पुढे पावसाळ्यापर्यंत ते तसेच पडते. तीव्र उन्हाळ्यात कुजण्याच्या क्रियेला सुरवातच होऊ शकत नाही. पुढे ज्या वेळी ओलावा मिळतो, त्या वेळी तापमान खूप खाली आलेले असल्याने कुजण्याचा वेग अतिशय मंद राहतो. अशा काडात उगवलेले पीक (प्राधान्याने कडधान्यानंतर घेतलेले धान्य पीक) मरू लागते.
काडामुळे जमिनीपर्यंत थेट सूर्यप्रकाश पोचू शकत नाही. यामुळे बाष्पीभवनाचा वेग कमी राहतो. जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकून राहतो. कृषी तज्ज्ञ असे म्हणतात, की जास्त ओलाव्यामुळे जमिनीचे तापमानही घटते, जैविक प्रक्रियांचा वेग कमी होतो. असे असले तरी आच्छादनाचे काही फायदेही नमूद केले आहेत. वारा व पाण्यामुळे होणारी धूप थांबते, अपधाव कमी होतो, पाणी जिरण्याचे प्रमाण वाढते, बाष्पीभवनाचा वेग कमी होतो, जमिनीला सेंद्रिय कर्ब मिळतो, कणरचना, हवेचे संतुलन, तापमान यात सुधारणा होते व सुपीकता सुधारते, जैविक हालचाली वाढतात.
शेतीमधील मर्यादांचा उल्लेख करीत असता जड जमिनीमध्ये अवजड यंत्रे फिरविल्यास जमीन दबली जाते, तेथे पिकाच्या वाढीचा वेग मंदावतो. जमिनीत पाणी मुरण्याचा वेग कमी होतो, मुळाभोवताली ओलावा जास्त राहिल्याने गव्हासारख्या पिकाची मुळे कुजतात. यंत्राचे वजन कमी करणे, टायरचा आकार व हवेचा दाब योग्य ठेवून जमीन कमीत कमी दबली जाईल असे पाहावे लागेल. हलक्या जमिनीमध्ये या प्रश्नाची तीव्रता कमी दिसून येते.
आपण ज्या पिकाच्या जाती नेहमी वापरत आलो आहोत, त्याच पुढे विना नांगरणीच्या शेतीत वापरल्यास त्या योग्य प्रतिसाद देतीलच याची खात्री देता येत नाही. यासाठी विना नांगरणी तंत्रासाठी खास जाती विकसित कराव्या लागतील, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. माझ्या प्रयोगात भात व ऊस पिकासाठी मी जुन्याच जाती वापरल्या, त्याचा तसा काही वाईट परिणाम दिसून आलेला नाही. तशा विना नांगरणीच्या शेतीसाठी खास जाती विकसित होणे यासाठी खूप कालावधी लागेल. तशी काही गरज नाही. आपल्याकडील अभ्यासात अनेक जाती एकाच वेळी दोन्ही पद्धतीत लावून त्यांचा तुलनात्मक अभ्यास केला जातो; परंतु चिलीमधील तज्ज्ञांनी गव्हाच्या काही जाती विना नांगरणीत, तर काही प्रचलित पद्धतीत चांगल्या वाढतात, असा अभ्यास केल्यानंतर वरील विचार मांडले आहेत. एखादी नवीन संकल्पना रुजवीत असता काय अडचणी निर्माण होऊ शकतात याची कल्पना सुरवातीला येणे शक्य नसते. तंत्रे राबवीत गेल्यानंतर पुढे त्याचा अभ्यास सुरू ठेवणे, त्यावर उपाय शोधत राहणे, अशा कामांतूनच तंत्राचा विकास होत असतो. काही तंत्राचे वाईट परिणाम होण्यास दीर्घकाळ जावा लागतो. याचा दोष दीर्घ काळानंतर सुरवातीला काम केलेल्या शास्त्रज्ञांना देणे योग्य ठरत नाही. आपल्याकडे पहिल्या हरितक्रांतीच्या 25 वर्षांनंतरच्या परिणामांबाबत अशी चर्चा चालू आहे. कोणतेही तंत्र चुकीचे नसते. वजा-अधिक गुण प्रत्येक तंत्रात असतातच. संशोधन म्हणूनच पुढे चालत राहते.
दक्षिण अमेरिकेत जगामध्ये सर्वांत जास्त संवर्धित शेती तंत्राचा वापर होतो. ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे व पॅराग्वे या देशांत एकूण पिकाऊ जमिनीच्या तुलनेत 60 ते 80 टक्के जमिनीत या तंत्राचा वापर होतो. त्याच्याच सरहद्दीला लागून असलेल्या चिलीमध्ये मात्र नाममात्र वापर होत असल्याचे दिसते. चिलीच्या शास्त्रज्ञांनीही परिषदेत आपला शोधनिबंध सादर केला आहे. काही अडचणी दाखविल्या असल्या तरी शेवटी पीकवार प्रत्येक अडचणीवर कशी मात करता येईल याचे मार्गही दिले आहेत. आपल्या देशातही या तंत्राचा वापर वाढत जाणे गरजेचे आहे. अनेक मोठ्या शोधांची प्राथमिक वाटचाल अनेक लहान-मोठ्या खाचखळग्यांतून झाल्याचा इतिहास अभ्यासण्यासारखा असतो. या खाचखळग्यांचा अंदाज येण्यासाठी काही काळ उमेदवारी करावी लागते. हा नियम सार्वत्रिक आहे.
कृषी तज्ज्ञ म्हणतात, की पिकाचा शेष भाग राखण्याने पुढील पिकासाठी कायिक, रासायनिक व जैविक प्रश्न निर्माण होऊ शकतात. जास्त उत्पादन देणाऱ्या पिकाकडून काडही जास्त प्रमाणात उपलब्ध होते. काडाचे कर्ब ः नत्र गुणोत्तर जास्त असल्याने त्याचा कुजण्याचा वेग अतिशय मंद असतो. यामुळे काड दीर्घ काळ जमिनीवर पडून राहते. कडधान्याच्या काडाच्या तुलनेत धान्याचे काड कुजण्यास जास्त वेळ लागतो. (मी जास्त कर्ब : नत्र गुणोत्तराचे दीर्घ काळ कुजणारे काड जास्त चांगले मानतो.) काडामुळे जमिनीवर तणनाशकाची फवारणी करता न आल्याने तण नियंत्रणाचे प्रश्न निर्माण होतात. (आता तणनाशकाचे वेगवेगळ्या परिस्थितीत वापरण्याचे भरपूर प्रकार बाजारात उपलब्ध असल्याने हाही प्रश्न फार मोठा होऊ शकत नाही. विना नांगरणी व प्रचलित पद्धतीसाठी योग्य तणनाशकांच्या वापराचा तुलनात्मक अभ्यास झाल्यास शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरेल. असा अभ्यास पीकवार, भागवार होणे गरजेचे आहे.) तज्ज्ञ लिहितात, की संवर्धित शेतीत कीड, रोग व तणांचे प्रकार बदलतात. काड कुजत असताना काही रसायने तयार होतात, त्याचा पुढील पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, असा उल्लेख आहे. (काड कुजत असताना जी रसायने निर्माण होतात, त्यांचा जमिनीला व पिकाला फायदाच होत असतो. कुजणारे अवशेष नांगरून जमिनीच्या वरच्या थरात मिसळले तर मात्र पुढील पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. कुजण्याच्या क्रियेचा जैवरसायनशास्त्रीय अभ्यास शेती शास्त्रात सहसा केला जात नाही, यामुळे अनेक गैरसमज या क्षेत्रात आहेत.
विना मशागत पद्धतीमुळे गहू पिकात काही रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तज्ज्ञांनी याचे कारण पाणी जास्त साठणे असे दिले आहे. पाणी जास्त काळ साठून राहत असल्यास नांगरून पेरलेल्या गहू पिकातही मूळ कुजव्या रोग येऊ शकतो. गव्हानंतर कॅनोना हे फेरपालटाचे पीक काही भागात घेतले जाते. गव्हाच्या काडामुळे कॅनोनाचे उत्पादन घटते असे संदर्भ दिले आहेत. कॅनोनाचे बी अतिशय लहान असते. उगवण व प्राथमिक वाढ काडात नीट होऊ शकत नाही, तसेच काही रोगांचा प्रादुर्भाव कॅनोना पिकावर काडामुळे होऊ शकतो. कॅनोनाप्रमाणेच लुपिक या फेरपालटाच्या पिकावरही गव्हाच्या काडाचा वाईट परिणाम होतो, असे लिहिले आहे. हा वाईट परिणाम कमी करण्यासाठी पेरणी थोडी पुढे ढकलल्यास फायदेशीर होते.
गहू-मका फेरपालटात गव्हाच्या कापणीनंतर जवळपास सहा महिन्यांनी उन्हाळी मक्याची पेरणी होते. याचा मका पिकाच्या वाढीवर वाईट परिणाम होत नाही; परंतु उन्हाळी मका काढल्यानंतर त्याच्या कुट्टी केलेल्या काडात जर गहू पेरणी केली, तर गव्हाचे उत्पादन 50 टक्के घटते, अशी नोंद आहे. इथे मक्याच्या काडाचे कर्ब ः नत्र गुणोत्तर जास्त असणे हे कारण सांगितले आहे. याऐवजी जर रताळी हे त्यामानाने कमी गुणोत्तराचे पीक घेतले, तर त्याच्या काडाचा असा वाईट परिणाम होत नाही (इथे नेमके कारण शोधण्यासाठी आणखी जास्त अभ्यास होणे गरजेचे आहे असे वाटते). तज्ज्ञांनी अहवालात गहू - मका फेरपालटाच्या उत्पादनाचे आलेख दाखविले आहेत. त्यात सुरवातीला तीन-चार वर्षांतील विना नांगरणीच्या शेतीतील उत्पादनाचे आकडे नांगरलेल्या शेतीपेक्षा कमी आहेत, तर चार वर्षांनंतर विना नांगरणीच्या शेतीतील उत्पादन वाढत चालल्याचे दिसून येते. याला जमिनीतून हळूहळू वाढत जाणारे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हेच मुख्य कारण नमूद केले आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/8/2023
नुकत्याच घडलेल्या मॅगी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ...
काही समस्यांमुळे आरोग्यसेवांवरचा एकूण खर्च वाढत चा...
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्व...