जगभरात तेलाचा वापर फार पूर्वीपासून होतो आहे. पूर्वी तो अन्न शिजवण्यासाठी, समई, टेंभेस पणत्यातून जाळून उजेडासाठी, गाडीचे वंगण म्हणून होत असे. आता त्याचे क्षेत्र वाढले. गेल्या काही वर्षांत साबण, सौंदर्य प्रसाधने, औषधेनिर्मिती आणि वाहनांचे इंधन म्हणूनही तेलाचा वापर होतो आहे.
मानवाच्या सुखी जीवनासाठी ऊर्जेची गरज प्रचंड प्रमाणावर आहे, तसेच शेतीसाठीही ऊर्जेची प्रचंड गरज असते. काही ऊर्जा कळत तर काही नकळत वापरली जाते. सौरऊर्जा शेतावर खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. शेतावर पिके उभी असोत-नसतो, सूर्यनारायण नभात असो-नसो; वर्षाच्या बारा महिने प्रत्येक क्षणी तिचा वापर होतो. बी उगवल्या पासून ते सुगी होऊन धान्य वाळवून कणगीतून भरून ठेवेपर्यंत आणि कडबा वाळून गंजी लावेपर्यंत सौर ऊर्जेचा वापर होतो. पिके काढल्यावरही शेतातील कीटकांच्या नियंत्रणाचे कामही सौर ऊर्जेतून होत असते.
उदंड वाहणारी ही ऊर्जा प्रचंड प्रमाणावर आहे; फुकटात मिळते म्हणून तिची कदर आपण कधीच करत नाही. ऊर्जा म्हणून तिची गणणाही होत नाही! डोळ्याच्या जास्त जवळ असली, की वस्तू दिसत नाही; असेच काहीसे सूर्य-प्रकाशाचे झालेले आहे. आपल्या भौगोलिक स्थानामुळे शेतावर कृत्रिम उजेडाची किंवा कृत्रिम उष्णता निर्माण करण्याची गरज आपल्याला नाही. पावसाळ्याचे काही दिवस सोडता सूर्याचा वरदहस्त आपल्या माथ्यावर सतत असतो. भास्कर न चुकता आपले कर्तव्य बजावत असतो. त्याच्या आशीर्वादाचा पुरेपूर लाभ आपण उठावायला हवा. आधुनिक संशोधनानुसार शेड-नेट वापरून ऊनाची प्रखरता कमी करून सौर ऊर्जेचा वापर हिताचे होते.
शेतावर उपयोगाची दुसरी महत्त्वाची ऊर्जा आहे प्राणी ऊर्जा. यात लेंड्या, शेण, मूत्र यांचा समावेश आहेच; बैल शक्ती ही मोठ्या प्रमाणावर अजूनही वापरात आहे. नांगरणी, कोळपणी, पेरणी, कुळवणी, मळणी, शेतमाल वाहतूक सारी कामे बैल शक्तीनेच होत असत. अजूनही होतात. बैल जोडी बाळगणे आताशा लहान शेतकऱ्यांना परवडेनासे झालेले आहे. शेतीची सारी कामे आपण आजकाल अवजड यंत्राने करतो. बैलांची जागा ट्रॅक्टर, पॉवर-टिलरने घेतलेली आहे. केवळ ही दोन यंत्रेच नव्हे तर पाण्याचा पंप, मळणी-यंत्र, टेंपो वगैरे अनेक छोटी-मोठी यंत्रे आपण आज शेतावर वापरतो. बैल कडब्यावर चालायचे; आता ही यंत्रे भूगर्भातील साठलेल्या तेल ऊर्जेवर चालतात. यंत्रांना ऊर्जा पुरवणारे रसायन आहे डिझेल आणि दिवसेंदिवस डिझेलचे भाव वाढतच आहेत. वारंवार होणाऱ्या या भाववाढीमुळे शेती करणे परवडेनासे होते. शेतीचे होणारे तुकडे; त्यामुळे घटणारी सलग शेती, अशा लहान तुकड्यांवर अवजड यंत्रे वापरणे म्हणजे खर्चाचे काम. अशा वेळी शेतीतून ऊर्जा निर्मितीची वेळ आली आहे. शास्त्रज्ञांनी खाद्य आणि अखाद्य तेलाचे इंधनात रूपांतर करण्याची शक्कल शोधून काढलेली आहे. कमीत-कमी स्वतःच्या गरजेपुरते इंधन आपल्याच शेतावर पिकवू शकतो. शेतीसाठी लागणाऱ्या ऊर्जेचे फासे पालटण्याची चिन्हे क्षितिजावर स्पष्ट दिसत आहेत. हा धडा ज्याला समजेल आणि उमजेल तो शेतकरी जवळच्या भविष्यात बाजी मारून नेईल. वाचा, विचार करा आणि अमलात आणा.
------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
बायोगॅस प्रकल्पातील बाबींविषयी सविस्तर माहिती यामध...
ग्रीवा : डोके आणि धड यांना जोडणाऱ्या स्तंभावर शरीर...
अॅक्टिनोझोआचे ऑक्टोकोरॅलिया आणि हेक्झॅकोरॅलिया अस...
बायोगॅस एक स्वस्त व प्रदूषणविरहित इंधन आहे. बायोगॅ...